भाग १: गिनीज बुकमध्ये नोंदवलेले ८ भन्नाट आणि विचित्र जागतिक विक्रम !!

"अरे हा इतके तास झोपतो की याचे नाव गिनीज बुकात येईल!!?" अश्या प्रकारचा संवाद आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा गमंतीत बोलतोही. आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकांच्या वेगवेगळ्या विक्रमांना गिनीज बुक मध्ये स्थान मिळते. गिनीज बुक हे दरवर्षी प्रसिद्ध होणारे आणि सर्वांत जास्त खप होणारे पुस्तक आहे.
अनेकजण आपली प्रतिभा दाखविण्यासाठी आगळ्या वेगळ्या करामती करतात. जगातले अनेक जण काहीही करून या पुस्तकात त्यांचे नाव यावे म्हणून बऱ्याच विचित्र गोष्टी करत असतात. काही करामती तर इतक्या विचित्र असतात की वाचून आपल्याला हसू येईल किंवा आपला विश्वासही बसणार नाही. आज आम्ही असे निवडक ८ आगळ्यावेगळे आणि अतरंगी विक्रम आणले आहेत. चला तर पाहूया.
१. ओडिलॉन ओझारेने जगातील सर्वात उंच टोपी बनवण्याचा जागतिक विक्रम केला.
२०१८ मध्ये अमेरिकेच्या ओडिलॉन ओझारे यांनी १५ फूट आणि ९ इंच उंच टोपी तयार केली. ओडिलॉनला ही टोपी घालून दहा मीटर चालण्याची आवश्यकता होती. त्याने ते यशस्वीरित्या पूर्ण केले.
२. सर्वात लांब मिशांचा जागतिक विक्रम राम सिंगच्या नावावर आहे.
भारताच्या जयपूर येथील रामसिंग चौहानची तब्बल १४ फूट लांब मिशी आहे. २०१० मध्ये इटालियन टीव्ही शो "Lo Show dei Record” (लो शो देई रेकॉर्ड)च्या सेटवर त्याच्या मिशीचे केस मोजले गेले. त्याने 37 वर्षांपासून मिशीचे केस कापलेले नाहीत.
३. सर्वात लांब जिभेसाठी जागतिक विक्रम निक स्टोबर्ल यांच्या नावावर आहे.
२०१२ पासून सर्वात लांब म्हणजे १०.१० सें.मी. लांबीच्या जीभेचा जागतिक विक्रम कॅलिफोर्नियाच्या माँटेरे येथील निक स्टोबर्ल उर्फ "द लिक" यांच्या नावावर आहे. सामान्यतः पुरुषांची जीभ सरासरी ही ८.५ सें.मी लांब तर महिलांची ७.९ सेंटीमीटर इतकी असते.
४. ली रेडमंड हिच्या नावावर जगातील सर्वात लांब नखे असल्याचा जागतिक विक्रम आहे.
अमेरिकेच्या ली रेडमंडला तिचे नखे वाढण्यास सुमारे ३० वर्षे लागली. तिने १९७९ पासून नखे वाढवायला सुरुवात केली. आणि, तुम्हाला आश्चर्य वाटेल तिच्या सर्व बोटाच्या नखांची लांबी एकूण २८ फूट आणि ४ इंच इतकी आहे. कशी काय सांभाळले असतील विचार करा. तिने 2008 साली जागतिक विक्रम केला होता.
५. गेरी टर्नरने ताणलेल्या त्वचेचा विक्रम केला आहे.
१९९९ मध्ये ब्रिटनमधील गॅरी टर्नर त्याच्या शरीरावरची कातडी ६.२५ इंच पर्यंत ताणून जागतिक विक्रम केला आहे.
गॅरी टर्नर यांना अतिशय दुर्मिळ असा एहलर-डॅन्लोस(Ehlers-Danlos) सिंड्रोम नावाचा आजार आहे. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, एहलरस-डॅन्लोस सिंड्रोम(कोलेजनिस) हा त्वचेशी निगडित आजार आहे ज्यामध्ये त्वचा ही अनैसर्गिकरीत्या स्थूल होते. कितीही ओढली तरी काही त्वचेला वेदना जाणवत नाहीत.
६. रॅमोस गोमेझ कुटुंबाने सर्वात "केसाळ कुटुंब" म्हणून विक्रम केला आहे.
व्हिक्टर "लॅरी" गोमेझ, गॅब्रिएल "डॅनी" रमोस गोमेझ, लुईसा लिलिया दे लीरा एसीव्हस आणि जिझस मॅन्युअल फाजार्दो एसीव्हस हे एकाच कुटूंबाचे चार सदस्य आहेत. हे मेक्सिकोतील आहेत. यांना एक अत्यंत दुर्मिळ असा जन्मजात सामान्यीकृत हायपरट्रिकोसिस (congenital generalized hypertrichosis) आजार आहे. या आजारात चेहरा आणि अंगावरचे केस खूप वाढतात. २००० मध्ये सर्वात मोठे केसाळ कुटुंब असल्याबद्दल या कुटुंबाचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे .
७. बर्न बार्करने सर्वात वृद्ध पुरुष स्ट्रिपर म्हणून जागतिक विक्रम केला आहे
२००२ मध्ये बर्न बार्करने वयाच्या साठाव्या वर्षी प्रोस्टेट कॅन्सर(कर्करोग) मधून बरे झाल्यानंतर स्ट्रिपिंगच्या व्यवसायात उडी घेतली. ते रिअल इस्टेट एजंट म्हणून २००० साली निवृत्त झाले. दोन वर्षे कर्करोगाशी लढल्यानंतर त्यांनी स्ट्रीपर म्हणून काम सुरू केले. सर्वांत वयोवृद्ध स्ट्रीपर म्हणून गिनीज बुकमध्ये त्याचं नाव नोंदवण्यात आलं. दुर्दैवाने २००७ मध्ये ६६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
८. पोपटानेही कॅन्स उघडण्याचा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
२०१२ मध्ये कॅलिफोर्नियातील पोपटाने एका मिनिटात सर्वाधिक कॅन्स उघडण्याचा जागतिक विक्रम केला होता. अशक्य वाटेल पण, झॅक द मकाऊ (पोपट) असे त्याचे नाव आहे . २०१२ मध्ये सैन होज़े येथे एका मिनिटात सर्वाधिक कॅन्स उघडण्याचा जागतिक विक्रम त्याने केला. त्याने फक्त एक मिनिटात ३५ कॅन उघडले. अवाक झालात ना?
लेखिका: शीतल अजय दरंदळे
आणखी वाचा:
गिनीज बुक आणि लिमका बुक...जाणून घ्या विश्वविक्रमांच्या या दोन पुस्तकांमधला फरक !!