computer

पाणी आणि जमिनीवर चालणारी सायकल? का, कशी आणि किती रुपयांत बनली? वाचा सैदुल्ला आणि त्यांच्या शोधाची गोष्ट !!

फक्त शिकलेले लोकच भन्नाट कामं करू शकतात या समजाला छेद देणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. पण काही कामं मात्र शिक्षणानं चांगली साध्य होतात हे ही तितकंच खरं आहे. म्हणजे पाहा, एखादा शोध लावायचा झाला तर त्यासाठी अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. पण एका दहावी पास आणि तेही एका आजोबांनी एक भन्नाट शोध लावला आहे.

या आजोबांचं नाव आहे सैदुल्ला. वय ६१ वर्षं! इतरांप्रमाणेच आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. पण एका गोष्टीबद्दल त्यांची ओढ मात्र कधीच कमी झाली नाही. ती म्हणजे काहीतरी शोध लावत राहणे. याच त्यांच्या शोधप्रेमाने त्यांना देशभरात ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या शोध लावण्याला कधी सुरुवात झाली हे माहित नाही, पण जुनं प्रेम आहे हे मात्र नक्की!!

त्यांच्या एका शोधासाठी २००५ साली त्यांना शनल ग्रासरूट इनोव्हेशन अवॉर्ड मिळालं आहे. आजवरचा त्यांचा महत्वाचा शोध म्हणजे त्यांनी बनवलेली पाण्यावर चालणारी सायकल!! यामागील गोष्ट देखील मोठी रंजक आहे.

१९७५साली बिहारमध्ये मोठा पूर आला होता. चांगला तीन आठवडे तो पूर होता. तेव्हा नदी पार करणे हे मोठे कठीण काम होऊन बसले होते. जिथं रस्ते होते तिथे सायकल तर पाणी जास्त असेल तिथे नाव असा प्रवास तेव्हा लोक करत होते. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की, पाण्यावर चालू शकणारी सायकल बनवली तर काय बहार येईल? तसे विचार तर प्रत्येकाच्या मनात येतात, फक्त त्यांच्यात आणि इतरांमध्ये फरक असा होता की त्यांनी फक्त विचार केला नाही, तर ते थेट कामाला लागले.

सैदुल्ला कामाला लागले आणि अवघ्या तीन दिवसांमध्ये त्यांनी सायकल तयार करून दाखवली. त्यात त्यांनी आयताकृती हवेचे फुगे लावले होते. या फुग्यांमुळे सायकल पाण्यात सहज तरंगत होती. नेहमीप्रमाणे हँडल आणि पायडल दिशा आणि वेग देत होते. या फुग्यांचे दोन जोड त्यांनी या सायकलीत वापरले होते. एक जोडी पुढच्या चाकाला, तर दुसरी मागच्या चाकाला बांधली होती. महत्वाचे म्हणजे जमिनीवर चालवताना हे आयताकृती हवेचे फुगे घडी करून बंद करता येत होते. ही सायकल तयार करण्यासाठी त्यांना ६,००० रुपये खर्च आला होता.

सायकल बनवली, पण तिचं टेस्टिंगही व्हायला हवं. सैदुल्लांनी त्यांच्या सायकलवरून पहिला प्रवास पहलघाट ते महेंद्रुघाट या गंगेच्या दोन घाटांदरम्यान केला .त्यानंतरही त्यांच्या परिसरात जेव्हा कधी पूर येत असे तेव्हा या सायकलच्या मदतीने ते अनेकांना एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत पोचण्यासाठी मदत करत असत. थोड्याच दिवसांत सगळीकडे त्यांच्या नावाचा बोलबाला झाला होता.

हे काही त्यांचं एकमेव संशोधन नव्हतं. सैदुल्ला हे नेहमी आपल्या नवनव्या शोधांबद्दल विचार करत असतात. आजवर त्यांनी किल्ली देऊन चालणारा टेबल फॅन, चारा कापण्याची मशीनने चालणारा मिनी वाटरपंप, मिनी ट्रॅक्टर यांसारख्या गोष्टींचा शोध लावला आहे. हे त्यांचं वेड इतकं प्रचंड आहे की या कामासाठी त्यांनी आपलं ४० एकर शेत विकलं आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे सगळे शोध हे जनसामान्यांचे जीवन सुसह्य करण्यात हातभार लावणारे आहेत. सैदुल्ला यांचं त्यांच्या पत्नीवर प्रचंड प्रेम आहे. इतकं की त्यांच्या प्रत्येक शोधाचे नाव ते त्यांची पत्नी नूरजहाँ यांच्या नावावरून ठेवतात.

तसं पाहायचं तर हे हरहुन्नरी सैदुल्ला पंक्चर काढण्याचे काम करतात. यातून येणारे पैसे ते परत नविन शोधासाठी खर्च करतात. सध्या ते चारी दिशांना फिरू शकणारा पंखा तयार करण्यात गुंतले आहेत. हा पंखा तयार झाला तर सगळ्या दिशेला असलेल्या लोकांना पंख्याची हवा खाता येणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required