नोकरी मिळाली नाही म्हणून याने तर स्वतःची एसबीआय ब्रँच उघडली !!
बँकेचे कर्ज देतो म्हणून किंवा चिटफंड, म्युच्युअल फंड यांच्या नावाखाली गंडा घालणे भारतात नवीन नाही. पण थेट खोटी बँक उघडून पैसे हडप केल्याचं कधी ऐकलंय? तर आता ते ही घडलंय. एकंदरीत दर दिवसागणिक एकाहून एक विचित्र घटना समोर येत आहेत.
ही घटना आहे तामिळनाडूमधल्या कुडलोरची. एक माजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याचा १९ वर्षांच्या मुलाने नोकरी मिळाली नाही म्हणून जरा मोठाच उद्योग केला. काय केले? तर चक्क स्टेट बँकेची खोटी शाखा उघडली आणि त्यातून लोकांना गंडा घालण्याचा उद्योग हा गडी करू पाहत होता. वेळीच प्रकरण उजेडात आले आणि कित्येक लोक फसवणूक होण्यापासून वाचले.
कमल बाबू असे या हिरोचं नाव आहे. त्याचे आईवडील दोघेही एसबीआयमध्ये होते. वडील १० वर्षांपुर्वी वारले आणि आई दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाली. त्याने वडिलांच्या जागी नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करून पाहिले, पण त्याला त्यात काय यश मिळाले नाही. आईवडिलांसोबत नेहमी बँकेत येणे जाणे असल्याने त्याला बँकिंगबद्दल बरीच माहिती होती. याचाच फायदा घेऊन गड्याने स्वतःची बँक काढली.
एसबीआयच्या एका कर्मचाऱ्याने ही बँक उघडलेली पाहिली. त्याने मुख्य कार्यालयात जाऊन नवीन ब्रँच उघडली का म्हणून चौकशी केली. त्यात त्याला समजले की बँकेने कुठलीच नविन शाखा उघडली नाहीये. म्हणून मग बँकेचे कर्मचारी या कमलबाबूच्या बँकेत गेले तेव्हा त्यांना तिथे सगळं काही हुबेहुब एसबीआयच्या शाखेसारखंच दिसलं. त्यांनी थेट पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांनी या प्रकरणात कमल आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या टोळीने स्टॅम्प, पासबुक वगैरे अगदी सेम टू सेम बनवले होते. बँक सुरु व्हायच्याआधीच बिंग फुटल्याने कुणाचीच फसवणूक झालेली नाही. या निमित्ताने भारतीयांची डोकॅलिटी किती भन्नाट असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
या घटनेनंतर लोकांनी एसबीआयची खेचायला सुरुवात केली आहे. त्यनिमित्ताने या सोशलमिडिया पोस्ट्स् पाहूनच घ्या.




