computer

घरचा आयुर्वेद : पोटाच्या विकारांवर रामबाण उपाय असलेल्या ओव्याचे इतर फायदे माहित आहेत का?

आपल्या मराठीमध्ये एक खूप जुनी म्हण आहे, ‘ज्याच्या पोटात दुखेल, तो ओवा मागेल!’ पोटदुखीवर फार वर्षांपासून ओव्याच्या वापर होत आलेला आहे आणि त्याचाच परिपाक आपल्याला या उक्तीमध्ये दिसतो. आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासून पोटदुखीसारख्या वेगवेगळ्या व्याधींमध्ये ओव्याचा वापर केलेला आढळून येतो. आज ओव्याबद्दल आणि ओव्याच्या औषधी उपयोगाबद्दल जाणून घेऊया.

ओव्याची उत्पत्ती संपूर्ण भारतभरामध्ये होते. त्याशिवाय तो भारताच्या वायव्येकडील देश, पर्शिया (इराण), मिस्र (इजिप्त) आणि अफगाणिस्तानामध्येही तयार होतो

उत्पत्तीस्थान:

नामावली:

ट्रॅकीस्पर्मम् अमामी (Trachyspermam ammi) या लॅटिन नावाने ओवा जगभरात ओळखला जातो. Trachy = खरखरीत आणि spermam = बीज. ओव्याचे बीज खरखरीत असल्याने हे नाव दिले गेले असावे. इंग्लिशमध्ये बिशप्स वीड हे नाव आहे. ओवा भारतात कोणकोणत्या नावांनी जाणला जातो त्याची माहिती घेऊ.

आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये संस्कृतमध्ये ओव्याला,

- यवानी, यवसाह्व, यवज, यवानिका, यवान ही नावं त्याच्या यवन प्रांतातील प्रचूर प्रमाणात उत्पत्ती होत असल्यामुळे मिळाली असावीत.

- दीप्यक, दीप्य, दीपनी, अग्निवर्द्ध, अग्निगंधा, दीपनीय ही नावं त्याच्या पाचकाग्निवर्धनाच्या परिणामामुळे त्याला दिली गेली असावीत.

- उग्रगंधा, उग्रा, तीव्रगंधा ही नावं ओव्याच्या तीक्ष्ण गंधामुळे मिळाली असावीत.

- वातारी, शूलहंत्री ही नावं ओवा वाताला दूर करून पोटफुगी आणि पोटदुखीवर उपयुक्त असल्याने दिली गेली असावीत.

- भूकदंबक, भूतीक, अजमोदिका, हृदय, ब्रह्मगर्भा, ब्रह्मदर्भ, कारवी या नावांनीही ग्रंथांमध्ये ओवा ओळखला जातो.

ओव्याला हिन्दीमध्ये अजवायन, बंगालीमध्ये जोमान, पंजाबीमध्ये जवैण, गुजरातीमध्ये अजमो, तमिळमध्ये आमन, तेलुगुमध्ये ओमान, अरबीमध्ये क्युनुल्मुलूकी आणि फारसीमध्ये नान्ख्वाह (नान = रोटी, ख्वाह = इच्छा, रोटी खाण्याची इच्छा करवणारा) अशी नावं आहेत.

स्वरूप:

ओव्याचे झाड साधारण ३ ते ४ फूट उंच असते. पानं छोटी, पिसांप्रमाणे असतात. ओव्याची फुले छत्राकार आणि पांढरी असतात. साधारणपणे हिवाळ्यात ही फुले येतात. ओव्याची बी सामान्यपणे उपयोगात येते. बी लहान, पिवळसर लालसर रंगाची असते. उन्हाळ्यात फळांमधून बिया निर्माण होतात.

गुण:

ओवा गुणाने तीक्ष्ण, उष्ण, पचायला हलका पण रुक्ष असतो. चवीला कडसर तिखट आणि पचनानंतरच्या परिणामातही तिखट राहतो. यामुळे ओव्याने पित्त वाढते पण कफ आणि वाताचा नाश होतो. कफवाताच्या रोगांवर ओवा प्रामुख्याने वापरला जातो.

उपयोग:

बाहेरून वापरल्यावर

- ओवा वेदना कमी करणारा, सूज दूर करणारा असल्यामुळे सूज आणि वेदना असणऱ्याया शरीरावयवांवर ओव्याचा पाण्यातून लेप केला जातो किंवा ओव्याचं तेल तिथे लावलं जातं.

- ओवा विषघ्न असल्यामुळे विंचवाच्या दंशाच्या जागी त्याचा लेप करतात.

- ओव्याचा अर्क पाण्यात टाकून त्या पाण्याने जखम धुतल्यास त्या जखमेचं निर्जन्तुकीकरण होतं, जखम स्वच्छ होते आणि तिथल्या दुर्गन्धीचाही नाश होतो.

- पोटफुगी किंवा पोटदुखीवर ओव्याचा लेप घालतात किंवा ओव्याचा अर्क पाण्यातून पितात. यामुळे वात गुदावाटे सरतो आणि आराम पडतो.

- ओव्याचा त्वचारोगांमध्येही लेप केला जातो.

- दातांच्या कृमी-विकारामध्ये ओव्याचा वापर केला जातो.

पोटात घेतल्यावर

- पाचनसंस्था:

ओवा, चव देणारा, भूक वाढवणारा, वाताला खालच्या मार्गाने नेणारा, वेदना दूर करणारा आणि जन्तांना दूर करणारा असल्यामुळे अरुची, अग्निमांद्य,अजीर्ण, पोटफुगी, पोटदुखी, कृमी अशा पचनसंस्थेच्या रोगांमध्ये पोटातून दिला जातो. हे रोग त्यामुळे चांगले आटोक्यात येतात. जन्तांच्या विकारांवर ओवा विशेषत्वाने उपयोगी पडतो. जन्त बाहेर काढण्यासाठी आणि त्यांची वाढ थांबवण्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त आहे. भाजलेला ओवा आणि भाजलेली बडीशेप चवीपुरत्या सैन्धवाबरोबर खाल्ल्यास वात सरतो, भूक वाढते आणि जन्तांची प्रवृत्ती कमी होते.

 -श्वसनसंस्था :

ओवा वाढलेल्या कफाला कमी करत असल्यामुळे कफापासून निर्माण झालेल्या रोगांमध्ये वापरतात. दम लागणे, कफाची दुर्गन्धी, खोकला यांसाठी ओव्याचे चूर्ण वापरतात. चांगल्या कागदावर ओव्याचे चूर्ण पाण्यात कालवून त्याचा लेप करून त्याची विडी बनवून तिचा धूर ओढल्यास कफ सुटून दमा, खोकला यामध्ये आराम वाटतो, घुसमट कमी होते, कफाची दुर्गन्धी कमी होते.

- रक्तवहसंस्था :

ओवा हृदयाला बल्य आणि उत्तेजक असल्यामुळे हृदय-दौर्बल्यामध्ये वापरला जातो. ओवा घाम आणणारा आणि त्वचेसाठी उपयुक्त असल्याने त्वचारोगांवर आणि थंडी वाजून येणाऱ्या तापामध्ये वापरला जातो.

- मूत्रवहसंस्था:

ओवा मूत्र निर्माण करवणारा आणि वाताला खालच्या दिशेने नेणारा असल्यामुळे मूत्र अडकण्याच्या विकारामध्ये उपयोगी पडतो.

-प्रजननसंस्था:

ओवा पाळी नीट न येण्याच्या त्रासामध्ये आणि सूतिका (बाळन्तिण) रोगांमध्ये ओवा वापरला जातो. ओवा वाताचे अनुसरण करवत असल्यामुळे आणि गर्भाशयाची शुद्धी करत असल्यामुळे बाळन्तिणींना ओवा खायला देतात. यामुळे भूक वाढते, वात सरतो आणि बाळन्तपणाच्या अनेक तक्रारी कमी होतात.

अनेकदा आपल्या पहाण्यात आणि वापरण्यात येणारा ओवा आयुर्वेदामध्ये किती निरनिराळ्या रोगांवर वापरला जातो, याची आपल्याला जराही कल्पना नसते. ओव्याचा योग्य वापर आता आपल्याला अनेक रोगांमध्ये उपयोगी ठरू शकेल असे निश्चितपणे म्हणता येईल.

 

लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर

सबस्क्राईब करा

* indicates required