computer

वारंवार सर्दी होतेय? 'ही' असू शकतात कारणं

"साधा आजार, पण करी बेजार...'' हे वर्णन सर्दीला तंतोतंत लागू होतं. सर्दी मुख्यत: दोन प्रकारची असते- अ‍ॅलर्जिक सर्दी आणि जंतुसंसर्गाने होणारी (इन्फेक्टिव्ह) सर्दी. अ‍ॅलर्जिक सर्दीतही दोन प्रकार आहेत. काही जणांना वर्षभर सर्दी असते, तर काहींना फक्त काही ऋतूंमध्ये- प्रामुख्याने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सर्दीचा त्रास होतो.

सर्दी हे एक प्रकारचं इन्फेक्शन आहे. आपलं नाक हे शरीर आणि आजूबाजूचं वातावरण यांच्यामध्ये असलेलं एक प्रवेशद्वार आहे. वातावरणातील विविध घटकांना शरीरात प्रवेश करू देणं किंवा नाकारणं हे या प्रवेशद्वाराच्या हातात असतं. जेव्हा बाहेरच्या हवेतून एखादा विषाणू, अ‍ॅलर्जी निर्माण करणारा घटक, धूळ, रसायन किंवा अन्य प्रदूषणकारी घटक आपल्या नाकात शिरतो, त्यावेळी नाकाच्या आतील त्वचेचा दाह होतो आणि तिथे असलेला श्लेष्म म्हणजेच म्यूकस नाकातून वाहायला लागतो. ही शरीराची बाहेरील घटकाविरुद्ध लढण्यासाठीची नैसर्गिक यंत्रणा असते. श्लेष्माबरोबर नको असलेले घटक शरीराबाहेर टाकले जातात. नाकात जे काही गेले आहे त्याला मिळणारा हा सर्वसाधारण प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद वाढीव स्वरूपात दिसू लागला तर त्याचं रुपांतर सर्दीत होतं.

याचं कारण कधीकधी ही यंत्रणा काम करेनाशी होते आणि या बाह्य घटकांचं शरीरावर आक्रमण होतं. गळणाऱ्या नाकाव्यतिरिक्त, घशात खवखव, खोकला, सततच्या शिंका, नाकी चोंदणं ही लक्षणं दिसू लागतात. सर्वसाधारणपणे प्रौढ माणसांना वर्षातून दोन ते तीन वेळा सर्दी होते आणि एका वेळी झालेली सर्दी साधारण सात ते दहा दिवस टिकते. पण काही जणांना सतत सर्दी होत राहते. म्हणजे दर पंधरा दिवसांनी किंवा महिनाभराने सर्दीचा त्रास होतो. अनेकदा जोडीला ताप, डोकेदुखी हीही लक्षणं असतात. यामुळे दैनंदिन कामांमध्ये बाधा तर येतेच, याशिवाय एकंदरीत निरुत्साही आणि अस्वस्थ वाटत राहतं. या सतत होणाऱ्या सर्दीमागची कारणं अनेक आहेत. तुम्हीही यापैकी एक असाल तर ही कारणं पडताळून बघा.

१. धूम्रपान

सतत सर्दी होण्यामागे धूम्रपान हे एक कारण आहे. तज्ञांच्या मते सिगारेटच्या धुरामध्ये असलेली रसायनं आपल्या शरीरातील प्रतिकार यंत्रणेची क्षमता कमी करतात. त्यामुळे बाह्य घटकांविरुद्ध लढण्यात शरीर अयशस्वी होतं. या रसायनांमुळे प्रतिकार यंत्रणेच्या पेशीच प्रभावित होतात. यामुळे व्यक्तीला वारंवार सर्दीसारखा त्रास होऊ शकतो. याखेरीज सतत धूम्रपान केल्यामुळे श्वसनमार्गामधील लहान केसांसारखे दिसणारे भाग किंवा रोम खराब होतात. त्यामुळे श्वसन मार्गाला वारंवार जंतूसंसर्ग होऊ शकतो. परिणामी सतत सर्दी होते. हे टाळण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे धूम्रपानाची सवय सोडून देणे.

२. हातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

सध्याच्या काळात हात धुणं किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना चांगलंच समजलं आहे. पण इतर वेळीसुद्धा हातांची अस्वच्छता सर्दीसारख्या विकारांना कारणीभूत ठरू शकते. अनेक ठिकाणी स्पर्श होत असल्याने हातावर अनेक जंतू असू शकतात. हात वारंवार साबणाने स्वच्छ न केल्याने हे जंतू नाक, तोंड यांवाटे शरीरात शिरतात. त्यामुळे सर्दीसारखे विकार परतपरत होत राहतात.

३. ताणतणाव

सततच्या ताणतणावामुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकार यंत्रणेच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि या यंत्रणेची संसर्गाविरुद्ध लढा देण्याची क्षमता कमी होते. ताणतणावामुळेरोगप्रतिकार यंत्रणेच्या पेशींची संख्या घटते आणि वारंवार जंतूसंसर्ग होतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने प्रतिकारक्षमता चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठी नियमितपणे योगासनं, ध्यानधारणा, व्यायाम करून ताणतणावांचं व्यवस्थापन केलं पाहिजे.

४. अपुरी झोप

जर दररोज सात ते नऊ तासांची झोप मिळाली नाही तर त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर म्हणजेच प्रतिकार यंत्रणेवर होतो. त्यामुळेदेखील सातत्याने सर्दी होण्याचं प्रमाण वाढतं.

५. अयोग्य आहार

चुकीचा आहार आणि कमी झालेली प्रतिकारक्षमता यांचा थेट संबंध आहे. सतत जंक फूड, मैदा, साखर, प्रोसेस्ड फूड यांमुळे प्रतिकार यंत्रणेच्या क्षमतेवर थेट परिणाम होतो. त्यापेक्षा ऋतुमानानुसार फळं, हिरव्या भाज्या, प्रथिनं, सूप्स, सॅलड्स यांनी समृद्ध आहार घेतला तर बराच फरक पडलेला दिसतो.

६. मोकळ्या हवेत न फिरणं

जास्त काळ घराच्या आत घालवणं हेही वारंवार सर्दी होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. मोकळ्या हवेत फिरल्याने व्यायाम, ताजी हवा आणि पुरेसा सूर्यप्रकाश असा तिहेरी फायदा मिळतो. त्यामुळे प्रतिकार यंत्रणेचं काम सुरळीत चालतं. याअभावी प्रतिकारक क्षमता कमी होऊन मनुष्य वारंवार आजारी पडतो.

७. व्हिटॅमिन डी ची कमतरता

डी व्हिटॅमिनची कमतरता हे वारंवार आजारी पडण्यामागचं विशेषत: सर्दी होण्यामागचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे प्रतिकार यंत्रणेवर थेट परिणाम होतो. आहारात अंड्याचा पिवळा भाग, मशरूम यांचा आहारात समावेश करणं, नियमितपणे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणं यासारख्या उपायांचा फायदा होतो.

८. डीहायड्रेशन

शरीर आणि शरीरातील प्रत्येक पेशी पाण्यावर अवलंबून असतात. पाण्यामुळेच शरीरात खनिजं आणि विविध पोषक घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. अनेकांना पाणी कमी पिण्याची सवय असते. त्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण होते आणि या सर्वांचं वहन व्यवस्थित न झाल्यामुळे प्रतिकारक्षमतेवर परिणाम होऊन विविध आजार होऊ शकतात. म्हणजेच कमी पाणी पिणं अप्रत्यक्षपणे सर्दीला निमंत्रण देऊ शकतं. खूप तहान लागणं, डोळे सुजणं, डोकेदुखी, लो ब्लड प्रेशर, एकंदरीत आळस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युरीन चा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी दिसणं ही डीहायड्रेशनची लक्षणं आहेत. हे टाळण्यासाठी दिवसभर थोडं थोडं पाणी पीत राहा आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं भाज्या यांचा आहारात समावेश करा.

९. इम्यून सिस्टीम डिसॉर्डर्स

शरीरातील इम्यून सिस्टीम म्हणजे प्रतिकार यंत्रणेत बिघाड झाल्याने तिची रोगाविरुद्ध लढण्याची क्षमताच संपुष्टात येते आणि वेगवेगळ्या व्याधी उद्भवतात. अशी व्यक्ती बाहेरील विषाणू, जिवाणू, घातक घटक यांच्याशी सामना करू शकत नाही आणि वारंवार सर्दीसारख्या विकारांना बळी पडते.

१०. आनुवंशिक जडणघडण

ज्याला आपण जेनेटिक मेक अप किंवा आनुवंशिक जडणघडण म्हणतो, त्यानुसार काही व्यक्तींमध्ये निसर्गतःच पांढऱ्या पेशींची संख्या कमी असते. या विकाराला ल्युकोपेनिया असं नाव आहे. अशा व्यक्ती वारंवार सर्दी, अन्य इन्फेक्शन्स यांची शिकार होतात.

अर्थातच रोगावर डॉक्टरांना भेटणं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागणं अपेक्षित आहे, पण त्याआधी ते रोग टाळण्यासाठी काही आरोग्यदायी सवयी शरीराला लावून घेतल्या तर ते ही चांगलंच आहे, हो ना?

सबस्क्राईब करा

* indicates required