सोशल डिस्टन्सिंगचा कळस...कोणी जवळ येऊ नये म्हणून तो चक्क दहा लाख वोल्टचा झटका देतो?
डासांच्या संहारासाठी आपण जी चायनीज रॅकेट वापरतो तीच कल्पना वापरून तसंच यंत्र एका माणसाने दुसर्या माणसावर वापरलं तर काय होईल ? कल्पना चांगलीच भयानक वाटते ना ? पण कल्पना करूच नका, या इसमाने ते चक्क बनवूनच टाकलंय.
सध्याच्या काळात 'सोशल डिस्टन्सींग'साठी लोकं काय काय आततायी आणि आचरट उद्योग करतील याचा भरवसा राहीलेला नाही. हा पण असाच भितीदायक प्रयोग आहे. याच्या पाठीवर असलेल्या बॅकपॅकमध्ये त्यानी एक यंत्र बसवलंय. ज्याचं नाव आहे 'कोव्हीनेटर'. त्याच्या दहा फूटाच्या परीघात कोणी आलं तर येणार्या तिर्हाईताला 'कोव्हीनेटर' मोठा विजेचा धक्का देतं.
थोडाथोडका नाही तर चक्क दहा लाख वोल्टचा धक्का देतं असा याचा दावा आहे. अर्थात धक्का द्यावा की नाही या साठी एक सेफ्टी कोड बसवलाय या यंत्रात पण जे बनवलंय त्याची कल्पना जरी डोक्यात आली तरी अंगावर शहारा येईल. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे असं यंत्र कोणीही बनवू शकतं. दोन मायक्रोवेव्हची सर्कीट, कारची बॅटरी आणि जहाजात वापरल्या जाणार्या रडारचे काही भाग इतकं एकत्र करून कोणीही हे बनवू शकेल.
बाकी सगळं ठीक्च आहे, पण रडारचे सुटे भाग कुठून आणायचे हे काही हा पठ्ठ्या सांगत नाही. आता हा विजेचा शॉक माणूस कसा सहन करेल असा विचार तुमच्या मनात आलाच असेल ? त्याचं उत्तर असं आहे की व्होल्टेज जरी मोठं असलं तरी करंट फारच मामूली असतो. व्हिडीओ बघितला तर सगळं काही कळेलच पण तुम्ही वापराल का हा कोव्हीनेटर?




