computer

राष्ट्रीय महामार्गावर घेतली जाणारी लाच एका देशाच्या बजेट एवढी आहे भाऊ!!!

राष्ट्रीय महामार्गावर चिरीमिरी देणे हे रोजचेच आहे. ही लहानशी चिरीमिरी किती मोठी आहे हे नुकतंच आलेल्या सर्वेक्षणातून दिसून येतं. मालवाहतूकी सारख्या व्यावसायिक वाहन चालकांकडून राष्ट्रीय महामार्गावर दर वर्षी एकूण ४८००० कोटी रुपये एवढी लाच घेतली जाते. लाचखोरीचं प्रकरण गेल्या वर्षभरात १२० टक्क्यांनी वाढलं आहे. हा अहवाल इथेच थांबत नाही. चला तर पूर्ण माहिती वाचूया.

हे आकडे आपल्या सामान्य माणसांसाठी दिवसा तारे दाखवणारे आहेत, पण हे खरं आहे. सेफ लाइफ फाऊंडेशन या संस्थेने सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की स्थानिक पोलीस सर्वात जास्त लाच घेतात. स्थानिक पोलीस दरवर्षी तब्बल २२००० कोटी रुपये एवढी लाच घेतात, तर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी १९००० रुपये खिशात घालतात.

पोलीस तर पोलीस पण धार्मिक कारणांवरून वाहन चालकांना पैसे मागणारेही कमी नाहीत. सण, उत्सव आणि दानधर्माच्या नावावर वाहन चालकांकडून पैसे मिळवले जातात.

सेफ लाइफ फाऊंडेशनने हा अहवाल भारतातील १३१० ट्रक चालकांशी बोलून तयार केला आहे. यासाठी ट्रक चालक मालक संघटनेची मदत घेण्यात आली.

२००६-०७ साली ट्रान्सपरेन्सी नावाच्या संस्थेने असाच एक अहवाल दिला होता. त्यात लाचखोरीचा आकडा हा २२,००० कोटी सांगण्यात आला होता.

लाचखोरीला जसे पोलीस जबाबदार आहेत तसंच वाहनचालकही जबाबदार आहेत, हे इथे मान्य करावंच लागेल. उदाहरणार्थ, ट्रक चालकांना फळे, भाज्या वेळेपूर्वी आणल्याबद्दल बोनस दिला जातो. म्हणून काही ट्रक चालक कायदे धाब्यावर बसवतात, त्यासाठी लाचही देतात.

पंजाब ते मुंबई फळे आणण्यासाठी ३०,००० रुपये भाडे असते आणि ३६ तासांचा प्रवास असतो. गाडी ३० तासात आणली तर ४ ते ५ हजार रुपये बोनस मिळतो. चालक झोप न घेता वेगाने गाडी हाकतात. त्यामुळे अपघात होतात. बरेचदा ट्रकच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं लादलं जातं. क्षमता जर १५ टन असेल तर चार पाच टन जास्त भरून चालक आणि मालक पैसे वाटून घेतात. परिणामी घाट रस्त्यावर ट्रकचा टोल जातो.

बोभाटाच्या वाचकांचं यावर काय मत आहे ते आम्हाला नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required