computer

जगातल्या दोन सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकावणारा मराठमोळा गिर्यारोहक !!

आज आम्ही एका मराठमोळ्या गिर्यारोहकाबद्दल सांगणार आहोत. त्याने जगातील सात खंडापैकी दोन खंडातील दोन सर्वोच्च शिखरे सर करून विश्वविक्रम केला आहे. त्याच्या कामगिऱ्यांची यादी इथेच थांबत नाही. चला तर त्याची संपूर्ण ओळख करून घेऊया.

या गिर्यारोहकाचं नाव आहे वैभव पांडुरंग ऐवळे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या संगोली येथील वाढेगावातला. वैभवने १५, ऑगस्ट २०१८ रोजी भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो सर करून ७२ भारतीय ध्वजांचे ध्वज-तोरण फडकावून विश्व-विक्रम केला. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि हाई-रेंज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली होती.

दुसऱ्या वर्षी म्हणजे १५, ऑगस्ट २०१९ रोजी त्याने हाच विक्रम पुन्हा एकदा केला. यावेळ त्याने भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यूरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस पर्वतावर ७३ भारतीय ध्वजांचे ध्वज-तोरण फडकावून विश्व-विक्रम केला होता. याचीही नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, हाई-रेंज बुक ऑफ रेकॉर्ड आणि इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली होती.

माउंट एल्ब्रुस पर्वतावर ७३ ध्वज फडकवल्याबद्दल त्याच्या नवे जो विक्रम झाला तो नोंदवताना  "MOST NUMBER OF INDIAN NATIONAL FLAG HOISTED ON THE TOP OF MOUNT ELBRUS AND MOUNT KILIMANJARO" असा उल्लेख करण्यात आला होता.

या दोन विक्रमांखेरीज वैभवला त्याच्या कामगिरीसाठी पद्मश्री श्री. प्रकाश बाबा आमटे आणि सौ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांच्या कडून इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्ड चे पदक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता. यावेळी प्रकाश बाबा आमटे यांनी वैभवला ऑस्ट्रेलियन मोहिमेसाठी शुभेच्छा पत्र देखील दिलं होतं.तसेच वैभवला  राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड चे पदक आणि प्रमाणपत्र मिळालं होतं.

वैभवने आपला हा संपूर्ण प्रवास सह्याद्री वाहिनीवरील नमस्कार मंडळी (ब्रेकफास्ट शो) ह्या कार्यक्रमात उलगडला होता. गिर्यारोहण क्षेत्राबद्दल त्याची आवड, सुरवात आणि मधल्या काळातील वेगवेगळे टप्पे, आलेल्या अडचणी आणि कुटुंबाने दीलेली साथ, भारत देशाबद्दल असलेला अभिमान आणि प्रेम ते व्यक्त करण्यासाठी केलेल्या यशस्वी आंतरराष्ट्रीय मोहिमा..हे सर्व तुम्ही या कार्यक्रमात पाहू शकता.
 

२०१८ आणि २०१९ साली विक्रम केल्यानंतर आता येत्या वर्षात १५ ऑगस्ट, २०२० रोजी वैभव नवीन मोहीम फत्ते करणार आहे. त्याने यावेळी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माउंट कोसचिऊस्जको शिखर सर करण्याचं धाडस केलंय. या आणि अशा अनेक मोहिमांसाठी त्याला बोभाटाच्या खूप खूप शुभेच्छा.

सबस्क्राईब करा

* indicates required