भाग २: गिनीज बुकमध्ये नोंदवलेले ७ भन्नाट आणि विचित्र जागतिक विक्रम !!

भाग १: गिनीज बुकमध्ये नोंदवलेले ८ भन्नाट आणि विचित्र जागतिक विक्रम !!
गिनीज बुक मध्ये नाव यावं म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही लोक अत्यंत वेगळ्या पद्धतीने जागतिक विक्रम नोंदवतात. अशाच आगळ्यावेगळ्या जागतिक विक्रमांची माहिती आम्ही तुम्हाला गेल्या भागात दिली होती. आज आम्ही त्याचा पुढचा भाग घेऊन आलो आहोत. चला तर सुरुवात करूया.
१. बेनेटन समूहाने सर्वात मोठा कंडोम तयार करण्याचा विक्रम केला.
१९९३ मध्ये, बेनेटन या कापड उत्पादक कंपनीने जागतिक एड्स दिनाच्यानिमित्ताने सर्वांत मोठा कंडोम तयार केला. याची लांबी ७२ फूट इतकी लांबलचक होती. त्यांनी फ्रान्समधील पॅरिस येथे "एड्सपासून सुरक्षा" असे प्रबोधन करण्यासाठी याचा वापर केला.
२. सर्वात लांब पाय असण्याचा विक्रम मॅकी कुरिन हिच्या नावावर आहे.
२०२० मध्ये अमेरिकेतील मॅकी कुरिन हिने सर्वांत लांब पाय असण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर करून घेतला. ती केवळ १७ वर्षांची आहे. परंतु जगातील सर्वात लांब पाय असणारी महिला आणि सर्वात लांब पाय असणारी किशोरवयीन मुलगी म्हणून जागतिक विक्रम तिच्या नावावर नोंदविला गेला आहे. तिचा डावा पाय १३५.२६७ सेमी, तर तिचा उजवा पाय १३४.३ सेमी इतका लांब आहे. तीची उंच 6 फूट 10 एवढी आहे.
३. संदीपसिंग कैलाने टूथब्रशवर सर्वात जास्त वेळ बास्केटबॉल फिरवण्याचा जागतिक विक्रम केला.
कॅनडामधील संदीपसिंग कैलाने जानेवारी २०१९ मध्ये तोंडात टूथब्रश धरून त्यावर बास्केट बॉल खाली न पाडता सर्वात जास्त वेळ फिरवला (स्पिन केला) आहे. त्याने तब्बल १ मिनिट ८.१५ सेकंदासाठी टूथब्रशवर बास्केटबॉल फिरवला आणि जागतिक विक्रम केला आहे.
४. दाढीने सर्वात जास्त वजन उचलण्याचा विक्रम अँटानास कॉन्ट्रिमासने केला आहे.
लिथुआनियाच्या अँटानास कॉन्ट्रिमासने दाढीने सर्वात जास्त वजन उचलण्याचा विक्रम केला. २०१३ मध्ये, अँटानास याने त्याच्या दाढीच्या सहाय्याने तब्बल ६३.८० किलो वजन उचलले. धक्का बसला ना? हे सिद्ध करण्यासाठी त्याने एका शोच्या होस्टला उचलले होते.
५. बेथ जॉनने जगातील सर्वात मोठे यो-यो तयार केले.
२०१२ मध्ये ओहायो येथील बेथ जॉनने जगातील सर्वात मोठे यो-यो तयार केले होते. हे यो-यो 11 फूट १०.७५ इंच इतके उंच आणि २,०९५.६ किलो इतक्या वजनाचे होते. हा अगडबंब योयो पूर्ण करण्यासाठी बेथला दीड वर्षांचा कालावधी लागला.
६. डालीबोरने शरीरावर सर्वाधिक चमचे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे.
२०१६ मध्ये सर्बियातील डालिबोर जबलानोविचने आपल्या शरीरावर तब्बल 79 चमच्याचे संतुलन (बॅलन्स) केले आहे . त्याने वापरलेले चमचे ही विविध आकारांचे होते. ऐकावं ते नवलच नाही का?
७. टेबल दाताने उचलून शरीरापासून सर्वात लांब अंतरावर धरण्याचा जागतिक विक्रम
ऐकूनच विचित्र वाटलं ना? २००८ लग्झेम्बर्गच्या जॉर्जेस ख्रिस्चेन नावाच्या व्यक्तीने चक्क दातांनी टेबलाला ११.८० मीटर उंच उचलले होते. फक्त टेबल नाही तर टेबलवर बसलेल्या महिलेसहित टेबलाला उचलून त्याने हा जागतिक विक्रम केला होता. दात किती मजबूत असावेत असं जर कोणी विचारलं तर हे उदाहरण नक्कीच देता येईल.
लेखिका: शीतल अजय दरंदळे
आणखी वाचा:
गिनीज बुक आणि लिमका बुक...जाणून घ्या विश्वविक्रमांच्या या दोन पुस्तकांमधला फरक !!