कुत्रे चक्क गाणी गातात? ही गाणारी प्रजात ५० वर्षांनी पुन्हा कुठे आणि कशी सापडली आहे?

कुत्र्यांच्या अनेक खासियती आहेत. त्यात त्यांचा ऐट, रुबाब, घ्राणेंद्रिये म्हणजे कहरच!! पण कुत्री भुंकायला लागली की अनेकांचे धाबे दणाणतात. अनेकांना त्यांचा आवाज सहन होत नाही. पण जर आम्ही असे म्हटले की कुत्री गाणी सुद्धा म्हणतात!!! ऐकावं ते नवलंच नाही का?
संशोधन म्हणते की गाणे म्हणणे ही फक्त मनुष्य स्वभावाची मक्तेदारी नाही. पण आता चक्क कुत्री गाणी म्हणतात म्हटल्यावर नवल तर वाटेलच. पण शास्त्रज्ञांनी कुत्र्याची अशीही एक प्रजात शोधून काढली आहे जी फक्त गाणीच म्हणत नाही, तर हार्मोनियमसारखा आवाजसुद्धा काढते. पण दुर्दैवाने ही प्रजात गेल्या ५० वर्षांपासून लुप्त झाली होती.
न्यू गिनी नावाच्या एक बेटावर कुत्र्यांची ही आगळीवेगळी प्रजात सापडली आहे. ही कुत्री वेगवेगळे आवाज काढण्यासाठी ओळखली जातात. साहजिकच, ही प्रजात अतिशय दुर्मिळ आहे.
१९७० साली या जातीला लुप्त समजण्यात आले होते. पण चार वर्षांपूर्वी २०१६ साली काही संकेत असे मिळाले ज्यांच्यावरून ही प्रजात अस्तित्वात आहे असे दिसते. संशोधकांची एक टीम जेव्हा इंडोनेशिया, पापुआ या बेटांवर गेली होती तेव्हा त्यांना प्रजातीसारखाच आवाज असलेली काही कुत्री आढळली होती. दोन वर्षांनी हे संशोधक पुन्हा तिथे गेले तेव्हा ते संपूर्ण तयारीनिशी गेले होते. या कुत्र्यांच्या रक्ताचे नमुने ते जाताना सोबत घेऊन गेले. जेव्हा त्यांनी न्यू गिनीमधील गाणाऱ्या कुत्र्यांच्या रक्त नमुन्यांसोबत या नव्या नमुन्यांची तुलना केली तेव्हा त्यांना धक्काच बसला.
न्यू गिनीमधील कुत्र्यांमध्ये आणि या नविन सापडलेल्या प्रजातीमध्ये अनेक गोष्टी सारख्या होत्या. संशोधकांनी यातून निष्कर्ष काढला की हे हायलँड जंगली कुत्री ही न्यू गिनीमधील कुत्र्यांची प्रजात आहेत.
१९७० साली या दुर्मिळ प्रजातीला वाचविण्यासाठी काही कुत्र्यांना प्राणीसंग्रहालय आणि संरक्षण केंद्रांमध्ये सरंक्षित करण्यात आले होते. या प्रयोगातून तेव्हा दोनशे कुत्र्यांची पैदास करण्यात आली होती. पण आता नैसर्गिक प्रजाती सापडल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
निसर्गात काय काय चमत्कार सापडतील याला अंत नाही. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात हे चमत्कार जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पाहता देखील येतात हे ही आहेच. हो ना?