computer

इन्स्टंट कॉफीला आहे तब्बल २५०वर्षांचा इतिहास!! आपण आज पितो तीही ८० वर्षांहून जास्त जुनी आहे..

"हो शुरु हर दिन ऐसे, हो शुरु हर पल ऐसे..." आठवते ना ही जाहिरात? चहा कितीही जवळचा असला तरी कॉफी खास क्षणांची साक्षीदार असते. मग कधी साखरमिश्रित दुधात घातलेली इन्स्टंट कॉफी, तर कधी साखरेसोबत घोटलेली तर कधी साऊथ इंडियन हॉटेलातली फिल्टर कॉफी. पण फिल्टर कॉफी रेस्टॉरंटमध्येच, घरी? इन्स्टंट कॉफी!! या इन्स्टंट कॉफीचा इतिहास माहित आहे? नाही ना? चला तर मग, जाणून घेऊया हा इतिहास..

पहिली इन्स्टंट कॉफी तयार झाली ती १७७१ साली ब्रिटनमध्ये!! त्यावेळी त्याला कॉफी कंपाउंड म्हटले जात असे आणि ब्रिटिश सरकरकडे तिचे पेटंट  होते. अमेरिकेत पहिली इन्स्टंट कॉफी तयार व्हायला १८५१ उजाडावे लागले. अमेरिकेत गृहयुद्ध सुरू होते आणि इन्स्टंट कॉफीवर प्रयोग करून बनवलेले केक अमेरिकन सैनिकांना रेशन म्हणून देण्यात येत असत.

पुढे न्यूझिलॅंडमधल्या इंटरकारगिल या शहरातल्या डेव्हिड स्ट्राँग यांनी इन्स्टंट कॉफी तयार केली १८९० साली. त्यांनी याचे पेटंटसुद्धा घेतले. यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की थोड्याफार काळाने युरोप, अमेरिकेत इन्स्टंट कॉफीचा प्रसार होत होता. इन्स्टंट कॉफीच्या उत्पादनासाठी ड्राय हॉट एयर म्हणजेच कोरडी गरम हवा पद्धतीचा वापर करण्यात येत असे.

इन्स्टंट कॉफीला तेव्हा विद्राव्य कॉफी पॉवडरसुद्धा म्हटले जात. ही कॉफी सर्वात योग्य अशा पद्धतीने तयार केली ती जपानी-अमेरिकेन केमिस्ट साटोरी कातो यांनी. शिकागोमध्ये १९०१ साली त्यांनी ही कॉफी तयार केली. लागलीच दोन वर्षांत १९०३ साली त्यांनी त्याचे पेटंटसुद्धा घेतले. जी. सी. एल. वाशिंग्टन या अमेरिकन शास्त्रज्ञांने कातो यांच्या पाठोपाठ स्वतःची वेगळी अशी इन्स्टंट कॉफी तयार केली. पुढे १९१० दरम्यान त्यांनी ती विकायलाही सुरुवात केली. पहिल्या महायुद्धावेळी ही इन्स्टंट कॉफी खूपच प्रसिद्ध झाली.  त्यावेळी उपलब्ध असलेली सगळी कॉफी अमेरिकन सरकारने विकत घेतली आणि ती आपल्या सैनिकांना रेशन म्हणून वाटण्यात आली.

१९३० येतायेता ब्राझील कॉफीच्या बाबतीत वरचढ ठरला होता. पण काही काळाने तो मागे पडला. ही कमतरता भरून काढण्यासाठी ब्राझील कॉफी इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने नेस्ले कंपनीला ब्राझीलला या समस्येतून बाहेर काढू शकेल अशी कॉफी बनवायला सांगितली. म्हणजेच नेस्लेला जास्त प्रमाणात विकली जाणारी कॉफी बनवायची होती. मग काय, नेस्ले लागली कामाला!!

सुरुवातीला नेस्लेने बनविलेल्या कॉफीला काय दर्जा नव्हता. मग नेस्ले पुन्हा कामाला लागली. त्यांनी अनेक वर्षे या विषयावर संशोधन केले. शेवटी १९३७ साली तो दिवस उजाडला!! नेस्ले कंपनीत संशोधक असलेल्या मॅक्स मॉर्गनथॅलर यांनी इन्स्टंट कॉफी बनविण्याची नवीन पद्धत शोधून काढली. या नवीन प्रॉडक्टला नाव देण्यात आले नेसकॅफे!!!

नवीन तयार केलेली कॉफी नेस्लेने लागलीच विकायला सुरुवात केली. नवीन पद्धतीने बनवली असल्यामुळे या कॉफीची चव इतरांपेक्षा नक्कीच चांगली होती. साहजिकच या कॉफी कमी वेळेत प्रसिद्ध झाली. दरम्यान दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. सैनिकांना जेव्हा ही कॉफी देण्यात आली तेव्हा तेसुद्धा या कॉफीचे चाहते झाले. 

१९५४ साली नेसकॅफेने एक नवीन पद्धत शोधली. कॉफीमध्ये कार्बोहायड्रेट न मिळविता कॉफी बनविण्याची ही पद्धत होती. सध्या मिळणारी सुधारित इन्स्टंट कॉफी १९६० साली तयार झाली. यासाठी संचय पद्धतीचा वापर करण्यात आला. यात इन्स्टंट कॉफीचे कण खूप तापविले जातात. यामुळे ते एकमेकांना चिकटतात. यात समस्या अशी असते की थोडे जास्त जरी तापवले गेले तरी फ्लेवरची चव बिघडते. यानंतर आली फ्रीज ड्राईंग पद्धत. पुढे हीच पद्धत रूढ झाली. या पध्दतीमुळे चांगल्या प्रतीची तसेच चांगल्या चवीची कॉफी तयार होऊ लागली. १९८६ साली नेसकॅफेने डीकॅफेनेटेड कॉफी तयार केली म्हणजेच ज्यात जराही कॅफिन नसते.

तर वाचकहो, आपल्या आवडत्या इन्स्टंट कॉफीमागे हा एवढा मोठा इतिहास आहे. छान रिमझिम पावसात वाफाळत्या कॉफीचा घोट घेताना हा इतिहास आठवा आणि कॉफीचा गंध मनात भरून घ्या.. 

सबस्क्राईब करा

* indicates required