computer

घरबसल्या आयआयटीमध्ये शिका. आयआयटींच्या या ४०० मोफत कोर्सेसबद्दल वाचलं का भाऊ?

कोरोनामुळे बऱ्याच वाईट गोष्टी घडल्या असल्या तरी काही चांगल्या गोष्टीदेखील घडल्या आहेत. आता आयआयटीच्या कृपेने तुम्ही घरीबसल्या आयआयटी कोर्सेस करु शकणार आहात. ते कसे? चला जाणून घेऊया...

सात आयआयटीज(दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, कानपुर, खरगपूर, रुरकी आणि मद्रास) सोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर यांनी विद्यार्थ्यांसाठी २००३मध्ये एक प्रयोग सुरू केला होता. त्याचं नांव NPTEL म्हणजेच National programming on technology enhancement learning. या NPTELच्या माध्यमातून इंजिनिअरिंग, ह्युमॅनीटी, सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस चालवले जायचे. अर्थात त्यावेळी ज्या कॉलेजेसना हे कोर्सेस हवे असतील, ते मद्रासला जाऊन हे कोर्सेस हार्डडिस्कवर स्टोअर करुन आणायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांना उपल्ब्ध करून द्यायचे.

पाहतापाहता इंटरनेट स्वस्त आणि अधिक फास्ट झालं आणि २०१४मध्ये NPTELने हे कोर्सेस ऑनलाईन करायला सुरुवात केली. हळूहळू कोर्सेसची संख्याही वाढली. आयआयटीत शिकणं हे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं. आता सगळ्यांनाच तिथे प्रवेश मिळत नाही, मात्र या NPTELने आयआयटीत न जाता तिथलं शिक्षण सगळ्यांना उपलब्ध करुन दिलं. आणि हे सगळं मोफत असायचं आणि अजूनही मोफतच आहे.

यावर्षीही आयआयटी मद्रासने थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४०० ऑनलाईन कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले आहेत. या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हांला घरबसल्या आयआयटीयन होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. सध्या या ४०० ऑनलाईन कोर्सेसची प्रवेशनोंदणी चालू झाली आहे. हे कोर्सेस जुलै ते डिसेंबर दरम्यान चालविण्यात येतात. या कोर्सेसना सेल्फ पेस्ड कोर्सेस असंही म्हणतात. ऑनलाईन लेक्चर्स उपलब्ध असल्याने जो ज्याला हवे त्या वेळेला, हव्या त्या वेगाने शिकू शकते, एखादा मुद्दा कळाला नसेल किंवा विसरला, तर पुन्हा जाऊन तो व्हिडिओ पाहून शंकानिरसन करता येते आणि इतके वेगवेगळे कोर्सेस असल्याने तुम्हांला हवे ते शिकताही येते. म्हणजे पाहा, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सला असलात तरी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे कोर्सेसही करु शकता. किंवा अगदी ९वी-१०वीला आहात तरीही तुम्ही कोणत्याही शाखेचा कोर्स करु शकता. कारण ते कोर्सेस युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध असतात. आणि असाईनमेंटससाठी ऑनलाईन मटेरियल उपलब्ध केलेले असते.

परिक्षा??

पण हो, इथं फक्त एकतर्फी शिक्षण नसतं. तुम्ही हा कोर्स केल्याचं कुठे बायोडेटामध्ये तुम्हांला लिहायचं असेल, तर त्याचा पुरावाही नको का? आणि तो विषय तुम्हांला खरंच येतो हे कशाचा आधारावर कुणी मान्य करेल? तर त्यासाठी NPTEL विद्यार्थ्यांच्या परिक्षाही घेतं. या परिक्षेची फी १०००रुपये असते. सध्या या कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे आणि २७ जुलैपर्यंत तुम्हांला त्यासाठी नोंदणी करता येणार आहे. कोर्स पास झाल्यावर तुमच्या कॉलेजमध्ये NPTELचा लोकल चाप्टर असेल, तर अर्धी परिक्षा फी परत मिळते. यासाठी NPTEL देशांतल्या १३० शहरांत ही परिक्षा घेते. कोर्सेस ऑनलाईन असले तरी परिक्षा ऑनलाईन देता येत नाही, ती या १३० पैकी एखाद्या शहरांतल्या सेंटरवरच द्यावी लागते. हा कोर्स करताना वेळोवेळी केलेल्या असाईनमेंट्समधून तुम्हांला ७५%, तर अंतिम परिक्षेचे २५% गुण मिळतात.

बरं या परिक्षा शनिवारी आणि रविवारीच घेतल्या जात असल्याने तुमची इतर कामेही अडत नाहीत.

हे कोर्सेस कोण करु शकते? किती कोर्सेस करता येतात?

या कोर्सेसचे महत्वाचे वैशिष्ट्य हेच आहे की अगदी कुणीही, कुठेही बसून हे कोर्सेस करू शकतात. यासाठी वयाचे, शिक्षणाचे कशाचेही बंधन नसते. कुठलाही कोर्स करण्यासाठी प्रवेश परिक्षाही नसते. १३ वर्षांवरील कुणीही हा कोर्स करू शकतो. विडिओच्या माध्यमातून शिकायचे आणि असाईनमेंटसुद्धा ऑनलाईन जमा करायचे. काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता आणि कोर्स शिकवणारे शिक्षक सगळी उत्तरे देतात. तसेच एकावेळी कितीही कोर्सेस तुम्हांला करता येतात. अट एकच असते, ती म्हणजे एका सेमिस्टरला तुम्ही जास्तीत जास्त ६ कोर्सेसच्या परीक्षा देऊ शकतात. परदेशात राहणाऱ्यांनाही हे कोर्सेस करता येतात, फक्त परीक्षा द्यायची असेल तर त्यांना भारतात यावे लागेल.

तुम्हांला कल्पना नसेल, पण NPTELचे हे कोर्सेस फक्त विद्यार्थीच करतात असं नाही. देशभरातले अनेक शिक्षकही शिकवताना नवीन पैलू मिळावेत, आपलं ज्ञान वाढावं म्हणून हे कोर्सेस करत असतात. इतकंच नाही, तर नोकऱ्या करणारे काही लोकही आपली ज्ञानाची भूक भागवण्यासाठी हे हे कोर्सेस करतात. बरेचदा या कोर्सेसच्या सर्टिफिकेटमुळे लोकांना प्रमोशनही मिळतं, त्यामुळे हे कोर्सेस बऱ्याचजणांसाठी महत्त्वाचे ठरलेले आहेत.

कुठे करायचे हे कोर्सेस?

वेगवेगळ्या २३ शाखांमधले हे कोर्सेस nptel.ac.in या संस्थळावर उपलब्ध आहेत. तिथे जाऊन कोर्सेसची यादी पाहून तुम्ही हव्या त्या कोर्ससाठी रजिस्टर करु शकता.

मग, विचार कसला करत आहात? लॉकडाऊनमध्ये बोर झाला असाल तर स्वतःचे स्किल वाढविण्याची ही मस्त संधी तुम्हांला मिळाली आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही पण आयआयटीयन व्हा!!! रजिस्ट्रेशनसाठी NPTEL च्या वेबसाईटवर भेट द्या आणि आपल्या आवडीचे कोर्सेस निवडा...

सबस्क्राईब करा

* indicates required