फक्त १ रुपयात उपचार? गरीब आणि सामान्य लोकांसाठी ओडीसाच्या डॉक्टरने केलेलं काम कौतुकास्पद आहे !!

सर्वसामान्य माणसाला सर्वात जास्त भीती असते ती कुठले आजारपण येऊ नये या गोष्टीची, कारण दवाखान्यात येणारा खर्च हा सर्वसामान्य माणसाची वर्षांची बचत संपविण्यासाठी पुरेसा असतो. पण ओरिसातील एक डॉक्टर सामान्य नागरिकांसाठी खरोखर देवदूत ठरत आहे. ओडीसा येथील संबलपूर जिल्ह्यातील एका डॉक्टरांनी गरिबांना चांगले उपचार मिळावेत म्हणून एक रुपया क्लिनिक सुरू केले आहे.
'वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च' येथील मेडिकल विभागात सहाय्यक प्राध्यापक शंकर रामचंदानी यांनी हे क्लिनिक सुरू केले आहे. रूग्णांना उपचार घेण्यासाठी फक्त १ रुपया फी म्हणून द्यावा लागतो.
शंकर यांचे वय 38 आहे. गरीब आणि वंचितांना मोफत उपचार देण्याची इच्छा ते अनेक वर्षे मनात बाळगून होते. हे क्लिनिक त्यांच्या याच इच्छेचा एक भाग आहे. शंकर यांना आपल्या प्राध्यापकीतून घर चालवण्याएवढे उत्पन्न मिळून जाते.
उरलेल्या वेळेत ते गरीब रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्या या कामात त्यांना त्यांची डेंटिस्ट पत्नी शिखा यांचे देखील मोठी मदत मिळत आहे. नुकतेच त्यांनी या क्लिनिकचे उद्घाटन केले असून पहिल्या दिवशी ३३ रुग्ण आले होते.
एक रुपया फी ठेवण्यामागच्या कारणाबद्दल सांगताना ते म्हणतात की, रुग्णांना आपल्याला काहीतरी फुकट मिळत आहे अशी भावना मनात येऊ नये यासाठी आपण ही फी आकारतो.
शंकर रामचंदानी याआधी एका कुष्ठरोगी मुलाला आपल्या अंगावर घेऊन त्याच्या घरी घेऊन गेले होते, तेव्हा देखील त्यांचे खूप कौतूक झाले होते.