या पठ्ठ्याने बायकोसाठी चंद्रावर ३ एकर जमीन घेतली आहे...पण हे कसं शक्य झालं?

"चलो दिलदार चलो चाँद के पार चलो, हम है तयार चलो…" पाकिजा सिनेमातलं हे गाणं कोणाला माहीत नाही? नायकांनं दिलेली प्रेमळ आर्त साद त्यावर नायिकेने लाजून दिलेला प्रतिसाद. किती रोमॅंटिक हो ना?
इतक्या जुन्या, ब्लॅक अँड व्हाईट काळातलं गाणं अगदी आजही सगळ्या प्रेमी जीवांचं लाडकं आहे. नायक-नायिकांचं प्रेम आणि चन्द्र यांचं आजही ते नातं कायम आहे. आजही चंद्राच्या साक्षीने आणाभाका घेतल्या जातात, रुसलेल्याची समजूत काढली जाते. प्रेम सिद्ध करण्यासाठी चंन्द्र तारे तोडून आणून द्यायचीही शपथ घेतली जाते. असा हा प्रेमाचा साक्षीदार चंद्र खरंच कोणी आणून दिला तर? वाचूया नेमकं काय आहे प्रकरण..
राजस्थानच्या धर्मेंद्र अनीजा यांनी लग्नाच्या वाढदिवशी आपल्या बायकोसाठी चंद्रावरची तीन एकर जमीन खरेदी करून एक वेगळीच भेट दिली आहे. अजमेरचे धर्मेंद्र आणि त्यांची बायको सपना अनीजा यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस २४ डिसेंबर रोजी होता. बायकोला काहीतरी वेगळी भेट द्यावी हे धर्मेंद्र यांच्या मनात होते. एरवी लग्नाचा वाढदिवस म्हणलं तर साडी, दागिने किंवा कुठे फिरायला न्यायचा विचार केला जातो पण धर्मेंद्र यांनी अगदी वेगळा विचार करून बायकोला खूप खुश केले.
धर्मेंद्र अनीजा म्हणतात की त्यांनी अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधली एक फर्म-ल्यूनार सोसायटी इंटरनॅशनल-शी संपर्क साधला. तिथून त्यांनाचंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठीच्या सर्व सोपस्कारांची पूर्ण माहिती मिळाली. तरी कागदपत्रांची पूर्ण पूर्तता होईपर्यंत एक वर्ष गेले. अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांना जेव्हा अधिकृत प्रमाणपत्रही मिळाले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
खरंच अशी चंद्रावर जमीन घेता येते का?
तसं व्यावहारिकदृष्ट्या हे अशक्य आहे. कारण १९६७ मध्ये अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांदरम्यान Outer Space Treaty (OST) करारानुसार कुठल्याही देशाला किंवा व्यक्तीला असा चंद्रावर हक्क सांगता येत नाही.
पण हौसेला मोल नाही म्हणतात ना तेच खरं आहे. शाहरुख खान आणि सुशांत सिंग या बॉलीवूड स्टार्सनीही चंद्रावर जमीन घेतल्याची बातमी मध्यंतरी खूप चर्चेत होती. त्याशिवाय अनेक भारतीयही या यादीत आहेत. ल्यूनार लँड नावाची जगातील सर्वात मोठी फर्म आहे हे व्यवहार करते. अर्थात त्यात बऱ्याच अटीही आहेत. तसेच हे बरंच मोठं आणि वेळखाऊ प्रकरण आहे. काही दिवसांपूर्वीच एका खोट्या फर्मने असा व्यवहार करून एका पुण्यातल्या बाईला फसवले होते. त्यामुळे चंद्रावर जमीन घ्यायचे स्वप्न कोणी पाहत असेल तर पडताळणी जरुर करून घ्या.
लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका.
लेखिका: शीतल अजय दरंदळे