computer

वेळप्रसंगी जीव वाचवणारा सीपीआर नक्की काय असतो? तो द्यायचं तंत्र जाणून घ्या..

कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचं महत्त्व नव्याने अधोरेखित झालं. श्वास घेणं ही प्रक्रिया इतकी सहज घडते की श्वसन आणि त्यासाठी लागणारा ऑक्सिजन या दोघांनाही आपण बऱ्यापैकी गृहीत धरतो. त्याचं महत्त्व काय हे श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हाच लक्षात येतं. पाण्यामध्ये बुडून किंवा धुरामुळे गुदमरून पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने माणसाचा जीव गेल्याची उदाहरणं आहेत. शिवाय अचानक हृदयविकाराचा झटका येतो त्यावेळीही अशीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. यावेळी सीपीआर हा साधासोपा उपाय केला असता जीव वाचण्याची जवळपास ५० टक्के शक्यता असते. बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचा कोलकाता मध्ये झालेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टनंतर कार्डिॲक अरेस्टमुळे मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार त्यांच्या हृदयाला जोडलेल्या रक्तवाहिनीमध्ये ८० टक्के ब्लॉकेजेस होते. मात्र त्यावेळी त्यांना वेळेत सीपीआर मिळाला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते.

ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यास मेंदूला साधारण चार ते सहा मिनिटांनी धोका निर्माण व्हायला सुरुवात होते आणि केवळ आठ मिनिटांत मृत्यू येऊ शकतो.
सीपीआरचा उपयोग अनेक प्रसंगी होतो -
१. विजेच्या उपकरणामुळे शॉक लागल्यास
२. गिळताना अन्नाचा कोण किंवा औषधाच्या गोळ्या अडकल्याने श्वास गुदमरल्यास
३. विषबाधा, अतिरक्तस्राव, डोक्याला मार लागणं इत्यादी

सीपीआर म्हणजे काय?

सीपीआर या शब्दाचा फुल फॉर्म आहे कार्डियो पल्मनरी रेससिटेशन. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीमध्ये करायचा हा तातडीचा उपचार आहे. कधीतरी टीव्हीवर किंवा एखाद्या फोटोमध्ये तुम्ही पोलीस कर्मचारी किंवा डॉक्टर यांना तोंडात हवा भरून दुसऱ्या व्यक्तीला श्वास देताना आणि छातीवर दाब देऊन तिचं श्वसन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करताना बघितलं असेल किंवा पाण्यात बुडत असलेल्या हिरॉईनला बाहेर काढून तिच्या छातीवर विशिष्ट प्रकारे दाब देत तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न करणारा हिरोही पाहिला असेल. त्या क्षणी त्या हिरॉईनला तो हिरो म्हणजे तिचा जीव वाचवणारा देवदूत भासतो. पण सीपीआरची पद्धत आणि तंत्र माहीत असेल, तर कोणीही अशा प्रकारे दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो.
अनेकदा व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो, त्यावेळी तिचा श्वास कोंडला जातो. त्यामुळे तिला स्वतःहून श्वसन करता येत नाही. अशा परिस्थितीत तिला बाहेरून ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. पण तोपर्यंतचा वेळ या व्यक्तीसाठी मोलाचा असतो. त्या काळात सीपीआरमुळे जीव वाचू शकतो.

सीपीआर कसा द्यावा?
सर्वप्रथम या व्यक्तीला सीपीआरची गरज आहे की नाही हे तपासा. गरज असेल तर सर्वप्रथम तिचं डोकं मागे करून तोंड उघडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो. त्यानंतर त्या व्यक्तीला पाठीवर झोपवा आणि तिला आपल्या तोंडाद्वारे श्वास द्या. त्यानंतर व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी असलेल्या हाडावर आपल्या एका हाताचा तळवा पालथा ठेवून त्यावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवून विशिष्ट लयीत दाब द्या. हे करताना हात सरळ हवेत. कोपरात वाकलेले नकोत.
साधारणतः एका मिनिटाला शंभर वेळा ही क्रिया व्हायला हवी इतपत गती ठेवा. प्रत्येक वेळी साधारण पाच इंचाने छाती खाली जायला हवी. अशाप्रकारे ३० चेस्ट कॉम्प्रेशन्सनंतर व्यक्तीच्या हृदयाचं कार्य सुरू होतं का हे पाहून परत तिला तोंडाने श्वास द्या. श्वास देताना तिचं नाक बंद करा.

आता व्यक्तीला एका कुशीवर वळवा. तिचा श्वासोच्छवास हळूहळू नियमित व पूर्ववत होत असेल, तर याचा अर्थ सीपीआर यशस्वी झाला आहे.


व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत ३० चेस्ट कॉम्प्रेशन्स- दोन वेळा तोंडाने श्वास- ३० चेस्ट कॉम्प्रेशन्स- दोन वेळा तोंडाने श्वास हे चक्र सुरू ठेवा.

सीपीआर सुरू करण्यापूर्वी घ्यायची काळजी..
१. सगळ्यात आधी आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन संभाव्य धोके तपासणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ व्यक्ती विजेचा शॉक लागून बेशुद्ध झाली असेल तर तिला हात लावण्यापूर्वी विजेचं बटन बंद करा.
२. व्यक्तिला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिचा श्वास, नाडीचे ठोके इ. चालू आहेत का हे पाहावं लागतं. जर ते बंद असतील तरच सीपीआरचा वापर करायचा असतो. भानावर असलेल्या किंवा श्वास घेऊ शकत असलेल्या व्यक्तीला सीपीआर देणं धोक्याचं ठरू शकतं.
३. व्यक्ती शुद्धीवर आहे की नाही हे तपासण्यासाठी तिला जोरजोरात हलवू नका.

वेळ कधी सांगून येत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीसाठी सदैव सज्ज असलेलंच चांगलं. सीपीआर ही आयुष्य परत मिळवण्याची एक संधी आहे. निदान त्यासाठी तरी त्याच्याशी ओळख असायला हवी.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required