जगातल्या सर्वाधिक लांबलेल्या उपोषणाची अखेर!!
भारतात जम्मू-काश्मिर मध्ये १९९०पासून आणि अरूणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, आसाम, मिझोरम आणि त्रिपुरा या सर्व राज्यांत १९५८ पासून एक कायदा लागू आहे. त्याचं नांव- आर्म्ड फोर्स स्पेशल पावर एक्ट किंवा अफ्स्पा. या कायद्यामुळं लष्कराला त्या-त्या राज्यांत पाहताक्षणी गोळी घालण्याचे विना वॉरंट अटक करण्याची परवानगी मिळते. पण त्याच्याहीपुढं जाऊन लष्करानं तिथं कुणालाही अटक करण्यासोबतच, त्यांची आणि त्यांच्या घरांचीही विनाकारण झडती घेणं हे सगळं घडलंय, अजून घडत आहे.
२ सप्टेंबर २०००ला मणिपुरची राजधानी इंफाळ इथं आसाम रायफल्सच्या जवानांनी याच कायद्याचा आधार घेऊन १० निरपराध लोकांना ठार केलं. तेव्हापासून हा अफ्स्पा रद्द होण्यासाठी गेली १६वर्षे उपोषण करत आहेत. अन्न आणि पाण्याचा एकही थेंब त्यांनी इतकी वर्षे तोंडात घेतला नाहीय. अगदी दातही त्या कापसाच्या बोळ्याने साफ करत. पण उपोषण केले म्हणून सरकारने हा कायदा तर रद्द केला नाही, उलट आत्महत्येच्या आरोपाखाली इरोम शर्मिलांना अटक केलं. उपोषण सुरू असतानाही त्यांना नाकातून नळीवाटे अन्न दिलं जात होतं. आणि कायद्यानुसार अशा गुन्ह्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ अटक केलं जाऊ शकत नसल्यानं एका वर्षानंतर सुटका करून त्यांना पुन्हा लगेच अटक करण्यात यायचं. हा प्रकार गेली १६ वर्षे असाच चालला होता. त्यांची प्रकृती आणि नाकातून दिल्या जाणार्या अन्नामुळं त्यांच्या हॉस्पिटलातल्या खोलीचाच सरकारने तुरूंग केला होता.
आज ९ ऑगस्ट २०१६रोजी इरोम चानू शर्मिला यांनी मध चाटून हे सोळा वर्षांचं उपोषण संपवलं. उपोषणाच्या मार्गाने हा कायदा रद्द होत नाहीय हे इरोम शर्मिलांना दिसून आलंय. त्यांना आता राजकारणात जाऊन मुख्यमंत्री बनायचंय. तेव्हा त्या हा ’अफ्स्पा’ कायदा रद्द करण्याचे सारे प्रयत्न करणार आहेत. मणिपूरच्या या ’आयर्न लेडी’ला त्यांच्या पुढच्या ध्येयांसाठी बोभाटा.कॉमच्या लाख लाख शुभेच्छा!!




