हातापायांना ६ बोटे असलेलं कुटुंब.. कुठे आहे हे कुटुंब आणि ६ बोटांमुळे त्यांच्यावर कोणतं संकट ओढवलं आहे?

आजवर तुम्ही हाताला किंवा पायाला ६ बोटे असलेले अनेक लोक बघितले असतील. बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनच्या हाताला असलेल्या ६ बोटांची चर्चा त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासून होत आहे. कोई मिल गया सिनेमात जादूच्या बोटांची कल्पना हृतिकच्याच बोटांवरून घेतली होती, हे तुम्हांला कदाचित माहित असेलच. तो सुपरस्टार आहे, त्याच्या सगळ्याच गोष्टींच लोकांना कौतुक असतं.
पण सर्वांचे नशीब काही एवढे भारी नसते. आज आम्ही बिहारमधील अशा कुटुंबाची कहाणी सांगणार आहोत. ज्यांच्या घरातील सदस्यांची लग्ने फक्त हाताला आणि पायाला ६ बोटे आहेत, म्हणून होत नाहीत. बिहारमधील गया इथं एक कुटुंब आहे. या कुटुंबातल्या तब्बल २२ सदस्यांच्या हातांना आणि पायांना ६-६ बोटे आहेत. म्हणजेच एका व्यक्तीला २४ बोटे.
या कुटुंबाचे प्रमुख आहेत सुखदी चौधरी नावाचे गृहस्थ. सुखदी चौधरी यांच्या कुटुंबात ६ बोटांची सुरुवात त्यांच्या आजीपासून झाली. त्यांनंतर 'सिलसिला' सुरू झाला जो अजूनही संपलेला नाही. लग्नासाठी बघायला आलेले लोक या कुटुंबातील लोकांच्या हातापायांकडे बघूनच नकार देतात. सुखदी चौधरी सांगतात की एकवेळ मुलांची तरी लग्ने होतात. पण मुलींच्या बाबतीत तर लग्नाची अडचण खूप जास्त येत असते. मुलगी सुंदर असेल तरी फक्त ६ बोटे आहेत, या कारणावरून लग्नास नकार दिला जातो.
तर वाचकहो, इतरांपेक्षा वेगळं असणं काही लोकांसाठी मोठी समस्या ठरते. प्रत्येकालाच हृतिकप्रमाणे कौतुक मिळत नाही. अशा व्यक्तींना आता इतरांप्रमाणेच वागवण्याची आवश्यकता आहे.