५०१ नाबाद; ब्रायन लाराची ऐतिहासिक खेळी, ज्याच्या जवळपासही कोणी पोहोचलं नाही; वाचा त्या सामन्याबद्दल अधिक..
ब्रायन चार्ल्स लारा, हे नाव जरी घेतलं तरी गोलंदाजांना घाम फुटायचा. या कॅरेबियन फलंदाजाने अनेक विक्रम बनवले तसेच अनेक मोठ मोठे विक्रम मोडून काढले. ६ जून या फलंदाजासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी अत्यंत खास दिवस आहे. याच दिवशी २८ वर्षांपूर्वी ब्रायन लाराने एक अविश्वसनीय खेळी केली होती. आपण जेव्हा प्रथम श्रेणी क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावांबद्दल बोलतो त्यावेळी ब्रायन लारा हे नाव सर्वोच्च स्थानी असतं. काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत याच फलंदाजाने ६ जून रोजी नाबाद ५०१ धावांची खेळी केली होती.
ब्रायन लाराने बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात वॉरविकशायरसाठी संघासाठी खेळताना ५०१ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. त्यावेळी विरोधी संघातील कुठलाही गोलंदाज ब्रायन लाराला गोलंदाजी करताना अक्षरशः घाबरत होता. त्याने डरहॅम संघाविरुद्ध खेळताना ही खेळी केली होती.
२ जून १९९४ रोजी डरहॅम आणि वॉर्विकशायर यांच्यातील सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर सुरू झाला. या सामन्यात डरहॅम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना या संघाला ८ बाद ५५६ धावा करता आल्या होत्या. डरहॅमचा फलंदाज जॉन मॉरिसने २०४ धावांची अप्रतिम खेळी केली. तर फिल बेनब्रिजने ६७, डेव्हिड ग्रॅव्हनीने ६५, अँडरसन कमिन्सने ६२ आणि स्टीवर्ट हटनने ६१ धावांची खेळी केली होती. वॉरविकशायरकडून ग्लॅडस्टोन स्मॉल आणि नील स्मिथने २-२ गडी बाद केले होते.
या सामन्यात ५०० धावांचा पल्ला गाठल्यानंतर डरहॅम संघाला असे वाटू लागले होते की, या सामन्यात विजय मिळवला जाऊ शकतो. मात्र डरहॅम संघातील खेळाडूंना ब्रायन लाराच्या विस्फोटक खेळीबद्दल काहीच कल्पना नव्हती. या डावात वॉरविकशायर संघाला चांगली सुरुवात करता आली नव्हती. अवघ्या ८ धावांवर पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर फलंदाजी करायला आला ब्रायन लारा. त्याने एकहाती मोर्चा सांभाळत डरहॅम संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर वॉरविकशायर संघाने २ गडी बाद २१० धावा केल्या होत्या. ब्रायन लारा १११ धावांवर नाबाद होता. ४ जूनला पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नव्हता. तर ५ जून रोजी रेस्ट डे होता. आता सामन्याचा एकच दिवस शिल्लक होता. शेवटच्या दिवशी ब्रायन लाराने आपल्या विस्फोटक फलंदाजीने गोलंदाजांची धुलाई करायला सुरुवात केली. शेवटच्या दिवशी वॉरविकशायर संघाने धाव फलकावर ६०० धावा जोडल्या. यापैकी ५०१ धावा एकट्या ब्रायन लाराने केल्या होत्या. या खेळी दरम्यान त्याने ६२ चौकार आणि १० षटकार मारले होते. यासह वॉरविकशायर संघाने ८१० धावा करत डाव घोषित केला.




