computer

सामन्यातील असामान्य - भाग १: दिल्लीकरांची तहान भागवण्यासाठी दिवसरात्र राबणारा मटकामॅन !!

काही लोक सामान्य असतात पण त्यांनी केलेले काम असामान्य असते. हे लोक आपल्याकडून होईल तेवढी समाजाची मदत करावी या भावनेने काम करत असतात. काही तरी भव्यदिव्य करावे असे त्यांच्या गावी देखील नसते. पण त्यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असते. अशा सामान्य लोकांच्या असामान्य कामांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. याच लेखमालिकेतील पहिला लेख आज तुमच्यासमोर आणत आहोत.

दिल्लीत राहणारे ६९ वर्षाचे एक आजोबा रोज हजारो लोकांची तहान भागवतात. या कामाला त्यांनी आयुष्यभरासाठी वाहून घेतले आहे. रोज सकाळी ४.३० वाजेपासून त्यांचे काम सुरू होत असते. रोज तब्बल ६० माठांमध्ये स्वच्छ पाणी भरून दिल्लीत विविध ठिकाणी ते ठेवत असतात, जेणेकरून त्या भागातील लोकांना स्वच्छ पाणी मिळावे. याच कामामुळे त्यांची मटकामॅन अशी ओळख झाली आहे.

मटकामॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माणसाचं नाव आहे 'अलागरनाथम नटराजन'. मात्र नटराजन यांचे कार्य एवढ्या पुरते मर्यादित नाही. 

लंडन येथे ३२ वर्षे इंजिनियर म्हणून काम केल्यावर ते भारतात परतले. इथे आल्यावर त्यांना कॅन्सरने विळखा घातला. मोठ्या हिमतीने त्यांनी कॅन्सरवर देखील मात केली. पण आता यापुढे स्वतःसाठी नाहीतर समाजासाठी जगायचे हे त्यांनी निश्चित केले होते. ते कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांची सेवा करू लागले. तसेच ज्या गरिबांकडे अंत्यविधीसाठी देखील पैसे नसतात, त्यांना मदत करायला त्यांनी सुरुवात केली. 

नटराजन यांना दिसत होते की अनेक लोकांना दिल्लीच्या विविध भागात तहान लागल्यावर पाणी पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. त्यांनी मग माठ विकत घेतले आणि दिल्लीकरांची तहान भागवण्याच्या मोहिमेवर निघाले. त्यांनी matkaman.com नावाची वेबसाईट सुद्धा सुरू केली आहे.

एखादा माठ रिकामा झाला असेल तर तो परत भरण्यासाठी ते दिवसातून 4 वेळा प्रत्येक माठाकडे फेरी टाकतात. तसेच या माठांवर त्यांचा नंबर देखील लिहिलेला असतो. माठ रिकामा झाल्यास त्यांना फोन करून बोलवून घेतले जाते.  

एवढेच नाही तर ते दर आठवड्याला गरिबांना जवळपास ५० किलो फळांचे वाटप करतात. विशेष गोष्ट म्हणजे हे काम ते एकट्याने करत असतात. प्रत्येकाने स्वतःला शक्य होईल तेवढे समाजकार्य करायला हवे असे आवाहन देखील ते करतात.

अशा या सामान्यातील  असामान्य माणसाला बोभाटाचा सलाम!!

सबस्क्राईब करा

* indicates required