एसबीआय कार्ड्सच्या शेअर्ससाठी अर्ज केलात का? केला नसेल तर हे जरूर वाचा!!

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक समजली जाते. एकेकाळी बँकेत आपण आपल्या खात्यात पैसे भरणे, पैसे पाठविणे, वेळप्रसंगी कर्ज उचलणे अशा काही कामांसाठी जात येत असायचो. पण गेल्या काही वर्षात हळूहळू जशी कार्ड्स सिस्टिम अंमलात आली, तसं प्रत्येकवेळी बँकेत जाणं कमी झालं. बँकेचे बरेचसे व्यवहार कार्ड्स म्हणजे डेबिट आणि क्रेडिट कार्ड्समार्फत सहज होऊ लागले. हीच गरज लक्षात घेऊन एसबीआयने कार्ड्सची सेवा देण्यासाठी १९९८ साली एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसची स्थापना केली.
गेल्या २ दशकात एसबीआय क्रेडिट कार्डचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला व ही भारतातील कार्ड्सची सेवा देणारी दुसरी मोठी कंपनी म्हणून प्रसिद्ध झाली. या व्यवसायात आणखी मूल्यवर्धनाचा फायदा घेण्यासाठी व भांडवल वाढवण्यासाठी एसबीआय कार्ड्स आपला आयपीओ घेऊन शेअर बाजारात आली आहे आणि २ मार्चपासून ५ मार्चपर्यंत विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे. या आयपीओनुसार एका शेअरची किंमत ७५०/- ते ७५५/- एवढी असेल. याप्रमाणे कंपनी सुमारे १०,३५५ कोटी रुपयांपर्यंत भांडवल जमा करू शकेल.
एस.बी.आय कार्ड्सचा आयपीओ घेण्याबाबत महत्वाच्या गोष्टी :
१. क्रेडिट कार्डची सेवा देणाऱ्या भारतात एकूण ७४ कंपन्या आहेत. त्यापैकी एसबीआय कार्ड ही दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय कंपनी आहे. एकूण शेअर मार्केटचा विचार करता सुमारे १८.१% एवढी भागीदारी एसबीआय कार्डची आहे.
२. एकूण मूल्यांकन -क्रेडिट कार्ड हा विशिष्ट व्यवसाय असल्यामुळे त्यात जोखीम निश्चित आली. तरीही एसबीआय क्रेडिट कार्डच्या मूल्यांकनाचे मूल्य सर्वात जास्त म्हणजे १४,४९% एवढे आहे. भारतातील बँकांना एवढे उच्च मूल्य सहसा मिळत नाही.
३. एसबीआय कार्ड्सचा वाढता रेट-आयपीओ किंवा शेअर्स घेताना आपण कंपनीचा मार्केटमधील वाढणारी किंवा घसरणारी किंमत पाहत असतो. एसबीआय क्रेडिट कार्डचा ग्रोथ रेट चांगला आहे.
थोडक्यात, भारतातील क्रेडिट कार्डची सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी एसबीआय कार्ड्स ही अग्रगण्य कंपनी आहे.
हा आयपीओ बाजारात येणार असे जेव्हा निश्चित झाले त्यावेळी शेअर बाजाराची स्थिती आजच्या स्थितीपेक्षा खूपच चांगली होती. त्यामुळे ज्यांना शेअर मिळतील त्यांना त्वरित नफा मिळेल अशी शक्यता सगळ्यांनाच वाटत होती. परंतु, गेल्या काही दिवसात शेअर बाजारात जी पडझड चालू आहे ती लक्षात घेता “त्वरित नफा” होईल असे चित्र दिसत नाही. असे का?
सध्या अत्यंत मोठा आणि चर्चेचा विषय म्हणजे कोरोना व्हायरस. हा चीनमधून पसरलेला व्हायरस जगभर पसरत आहे. याच्या संसर्गापासून आर्थिक व्यवस्थाही वाचू शकली नाही. एकंदरीत जीडीपी, आयात-निर्यात, अशा अनेक गोष्टींवर याचा परिणाम दिसून येत आहे.
कोरोना व्हायरसचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम:
भारताच्या शेजारील देश चीनमध्ये या कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. चीनसारखा बलाढ्य देश या रोगाने अक्षरशः वेढला गेला आहे. यामुळे चीनचे नागरी जीवन विस्कळीत झालेच आहे, शिवाय याचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. चिनी अर्थव्यवस्था संकटात आल्यामुळे याचा नकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसून येत आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये अनेक उद्योग बंद पडले आहेत व याचा परिणाम भारतातील अनेक उद्योगांवर देखील झाला आहे. शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली आहे.
जीडीपीमधील घसरण:
जागतिक पातळीवर अर्थविषयक कार्य करणारी संस्था ओईसीडी (Organisation for Economic Co-operation and Development )च्या म्हणण्यानुसार मागच्या वर्षी ६% जीडीपी वाढीचा दर यावर्षी घसरून ५. १% वर आला आहे. या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल २०२० पर्यंत हा ४.% पर्यंत घसरू शकतो असा अंदाज आहे.
एकंदरीत आर्थिक घडामोडी, मार्केट चा घसरणारा आलेख पाहता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं दिसत आहे. असे बऱ्याच तज्ञांचे मत आहे. नेमक्या याचवेळी घसरत्या शेअर बाजारात एसबीआय कार्ड्स सारख्या मोठ्या कंपनीने आयपीओ आणला आहे. आपल्यापैकी बरेच जण बुचकळ्यात पडले असतील नेमकं काय करायचं ?? तर आपण आता या आयपीओ चा फायदा घेऊन शेअर्स घेऊन ठेऊ शकता. आज जसं हे मार्केट खाली गेलं आहे तसं ते भविष्यात वरती सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे आयपीओच्या संधी चा लाभ घेऊन आपण शेअर्सची खरेदी करून ठेवणे हा पर्याय निवडू शकता. नवीन गुंतवणूकदारांनी मात्र या विषयी योग्य तो सल्ला व मार्गदर्शन घ्यावे.