या टॅटू आर्टिस्टने हातावर L आणि R का गोंदवून घेतलं आहे ??

कितीही वय झालं तरी उजवी आणि डावी दिशा कोणती याबद्दल गोंधळ उडणाऱ्यांची संख्या कमी नाही. पूल आणि पुश बद्दल देखील हाच गोंधळ उडताना दिसतो. पण या समस्येवर उतारा म्हणून एका महिलेने जालीम उपाय शोधला आहे. ऑस्ट्रेलिया येथील डीकोडीया लेन या २३ वर्षीय तरुणीने डावी आणि उजवी दिशा लक्षात राहत नसल्याने चक्क हातांवर L आणि R चा टॅटू काढून घेतला आहे.
टॅटू आर्टिस्ट असलेल्या लॉरेन विंजेरने आपल्या इन्स्टाग्रामवर तिचा फोटो शेयर केला आहे. सोबत तिने दिलेले कॅप्शन देखील भन्नाट आहे. ती म्हणते की टॅटू कुल असण्याबरोबर इतक्या कामाचे देखील असू शकतात. तसेच लेनला तिने योग्य 'लेन' सापडण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
एके ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत लेन म्हणते की तिला डावी आणि उजवी बाजुमधील गोंधळ होण्याचा त्रास लहानपणापासून होता पण तो उलट वय वाढण्याबरोबर कमी न होता उलट वाढत गेला. गेल्या वर्षी एका इव्हेंटमध्ये तिला तिच्या एका मैत्रिणीने आपल्या मनगटावर त्या दिवसापूरते असेच L आणि R लिहून घेतलेले दिसले. यातूनच तिला पूर्णवेळ टॅटू काढण्याची आयडिया आली.
ही गोष्ट झाल्यावर लेनला चित्रविचित्र प्रतिक्रिया मिळणे साहजिक होते. तिने टॅटू काढून आणल्यावर आपल्या बॉयफ्रेंडसहित सगळ्या मित्रांना फोटो शेयर केला. तिच्या फोटोला बघून मित्रांनी अनेक विनोदी प्रतिक्रिया दिल्या तरी ती मात्र आता डावी उजवी बाजूचे कन्फ्युजन दूर होणार असल्याने खुश आहे.