computer

लोकांना मॅनहोलपासून वाचवण्यासाठी पावसात ७ तास उभ्या राहिलेल्या रणरागिणी !!

माणूस हा स्वार्थी प्राणी आहे हे तर आपण केव्हाच मान्य केलं आहे. पण तरीही स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार करणारे परोपकारी लोक जगात कमी असले तरी असे लोक शिल्लक आहेत हे सिद्ध करणाऱ्या घटना अधूनमधून घडत असतात.

मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. २९ ऑगस्ट २०१७ ला डॉ. दिपक अमरापूरकर यांचा परळ क्षेत्रात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. ते घराजवळ अगदी पोचले होते आणि ही दुर्घटना घडली होती. तब्बल दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला होता. तसेच एका तरुणाचासुद्धा त्याचवर्षी मृत्यू झाला होता.

काही दिवसांपूर्वी मुंबईत २००५ ची आठवण करून देणारा पाऊस झाला. अशा या मुसळधार पावसात कांता मूर्ती कलन नावाच्या ५० वर्षीय काकू एका मॅनहोलजवळ उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सतर्क करत होत्या, जेणेकरून कोणी त्यात पडू नये. त्यांचे हे काम थोडेथोडके नाही, तर ७ तास सुरू होते. महापालिकेचे लोक आले तेव्हाच त्यांनी ती जागा सोडली.

कांताबाई या दादर मार्केटमध्ये फुले विकून स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या ८ मुलांपैकी सध्या २ मुले त्यांच्यासोबत असतात. त्यादिवशी जसजसा पाण्याचा जोर वाढत गेला तसतसे पाणी इकडे तिकडे शिरू लागले.

कांताबाईंनी एक मोठे कापड घेतले आणि रस्त्यावरील मॅनहोल उघडले जेणेकरून पाणी मॅनहोलमधून वाहून जाऊ शकेल. तरीसुद्धा साचलेलं पाणी कमी होत नव्हते तर त्यांनी तेथेच ठाण मांडले. सकाळी ६ ते दुपारी १ पर्यंत तहानभूक विसरून त्या तेथे उभ्या होत्या.

कांताबाईंनी केलेल्या या कामाबद्दल लोकांनी त्यांचं कौतुक केलं आहे, त्यांचे आभारही मानले आहेत. त्यांच्या पडझड झालेल्या घराची दुरुस्ती आणि तसेच अनेक संस्थांनी व लोकांनी जवळपास दीड लाखांची मदत केली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required