आईच्या व्हॉट्सऍप स्टेटसमुळे चोर कसा पकडला गेला ?
नवी वस्तू हातात आली रे आली की सोशल मीडियावर स्टेटस टाकून इतरांपुढे ती मिरवण्याची लोकांना काय ती हौस!! पण याच सोशल मीडियामुळे हवा होत असली तरी कधीकधी गोष्ट अंगलटदेखील येऊ शकते.
याचा चांगलाच अनुभव एका बाईला हैदराबाद येथे आला आहे. या बाईच्या मुलाने तिच्यासाठी सोन्याचे दागिने आणले या आनंदात तिने दागिने घालून काढलेले फोटो व्हॉट्सऍप स्टेटसला ठेवले. पण हे दागिने मुलाने विकत नाही, तर चोरून आणले होते ही गोष्ट त्या बिचाऱ्या बाईला माहीत नव्हती.
तुले बाईचे स्टेटस त्यांचे शेजारी असलेल्या अंगिदी रविकिरण यांना दिसले. रविकिरण यांच्या घरी गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एक घटना घडली होती. एकेदिवशी ते मंदिरात गेले होते, तिकडून परत आल्यावर त्यांचे घर त्यांना उघडे दिसले. त्यांनी विचार केला आपण घर उघडे सोडून गेलो असणार. पण घरात गेल्यावर त्यांच्या लक्षात आले, आपल्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. त्यांनी या गोष्टीची पोलिसात तक्रार देखील नोंदवली होती. आता बाजूच्या घरात राहणाऱ्या बाईच्या व्हाट्सऍप स्टेटसला तेच दागिने दिसल्यावर त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
रविकिरण यांनी पोलीस स्टेशन गाठले, पोलिसांनी चौकशी केली असता त्या बाईचा मुलगा जितेंद्र यानेच चोरी केली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला तर बेड्या ठोकल्याच, पण त्याच्या आईलादेखील नोटीस पाठवली आहे.




