computer

खास खास मराठी रेसिपीजनी जगभर व्हायरल झालेल्या आपल्या आजीबाई !!

यशाला वयाचे बंधन नसते असे म्हटले जाते. आज यशाच्या शिखरावर असलेल्या अनेक कंपन्या त्यांच्या संस्थापकांनी पन्नाशी ओलांडल्यावर स्थापन केल्या होत्या. टेक्नॉलॉजीमुळे तर स्वतःचे कौशल्य दाखवणे अजूनच सोपे झाले आहे. 

लॉकडाऊन झाल्यापासून वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करणे आणि घरात वेगवेगळे पदार्थ तयार करणे याची जणू सगळीकडे शर्यतच लागली होती. साहजिक या काळात रेसिपी सांगणाऱ्या युट्युब चॅनेल आणि वेबसाइटसचा भाव वधारला होता. पण हे मार्केट ओळखले ते एका ७० वर्षांच्या आजीबाईने!! त्यांनी रेसिपीचे व्हिडीओ थेट युट्युबला अपलोड करण्यास सुरूवात केली.

सुमन धामणे असे या आजीबाईचे नाव!! कित्येक मोठमोठे यु ट्युबर्स व्ह्यूजसाठी झटत असताना सुमन आजीने मात्र कमाल केली. 'आपली आजी' या नावाने असलेल्या चॅनेलनेचक्क ६ महिन्यात ६ लाख युट्युब सबस्क्रायबर्सचा आकडा पार केला आहे. आजीबाईची ही गोष्ट सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आहे. ज्या पद्धतीने आजीबाईची गोष्ट वायरल झाली आहे ते बघता लवकरच १० लाखाचा टप्पा देखील आजीबाई गाठतील यात शंका नाही.

आजीचे गाव हे नगर जिल्ह्यातील सरोळा कासार हे आहे. ही किमया जरी आजीने साध्य करून दाखवली असली तरी त्यामागे डोक्यालिटी मात्र त्यांच्या नातवाची आहे. नववीत शिकणाऱ्या त्यांचा नातू यश याला आपल्या आजीच्या रेसिपीवर विश्वास होता, म्हणून त्याने आजीच्या रेसिपीचे विडिओ युट्युबवर टाकायला सुरुवात केली. सुमन आजीला यु ट्युब कडून क्रियेटर्स अवॉर्ड देखील मिळाला आहे.

आजीबाईच्या या गोष्टीवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे कौशल्य असेल तर वय कोणतेही असो स्वताला सिद्ध करता येऊ शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required