computer

भारतीय जडजवाहीरांना वाहिलेल्या खास डायरीतील काही खास चित्रं बोभाटाच्या वाचकांसाठी...

२०२० वर्षं संपतच आले म्हणावे की संपुष्टात आले आहे म्हणावे, अशी सध्याची परिस्थिती आहे. एरवी या तीन महिन्यांत येणार्‍या वर्षाच्या कॅलेंडर-डायर्‍या छापणार्‍या कंपन्या आणि त्यांचे ग्राहक खडबडून जागे होऊन कामाला लागायचे. नवनव्या कल्पना 'थीम' आखल्या जायच्या. त्यानुसार कलाकार शोधले जायचे. इतरांपेक्षा आपल्या कंपनीची डायरी-कॅलेंडरं काही वेगळी आणि लोकप्रिय व्हावी यासाठी धडपड सुरु व्हायची. कंपन्यांसाठी नवे वर्षं हा 'ब्रँडींग' साठीची पर्वणी असायची. अमुक एका कंपनीची डायरी आपल्याला मिळावी म्हणून ऑफीसात 'सेटींग' लावली जायची.

गेल्या काही वर्षांत भिंतीवर लावायच्या कॅलेंडरची मागणी खूपच कमीच झाली होती, पण डायरीचे मार्केट मात्र आहे तसंच होतं. या वर्षी बहुतेक कंपन्या डायर्‍या छापतील का नाही ही शंकाच आहे. डायर्‍या छापल्या तर किती छापतील कुणास ठाऊक! भारत सरकारने यावर्षी डायरी कॅलेंडरवर खर्च करायचाच नाही असं ठरवलं आहे. हाच निर्णय सार्वजनीक क्षेत्रातील उद्योगांना लागू केला गेला आहे. आमच्या 'बोभाटा'च्या लायब्ररीत काही खास डायर्‍या जपून ठेवल्या आहेत. त्यापैकी एका डायरीतील काही खास चित्रं आज तुमच्यासमोर मांडत आहोत.

ही डायरी १९६९ सालची टॉमको म्हणजे टाटा ऑइल मिल्स या कंपनीची आहे. या डायरीची मध्यवर्ती संकल्पना 'इंडियन ज्वेलरी' म्हणजे भारतीय जडजवाहीर अशी होती. डायरीच्या सुरुवातीला या विषयावर एक सुरेख अभ्यासपूर्ण लेख दिलेला होता. सोबत गझदर प्रायव्हेट लिमिटेड, नानूभाई ज्वेलर्स, त्रिभुवनदास भीमजी झवेरी, खेरातीलाल अँड सन्स आणि मिनाक्षी मदुराई देवस्थानाच्या संग्रहातील भारतीय दागिन्यांची २८ रंगीत छायाचित्रे देण्यात आली होती.

१. आणि २. मोगल शैलीचा नवरत्न हार.

३. सोन्यात गुंफलेल्या मोत्यांचं टोपरं!

४. नीलम, पाचू आणि मोत्यांनी जडवलेली केलेली कर्णभूषणे

५. पाचू आणि हिर्‍यांचा शिरपेच.

६. राजस्थानी शैलीचे नवरत्न पेंडंट.

७. जेड (एक प्रकारचे उपरत्न) मध्ये पाचू आणि माणिकांनी बनवलेले कडे.

८. मदुराईच्या राजा थिरुमलाई नाईक याने देवीला अर्पण केलेला मुकुट.

९. ठुशी : हिरे आणि मोत्यात बनवलेला गळ्यात घालायचा दागिना.

१०. दोन इंच व्यासाचे सोन्यात घडवलेले पदक, यात सरदार आणि त्याची स्त्री यांचे चित्र आहे.

आम्ही आधी लिहिल्याप्रमाणे या यादीत आणखी काही छायाचित्रे बाकी आहेत. या नंतरच्या भागात आपण ती बघणार आहोतच!

सबस्क्राईब करा

* indicates required