computer

पक्षीजगत : पावसाची चाहूल सांगणारा 'चातक'. त्याच्याबद्दलच्या गोष्टी दंतकथा आहेत की खऱ्याच, ते ही जाणून घ्या..

बाहेर रणरणत्या उन्हाने आकांत मांडलेला असतो. आत आपण बटाट्यासारखे उकडून निघत असतो. पंखा, कूलर, एसी, कोल्ड ड्रिंक्स, आइस्क्रीम्स हे सारे आपल्या दिमतीला हजर राहून उष्मा कमी करायचा प्रयत्न करत असतात. डाएट न पाळल्याने कशाही अस्ताव्यस्त फुगलेल्या देहयष्टीसारखं फुगत जाणारं वीजबील एसीच्या गारव्यात देखील घाम फोडतं ते वेगळंच! अशा वेळी दूर दूर...आकाशात नजर पोहचेल तिथवर दृष्टीला ताण देऊन डोळे वेध घेतात काळ्या ढगांचा..

कधी येणार पाऊस ?
‘ये रे येरे पावसा..
तुला देतो पैसा ssss
पैसा झाला खोटा ssss
पाउस आला मोठा...’
हे गाणं मनात फेर धरतं.

पैशाचं आमिष देऊन, प्रत्यक्षात खोटा पैसा देऊन मोठा पाउस पडतो यावर विश्वास ठेवण्याचं वय तर मागं पडलं.

आणि ‘आज मुसळधार पाउस पडेल’ या हवामान खात्याच्या (अ)चूक अंदाजावर विसंबूण राहण्यात अर्थ नाही हे अनुभवाने माहीत झालेलं असतं. आपल्या आज्ज्या-पणज्यांनी सांगितलं त्यावर विश्वास ठेवून मोरावर बारीक लक्ष ठेवावं? पाऊस येणार असेल तर मोर आंब्याच्या वनात नाचतो म्हणे! कावळे पण पाऊस खूप होणार की कमी यावर घरटं वर बांधायचं की मध्ये हे ठरवतो म्हणे! निसर्गाने नेमेलेले हे पावसाचे प्रेषित वाचता आले तर विज्ञानाच्या यंत्रापेक्षा अचूक भाकिते मिळतील!
असाच एक पावसाची चाहूल घेउन येणारा पावसाचा दूत म्हणजे ‘चातक’.

डोक्यावर काळा तुरा असणारा हा काळा पांढरा पक्षी जून ते सप्टेंबर मध्ये आढळतो. म्हणजे पावसाळयात. हा कोकीळवर्गातील पक्षी आहे. हा देखील आपली अंडी दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात घालतो. हा आपल्याकडे स्थलांतर करुन येतो तेव्हा सातभाई, रानभाई पक्ष्यांची वीण वर्षभर सुरूच असते. त्या परिस्थितीचा फायदा घेउन चातक त्यांच्या घरट्यात अंडी घालतो. पावसाला साद घालताना तो आर्त स्वरात ‘पियु, पियु’ अशी आळवणी करतो. कालिदासाच्या एका नाटकात याचा उल्लेख आढळतो.

वाट पाहण्याच्या व्याकूळतेचं प्रतीक म्हणून कथा कादंबऱ्या नि कवितांमधून भेटणारा हा पक्षी लहानपणी आजीच्या गोष्टींमधून पण भेटला. आजी सांगायची, चातक वर्षभर पाणीच पीत नाही. स्वाती नक्षत्राचा पाउस पडतो तेव्हा चोच उघडून पाणी घेतो तोंडात. त्या पाण्यावर जगतो. दुसरे पाणी, नदीचे किंवा तळयाचे, कितीही स्वच्छ असो, चातक ते पाणी पीत नाही. अगदी त्याला तळयात बुडवला तरी तो ते पाणी तोंडात जाऊ नये म्हणून चोच घट्ट मिटून घेतो. अर्थात हे सत्य नाही. तहान लागल्यावर हाही पक्षी इतर पक्ष्यांप्रमाणे साठवलेले पाणी पितो.

लहान मुलांना रिझवण्यासाठी सांगितलेल्या या गोष्टीत तथ्य किती असणार? पण हा पक्षी अस्तित्वात आहे आणि त्याचं नि पावसाचं घट्ट नातं आहे हेही खरं.
गूगल अर्थ आणि नेचर कॉंजर्वेशन फ़ौंडेशन (NCF) यांनी सुध्दा याला पुष्टी दिली आहे की विज्ञानाचे शोध लागले नव्हते तेव्हा आपले पूर्वज हवामानाच्या अंदाजासाठी पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करायचे. त्यातलाच एक पक्षी म्हणजे चातक.

NCFचे संस्थापक आणि तेथेच कार्यरत असलेले शास्त्रज्ञ ‘एम. डी. मधुसूदन’ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार eBird (www.ebird.org) या ग्लोबल सिटीझन सायन्स प्रोजेक्टमध्ये दहा हजारांहून अधिक पक्षीनिरीक्षक आपली निरिक्षणे नोंदवतात. eBirdचे स्मार्ट फोन app वापरून हे निरीक्षक देशाच्या विविध भागांत आढळणाऱ्या पक्ष्यांची नोंद करतात. मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेल्या या नोंदीवरून पक्ष्यांचे हवामानानुसार होणारे स्थलांतर समजते. त्यातच चातक पक्ष्याचीही नोंद असते. ही निरीक्षणे एन. सी. एफ. साठी अत्यंत मार्गदर्शक आहेत. जिथे जिथे चातक आढळला तिथे तिथे त्याच्या दर्शनापाठोपाठ पावसाचे आगमन झाले. गूगल अर्थ इंजिनचा उपयोग करुन ४० वर्षे पडलेल्या पावसाचा डेटा उपलब्ध आहे. या डेटावरून चातक आणि पावसाच्या आगमनातील संबंध स्पष्ट झाला आहे.
मधुसुदन म्हणतात ,”गूगल नेहमीच माणसांच्या समस्यांना अग्रक्रम देत आला आहे, आणि या ग्रहाचे हित यापेक्षा मोठी समस्या कोणती असणार आहे?

केवळ आजीच्या गोष्टीमधील दंतकथा किंवा वांग्मयातील प्रियकर प्रेयसीच्या प्रतीक्षेला अधोरेखित करणारे रूपक इतकेच चातकाचे अस्तित्व राहिले तर?


माणूस आपल्या ग्रहाला त्याच्या गरजासाठी स्वार्थभावनेने कसाही वापरत आहे. अपरिमित जंगलतोड़ करत आहे ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. पाऊस संपला की पावसाची वाट पाहणारा चातक देखील या जगाच्या नकाशावर दिसणे बंद होइल का? पाउस आहे म्हणून चातक आहे, चातक आहे म्हणून पाऊस आहे, असं परस्परांवर अवलंबून असणारं त्यांचं नातं नष्ट होइल इतका माणूस निसर्गाच्या घडामोडीत हस्तक्षेप करत राहिला तर?

या भयाण शंकेवर उत्तर देताना मधुसूदन म्हणतात, “आपल्या जबाबदाऱ्या माहीत असलेली काही चांगली माणसे जेव्हा एकत्र येऊन काम करतात नि चांगल्या गोष्टी नष्ट होऊ नये म्हणून काळजी घेतात तेव्हा चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते”.

आणि हे खरंच नाही का? आपण झाडे नि पाखरे जपू तेव्हा पाऊसही जपला जाणार आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्यालाही पाऊस हवाच आहे ना? चातक वर्षभर पाणी न पिता राहतो ही अंधश्रद्धा आहे की नाही हा वादाचा विषय असेलही, पण दीर्घ काळ वाट बघायला लावणाऱ्या पावसाच्या प्रतीक्षेत आपलाही चातक होतो हे खरं नाही का? शेवटी पाऊस नि प्रतीक्षेशी घट्ट नातं असलेला चातक आपल्याही मनात सदैव असतोच की, मग प्रतीक्षा पावसाची असो वा प्रेमाची!!

सबस्क्राईब करा

* indicates required