computer

विषारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिब्ब्याच्या फळाचे आणि लाकडाचे हे उपयोग तुम्ही कधीच ऐकले नसतील!!

"चांगल्या कामात बिब्बा घालणे" हा वाक्यप्रचार अनेक वेळेस आपण ऐकलेला असतो. अनेक कामांना अडवणारा हा बिब्बा नक्की असतो तरी काय?  

बिब्ब्याचं झाड देशात बहुतांश सर्वत्र आढळतं.  Semecarpus anacardium अर्थात बिब्बा [Family: Anacardiaceae ] नावाचं हे झाड आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी उपयोगी पडतं. आपण मात्र या उपयोगांबद्दल अगदी अनभिज्ञ असतो. आंबा आणि काजूच्या कुटुंबातल्या ह्या सदस्याला भल्लात:, भेला, भिलवा, भिलामु, केरु अशा विविध नावांनी ओळखलं जातं.  बिब्याच्या या अनाकार्डियम सेमेकार्पस या वनस्पती शास्त्रीय नावात खूप मजेशीर अर्थ दडलाय. सेमेकार्पस म्हणजे खुणा करण्यासाठी योग्य फ़ळ आणि अनाकार्डियम म्हणजे ज्याचा आकार हृदयाकृती आहे. म्हणजेच खुणा करण्यासाठी वापरता येऊ शकतं असं हृदयाकृती फळ असलेला वृक्ष तो हा बिब्बा.

साधारण आठ मीटरची उंची गाठणारा हा पानझडी वृक्ष मध्यम सदरात मोडतो. डेरेदार वाढणाऱ्या बिब्याची पानं लांबट आणि जाड देठाची असतात. या पानांच्या खालच्या बाजूस बोटांना जाणवेल अशी बारीक लव असते. साधारण सरता उन्हाळा व भर पावसाळ्यात बिब्ब्याला फुलं येतात. अगदी आपल्या आंब्याला येतात तशीच मोहोर असल्यासारखी फुलं बिब्ब्याला येतात. मात्र ह्या फुलांचे तुरे आंब्यासारखे भरगच्च नसतात. ते थोडे विरळ असतात. साधारण पिवळसर पांढरी असलेली ही लहान फुलं किंचित हिरवट छटा घेऊनच मोठी होतात. ही  नरफुलं आणि मादीफुलं वेगवेगळ्या तुऱ्यांवर येतात. 

साधारण ऑक्टोबर नंतर थंडीत, काजू बोंडासारखीच दिसणारी लहानसर फळं झाडावर धरायला सुरुवात होते. पूर्ण हिवाळा ही फळं मोठी होतात व उन्हाळ्याच्या सुरुवातीस म्हणजेच मार्चपर्यंत ही फळं, अर्थात बिब्बे तयार होतात.  तयार झालेले काळसर रंगाचे बिब्बे झाडावरुन गळून पडतात. हे काळसर बिब्बे साधारण २/३ सेंटिमीटरच्या आकाराची, चप्पट, हृदयाकृती दिसतात. बिब्ब्याच्या फळाच्या मागचा देठ काजूच्या बोंडाप्रमाणे फुगीर व मांसल असा दिसतो. हा मांसल भाग बिबुटी म्हणून संबोधला जातो. या बिबुटीच्या आतला गर अगदी पौष्टीक तर असतोच पण चविष्टही असतो. या गराला गोडांबी या मजेशीर नावाने ओळखलं जातं.

बाकी बिब्ब्याचे लाकूड खुप अवजड लाकूडकामासाठी वापरलं जात नाही. काड्यापेट्या, लाकडी वल्ही, लाकडी फळ्या बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. बिब्ब्याचे लाकूड कापताना यातला विषारी द्रव बाहेर येतो. हा विषारी चीक अंगाला लागल्यावर त्वचेची आग होते आणि नंतर सुजही येते. ह्या विषारी चिकामुळेच हे झाड कापण्याच्या विशेष फंदात कोणी पडत नाही. अर्थात हा चीक त्रासदायक असला तरी त्यामुळे झाडाची उपयुक्तता कमी होत नाही.

ब्लॅक रेझीन म्हणून ओळखलं जाणारं बिब्ब्याचं तेलआपल्या वॉर्निशमधे कीडनाशक म्हणून वापरलं जातं. याच तेलाचा वापर गाड्यांच्या ऍक्सेल वंगणासाठी केला जातो. हे तेल अर्धवट वाळवून लाकूड पोखरणाऱ्या किडींसाठी नियंत्रक म्हणून लाकडावर वापरलं जातं. याचा अजुन प्रचलित उपयोग म्हणजे कपड्यांवर खुणा करण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. म्हणूनच बिब्ब्याला मार्किंग नट म्हणूनही ओळखतात. बिब्ब्याच्या फळातल्या ’फिलॊल’ या रसायनाचा वापर वॉटर प्रुफिंग साहित्य, वेगवेगळे रंग निर्मितीसारख्या अनेक दैनंदिन गोष्टींमध्ये केला जातो. आणि हे सारं आपल्याला माहितच नसतं. व्यावसायिक महत्व असलेले लाखेचे किडे बिब्ब्याच्या झाडावर चांगले वाढतात.

बिब्बा म्हणजे विषारी असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे प्रचलित आहे. अर्थात हा समज काही अंशी योग्य आहे. मात्र बिब्ब्याचे अनेक उपयोग आयुर्वेदात दिले आहेत. खोकला, दमा, अपचन, सूज, त्वचेचे आजार यांवर उपचारासाठी याचा उपयोग निष्णात वैद्य करतात. बिब्बा अनुभवी व निष्णात वैद्यकिय मार्गदर्शानाखाली घ्यावा. कारण याचे तीव्र गुणधर्म शरीरास हानीकारक ठरू शकतात. अलिकडेच अनेक ठिकाणी सुरु असलेल्या संशोधनातून निष्पन्न होतंय की कर्करोग, हृदयरोग, जुने त्वचारोग यांवर बिब्बा उपयुक्त आहे. शंभर टक्के भारतीय असलेलं हे झाड कमी पावसाच्या भागात उत्तम वाढतं. बिब्ब्याच्या बिया सहज रुजतात आणि बाळरोपं सहज वाढतात. आपली वनसंपदा जोपासतानाच डोळसपणे व्यावसायिक फायदा होत असेल तर उत्तमच.

इतकी वर्षं बिब्बा हे फळ असतं इतकंच तुम्हांला माहिती असेल. पण हे फळ आणि झाड इतकं उपयोगी असेल असा कधी विचार केला होतात का?

 

लेखिका- रुपाली पारखे-देशिंगकर

सबस्क्राईब करा

* indicates required