रेल्वे स्टेशनवरची ही सोशल डिस्टंसिंगची वर्तुळं व्हायरल का होत आहेत? तुम्हीच पाहा !!

लॉकडाऊनचे दिवस संपत आलेत. माणसं घराबाहेर पडतायत. पण कोरोनाचं संकट दूर झालेलं नाही. रेल्वेसारख्या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणं अत्यंत कठीण होऊन बसणार आहे. अशावेळी रेल्वे विभागाने सोशल डिस्टंसिंगसाठी एक ठराविक अंतर सोडून वर्तुळ आखले आहेत. प्रवाशांनी या वर्तुळातच उभं राहायचं आहे.
रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी ही योजना किती काम करेल ते भविष्यच ठरवेल, पण सध्या ही वर्तुळं वेगळ्या कारणांनी गाजत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वर्तुळं आखताना आपण नेमकं कुठे वर्तुळ आखतोय हेच बघितलेलं दिसत नाहीय. त्यांनी केलेलं काम सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
So these guys made circles in some station in West Bengal at awkward places to maintain Social distancing 1/2 pic.twitter.com/3tTw8JuOVe
— Anamika (@MiishNottyAna) September 12, 2020
फोटोत रेल्वे स्थानाकाचं नाव दिसत नाही, पण असं म्हणतात की हे स्टेशन पश्चिम बंगालमधलं बंगाव स्टेशन आहे. वर्तुळ आखण्याचं काम ज्या कोणाला दिलं होतं त्याने ते काम एवढ्या इमानदारीने केलंय की त्याने प्रवासी पोहोचू शकत नाहीत अशा जागीसुद्धा वर्तुळ आखून ठेवलेत. हे लक्षात आल्यावर फोटोत दिसणाऱ्या मुलाने चक्क प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे.
या मुलाचं नाव समजलेलं नाही. अनामिका नावाच्या युझरने हे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. आतापर्यंत ७९०० पेक्षा जास्त लोकांनी हे ट्विट लाईक केलं आहे. ट्विट केल्यापासून आतापर्यंत लोकांनी कमेंट आणि मिम्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका ट्विटर युझरने म्हटलंय की, "असं वाटतं की वर्तुळ तिथे आधीपासून होते, स्टेशन नंतर बांधण्यात आलं."
तर, तुमच्या भागात पण असं काही घडलं आहे का? घडलं असल्यास फोटो नक्की शेअर करा.