एक रुपयाचं बॉलीवूड कनेक्शन....वाचा हे १३ किस्से !!

सध्याच्या जमान्यात एक रुपयाला काही किंमतच उरली नाही बघा! चलनातलं एकक म्हणून त्याचा वापर होतो इतकंच एका रुपयाचं महत्व शिल्लक राहिलं आहे. पण बॉलीवूडमध्ये मात्र अनेक कहाण्या या एका रुपयाशी जोडल्या गेल्या आहेत.या कहाण्या बर्याचशा "कहीसुनी" म्हणजेच सांगोवांगी असल्या तरी भारी मनोरंजक आहेत. आता घरबसल्या सध्या मनोरंजन हवेच आहे नाही का? चला तर वाचू या एक रुपयाच्या बॉलीवूड कथा!!
१. फ्लाइंग सिख म्हणजे मिल्खा सिंग यांच्या 'भाग मिल्खा भाग' साठी परवानगीचा मोबदला म्हणून राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी १९५८ साली छापलेली आणि वितरणात असलेली एक रुपयाची नोट मानधन म्हणून दिली होती.
२. सिवाजी-द बॉस या चित्रपटातलं एक रुपयाचं नाणं म्हणजे -रजनी फॅन्सचं आवडतं नाणं ? व्हिलनने भिक म्हणून दिलेल्या एक रुपयाच्या जोरावर रजनी सर त्या व्हिलनचा खात्मा करतात.
३. 'हरामखोर' या चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दिकीने फक्त एक रुपया मानधन घेतलं होतं.
४. शोलेनंतर अमजद खान यांनी खोर्याने पैसे ओढले असतील. पण त्यांचा भाऊ इम्तियाज खान यांनी दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले होते की शोलेसाठी गब्बर अमजद खान यांना एका दिवसाचा एक रुपया मिळायचा.
५. प्रकाश झा यांच्या 'आरक्षण'वर पंजाबमध्ये बंदी घातली होती. ही बंदी सुप्रीम कोर्टाने हटवल्यावर प्रकाश झा यांनी टोकन पेमेंट म्हणून फक्त एक रुपया घेतला होता.
६. शर्मन जोशीचा थ्री बॅचलर्स नावाचा सिनेमा आला होता. (म्हणे !). त्याने या चित्रपटाचे प्रमोशन धड केले नाही म्हणून निर्मात्याने 'एक रुपया' नुकसान भरपाई मिळावी म्हणू कोर्टात दावा दाखल केला होता.(म्हणे !)
७. आता थोडी वेगळी स्टोरी. 'मंथन' या चित्रपटासाठी गुजरातच्या शेतकर्यांकडून दोन -दोन रुपये जमा करण्यात आले होते. गुजरातपासून सुरुवात झालेल्या 'धवल क्रांती'ची कहाणी या चित्रपटात होती.
८. 'नवाबी शराबी' हा चित्रपट एका खाऊन 'पिऊन' धमाल करणार्या एका कुटुंबावर आधारीत होता. असे पैसे उधळल्यावर एका रुपयावर रात्र काढायची पाळी त्यांच्यावर येते अशी कथेची मूळ कल्पना होती. या चित्रपटातून कादर खान यांचा मुलगा शाहनवाझ याचे पदार्पण झाले होते.
आता जुन्या बॉलीवूडच्या स्टोर्या वाचूया!!
९. साहिर लुधियानवी या कवीचा आग्रह असा असायचा की त्यांना संगीत दिग्दर्शकापेक्षा एक रुपया जास्त मानधन देण्यात यावे. सचिन देव बर्मन आणि साहिर लुधियानवी यांच्यात दुरावा निर्माण होण्याचे हे कारण होते असे म्हणतात.
१०. साधना शिवदासानीमुळे हिंदी चित्रपटात 'साधना कट'ची नवी फॅशन आली होती. या काकू सिंधी होत्या. सिंधीतल्या पहिल्या चित्रपटासाठी - आबनासाठी - तिने फक्त एक रुपया मानधन घेतले होते.
११. राजकपूर आणि गीतकार शैलेंद्र जीवाभावाचे मित्र होते. जेव्हा शैलेन्द्र यांनी निर्माता म्हणून 'तिसरी कसम' ची निर्मिती केली तेव्हा राजकपूर यांनी फक्त एक रुपया मानधन घेतले होते.
१२. ज्यांच्यामुळे सुपरस्टार हा शब्द जन्माला आला त्या राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी एक रुपया जास्त मानधन घेतले होते असे म्हणतात.
पण अशा गोष्टी अनेक जोड्यांबद्दल सांगितल्या जातात. शाहरुख खानसोबत काम करण्यासाठी सलमान खानने पण हीच अट घातली
१३. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या चित्रपटात काम करावं म्हणून त्यांना साईन करताना महेश कोठारे यांनी खिशातला एक रुपया काढून दिलेला. पुढे या जोडीने मराठी चित्रपट सृष्टीत काय धुमधडाका केला हे तुम्हाला माहित आहेच.

तुमच्या वाचनात अशा स्टोर्या आल्याच असतील ज्यांचा समावेश इथे केलेला नाही. त्या तुमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ देत! सोबत तुमच्या लहानपणी तुम्ही एक रुपयात काय करत होतात ते पण सांगा!!