रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी सोप्या करणाऱ्या २० साध्यासोप्या आणि उपयोगी टिप्स!!
            आपलं रोजचं आयुष्य इतकं धावपळीचं बनलं आहे, की सगळ्यांनाच वेळ वेचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पण तुमच्या कधी हे लक्षात आलं आहे का की वरवर छोट्या वाटणाऱ्या गोष्टीच प्रत्यक्षात जास्त मोलाच्या असतात. त्याच पुढे जाऊन मोठ्या होतात. अन वेळीच त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून आयुष्य सोपं करणाऱ्या काही टिप्स खास वाचकांसाठी. यांचा वापर करा आणि आयुष्य सोपं करा...
१)
प्रवासात अनेकदा खूप लोकांचं सामान एका ठिकाणी एकत्र ठेवलं जातं. त्यातून स्वतःचे सामान शोधण्यात खूप वेळ जातो. अशावेळी तुमच्या बॅग व अन्य गोष्टींना एक लेस वा एखादा चमकणाऱ्या कापडाचा तुकडा वरच्या बाजूला बांधा. बाकी सामानातून तुमचे सामान लगेच मिळेल.
२)
खोलीत ए.सी. किंवा दुसऱ्या कारणामुळे कुबट, घाणेरडा दर्प येत असेल तर ए.सी.वर ड्रायर पेपर टाकून ए.सी. सुरू करा.
३)
मोबाईलचा वापर व्हिडीओ बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करत आहात? अशावेळी मोबाईल एकाच स्थितीत धरून ठेवल्याने हाताला त्रास होऊ शकतो. तेव्हा तुमच्या गॉगलचा उपयोग मोबाईल ठेवण्याचा स्टँड म्हणूनही करू शकता.
४)
तुमच्या चपलांना वॉटरप्रूफ करण्यासाठी बी वँक्स म्हणजे मधाच्या पोळ्यातील मेणाचा वापर करू शकता. याचे क्यूब्जही मिळतात. ते चपलांना सगळीकडून लावल्यास त्या वॉटरप्रूफ होतील.
५)
शर्टला इस्त्री करताना बटनांजवळचा भाग दुसऱ्या बाजूला वळवून आत घातल्यास त्या ठिकाणी इस्त्री करणे सोपे जाते.
६)
फळे साठवणीच्या टोपलीमध्ये फळे ठेवण्याआधी तळाशी जुना वर्तमानपत्राचा कागद ठेवा. त्यामुळे फळांचा रस जरी बाहेर आला तरी त्यात शोषला जाऊन फळे व टोपली दोन्ही कोरडे राहतील.
७)
पैशांच्या पाकिटामध्ये कार्ड ठेवताना ते असे ठेवा जेणेकरून पत्ता, फोन नं. यासारखी सगळी महत्त्वाची माहिती दर्शनी भागातून सहज दिसेल.
८)
प्रवासादरम्यान वापरलेल्या-मळलेल्या कपड्यांबरोबर कायम एक सुगंधी साबण ठेवा. यामुळे त्या कपड्यांचा दर्प कमी होईल.
९)
बॅटरी सेल व्यवस्थित सुरू आहे की नाही ह्याची तपासणी करण्यासाठी त्याला ६ इंचांवरून खाली टाका. जर तो एकदाच बाउन्स झाला तर तो अजूनही काम देत आहे आणि जर तो गोल गोल फिरत राहिला तर तो कामातून गेला आहे असे समजावे.
११)
सुरी वापरून झाल्यावर धुवून कोरडी करा आणि पात्याला व्हँसलीन लावून ठेवा. गंज चढणार नाही.
१२)
चष्म्याच्या काचा धुरकट झाल्या आहेत? ओ दी कोलनचे दोन थेंब टाका आणि स्वच्छ कापडाने पुसा.
१३)
लसूण लवकर सोलला जावा म्हणून पाकळ्या वेगवेगळ्या करून तव्यावर नुसत्याच भाजा.
१४)
घर, ऑफिस या ठिकाणी रंगकाम करत असताना पेंटब्रशचा जास्तीचा रंग निथळणे हे तसे वेळखाऊ व जिकीरीचे काम. पण हेच काम एका रबरबँडच्या साहाय्याने सोपे व कमी वेळात होते. त्यासाठी रंगाच्या डब्ब्याला साधारण मध्यभागी येईल अशा बेताने रबरबँड लावा. ब्रश निथळताना या रबराबँडचा वापर केल्यास ब्रश निथळणे सोपे जाईल.
१५)
लाकूड हे उष्णतेचे दुर्वाहक असल्याने गरम भांड्यातील मिश्रण ढवळल्यावर ढवळण्यासाठी वापरलेला लाकडी डाव/ कालथा ह्या गोष्टी त्यावर सहज ठेवू शकता. चटका बसत नाही.
१६)
कानातले टॉप वा एखादा लहान मणी अशी एखादी छोटी गोष्ट शोधणे हे खूप अवघड काम. पण हे काम घरात व्हॅक्युम क्लीनर असेल तर त्याच्या साहाय्याने करणे अतिशय सोपे आहे. व्हॅक्युम क्लीनरच्या एका बाजूला पायमोजा बांधा व क्लीनर सुरू करून फिरवा. हवेच्या झोताने ती वस्तू पायमोज्याला चिकटेल.
१८)
घाईच्या वेळी कपडे पटकन सापडावे यासाठी घड्या आडव्या ठेवण्याऐवजी त्या उभ्या ठेवाव्यात.
२०)
कीबोर्डचा बेस निखळला असल्यास त्याला एका जागी स्थिर ठेवण्यासाठी बाईंडिंग क्लिप्सचा उपयोग करा. ह्या क्लिप्स बोर्डच्या मागच्या बाजूला लावल्यास कीबोर्ड एका जागी स्थिर राहतो.
या होत्या काही साध्या सोप्या टिप्स. त्या वापरून बघा आणि तुम्हाला काही याव्यतिरिक्त टिप्स माहिती असतील त्याही आम्हाला सांगा.
लेखिका : स्मिता जोगळेकर
											
											
											
											
											
											
											
											
											
											
											
											
											
											
											
											



