computer

महाराष्ट्रातल्या या ठिकाणी उतरलेत हजारो फ्लेमिंगो....तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही !!

होय... हे मुंबईतलेच चित्र आहे. याआधी एखादा नाला, तलाव, किंवा समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या हजारो, लाखो प्लास्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या, कचरा तरंगताना आपण पाहिलेला आहे. त्याची नजरेला एवढी सवय झाली आहे, की कचरा-प्लास्टिकचा थर नसेल तर त्याखाली पाणी असते यावर आपला विश्वासही बसत नाही. हा थर बाजूला केला, की त्याखाली जे  हिरवंकाळं दिसतं, त्याला आपण पाणी मानतो. त्यात पाण्याचा अंश किती आणि प्रदूषणकारी रसायनांचा अंश किती हा विचारही मनात येत नाही.

कारण, म्हणतात ना, मुंबईचं पाणीच वेगळं!

पण आता मुंबईचं ते पाणी वेगळं राहिलेलं नाही. ते बदलतंय... आता नद्या, नाले, तलाव, किनारे कात टाकू लागले आहेत, आणि खरंखुरं पाणी दिसू लागलं आहे. जिथे पाणी असतं, तिथे प्राणी रमतात. मुंबईत आता प्राणी, पक्षी रमताना दिसतायत. 

हे छायाचित्र पाहिले, की लगेचच असे वाटेल की हादेखील प्लास्टिकच्या कचऱ्याचा साचलेला थर आहे. पण जरा निरखून पहा... मुंबईच्या पाण्यावरचा हा गुलाबी जिवंत थर कचऱ्याचा नव्हे, तर, जुनी मुंबई पुन्हा गवसल्याच्या ओढीने दाखल होणाऱ्या फ्लेमिंगोच्या- म्हणजे अग्निपंखी पक्ष्यांचा- आहे. मुंबईच्या बदललेल्या पाण्याची वर्दी या पक्ष्यांनी आज जगाला दिली आहे.

लाॅकडाऊनमुळे माणसं घाबरली असली तरी निसर्ग मात्र एकंदरीत खुश दिसतोय!!

(फोटो- सीएनएन इंटरनॅशनल)

 

लेखक : दिनेश गुणे

सबस्क्राईब करा

* indicates required