computer

बायकोनं आपल्याच जुन्या फोटोवरून नवऱ्यावर संशय घेतला? नक्की काय प्रकरण आहे हे?

मध्यंतरी एक विनोद व्हायरल झाला होता तो असा होता.. 'आपण देवाला अनेकदा फसवू शकतो, पण देव खूपच दयाळू असतो कारण प्रत्येक फसवणूकीबद्दल तो आपल्याला शिक्षा देत नाही. तो एकदाच लग्न लावून देतो. आता बसा बोंबलत…,'

लग्न म्हणजे शिक्षा अश्या आशयाचे अनेक विनोद होत असतात. मस्करी म्हणून ते वाचायला गंमतही वाटते. पण बायकोमुळे खरंच बोंबलण्याची वेळ मेक्सिकोमध्ये एका नवऱ्याला आली आहे. नक्की काय झालं असेल?

मेक्सिकोच्या सोनोरामध्ये जुआन आणि लिओनोरा या नवरबायकोचं जोरदार भांडण झालं. लिओनोराला संशय आला की तिचा नवरा जुआन अजून कुठल्यातरी तरुण बाईबरोबर लफडं करतोय. तिला त्याचे आणि अजून एका तरुणीचे फोटो त्याच्या फोनवर सापडतात. या गोष्टीवरून वाद इतका विकोपाला जातो की लिओनोरा चाकू उगारते आणि नवऱ्यावर हल्ला करते. जुआन ते बघून घाबरतो आणि स्वतःचा जीव वाचवत पळू लागतो. तो बिचारा परोपरीने तिला सांगतो की समजावण्याची एक तरी संधी दे. पण या बाईच्या डोक्यात संशयाचं भूत असं काही बसलं असतं की ती काहीएक ऐकून घेत नाही. शेवटी त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांना हे भांडण काहीतरी भलतंच आहे हे कळतं. शेजारी लगेच पोलिसांना फोन करतात. तोपर्यंत जुआन बायकोच्या हातातून चाकू मिळवण्यात यशस्वी होतो आणि सुरक्षित होतो. 

लिओनोरा आपला नवरा कसा फसवतोय याची कैफियत पोलिसांसमोर मांडते. पोलीस जुआनचा फोन घेऊन सत्याचा शोध सुरू करतात. इथपर्यंत ठीक आहे पण पोलिसांना जेव्हा खरं काय झालंय ते कळतं ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल. जेव्हा ते फोटो नीट पाहिले गेले तेव्हा लक्षात आलं की ते जुआन आणि लिओनोरा यांचेच जुने फोटो होते. जुआनने ते फिल्मच्या कॅमेऱ्यातून घेतले होते आणि डिजिटल करून फोनमध्ये सेव्ह करून ठेवले होते. लग्नाआधी डेटिंग साठी ते भेटायचे तेव्हाचे ते फोटो होते. लिओनोराला दाखवल्यावर तिनेही कबूल केले की तिने स्वतःचे जुने फोटो ओळखले नाही. तेव्हा ती खूप बारीक आणि मेकअपमध्ये होती म्हणे. काय म्हणावं आता या बाईला? 

 जुआन भाऊ त्याच्या नशिबाने वाचला पण त्याच्या हातापयावर चाकूने मारलेल्या खुणा आढळल्या आहेत. अर्थातच लिओनोराला पोलिसांनी त्वरित अटक केली. प्रेम हे आंधळं असतं म्हणतात पण संशय तर आंधळा, बहिरा, मुकाही असतो असंच म्हणलं पाहिजे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required