इंटरनेटवर प्रसिद्ध होण्यासाठी लोकांनी केलेल्या ८ एडचाप उचापती !!

प्रसिद्धीचा सोस कुणाला नसतो? इंटरनेट आणि सोशल मिडिया आल्यापासून तर अनेकांना ही हौस भागवण्याची आयतीच संधी मिळाली आहे. काही तरी भन्नाट करून इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची अनेकांना हौस असते, पण अशा भन्नाट गोष्टी करताना स्वतःचा किंवा कधीकधी इतरांचा जीव धोक्यात घालणारे महाभागही काही कमी नाहीत. सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात लोकं कधीकधी स्वतःचीच कशी फजिती करून घेतात, हे पुढील उदाहरणे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल.
१. सेल्फीसाठी एका डॉल्फिनच्या पिल्लाचा बळी
एका समुद्र किनाऱ्यावर जमलेल्या काही लोकांना डॉल्फिनचे एक पिल्लू सापडले सगळ्यांनाच त्या डॉल्फिन सोबत वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो घायचे होते. स्वतःची हौस भागवताना त्या पिल्लाचे काय होईल याचा विचार कुणीही केला नाही. त्याला दिवसभर लोकं कसेही हाताळत राहिले, हे त्या पिल्लाला अजिबात मानवले नाही. त्यातच त्या डॉल्फिनचा मृत्यू झाला. सेल्फीच्या क्रेझने एका मूक प्राण्याचा नाहक बळी घेतला.
२. योग पोझमध्ये सेल्फी घेणे पडले महागात
मेक्सिको मधील एका कॉलेजमधील विद्यार्थिनीला सोशल मिडीयावर हटके फोटो पोस्ट करायचा होता. यासाठी आपल्या बाल्कनीतून योगा पोझ करत असल्याची सेल्फी तिला घ्यायची होती. बाल्कनीच्या लोखंडी बारवर उलटी लटकून सेल्फी काढत असतानाच तिचा हात निसटला आणि सहाव्या मजल्यावरून ती खाली पडली. या अपघातात तिचे दोन्ही पाय, हात आणि खुबा फॅक्चर झाला. डोक्यालाही मार लागला ते वेगळेच. पण, बिचारीचा जीव वाचला ते महत्वाचे.
३. स्नोग्लोब मधील पाणी पिणे –
सोशल मिडीयावर नेहमीच काही तरी चॅलेंजेसचा ट्रेंड सुरु असतो. ट्विटर एका बाईंनी अशीच एक चॅलेंजिंग पोस्ट टाकली. स्नोग्लोब मधील पाणी प्यायल्याची. स्नोग्लोब हा प्रकार जर तुम्हाला माहित नसेल तर ते आधी समजून घ्यायला हव. स्नोग्लोब म्हणजे काचेचा गोळा. त्यात एखादं दृश्य, किंवा बाहुली असते. सोबतच तो गोळा पाण्याने भरलेला असतो. आपल्याकडे अशा काचेच्या गोळ्यात ताजमहाल ठेवलेला हमखास आढळतो.
तर, या बाईनी ते पाणी प्यायलं. याचे काय परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा असंही तिने म्हटलं. काही मिनिटातच आपलीच पूर्वीचे ट्वीट शेअर करत तिने दुसरे ट्वीट केले, ज्यात लिहिले होते 'हॉस्पिटल'. स्नोग्लोबमधील तो पदार्थ प्यायल्याने बाईंना थेट दवाखान्यात भरती करण्याची वेळ आली.
४. गोठलेल्या तळ्यात पोहण्याचा स्टंट
टिकटॉकवरची धम्माल तर तुम्हाला माहितीच आहे. अशाच एका टिकटॉक स्टारने आऊटडोअर अॅडव्हेंचर करण्यासाठी एका गोठलेल्या तलावात पोहण्याचा स्टंट केला होता. गोठलेल्या तलावात वरचा थर पूर्णतः बर्फाचा असतो आणि त्याखाली पाणी असते. या व्हिडीओत त्याने एका ठिकाणी बर्फ फोडून आत पाण्यात तर शिरण्याचे धाडस केले पण, काही मिनिटांनी त्याला परत यायचे कसे हेच समजेना. आता आपलं काही खरं नाही असं वाटून तो अक्षरश: गळून गेला होता, पण काही सेकंदातच तो जिथून आत शिरला होता तिथे परतला आणि अखेर त्याला तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला. भीतीने गांगरून जाऊन तो आणखी थोडा वेळ भरकटला असता तर जीव गमावून बसला असता. हा व्हिडीओ त्याने टिकटॉकसह ट्विटरही पोस्ट केला आहे ज्याला १६,००० पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत.
५. दुध ओतणे.
चॅलेंजेसचा ट्रेंड तर सोशल मिडियावर नेहमीच सुरु असतो. एक झाले की, लगेच दुसरे. दोनवर्षापूर्वी असाच एक विचित्र चॅलेंज ट्रेंड आला होता, “TidePodChallenge,” दुसऱ्याचा तोंडात दुध किंवा डाळीचे अख्खे पॅकेट ओतण्याचा चॅलेंज. अख्खे पॅकेट तोंडात एकदम ओतल्यावर समोरच्याचे काय हाल होतील, हा विचारही कुणाच्या गावी नव्हता. दुध डाळी एकवेळ ठीक आहे पण, काही टारगट मुलांनी डोळे बंद करून आ वासून बसलेल्या आपल्या मित्राच्या तोंडात डिटर्जंटचे पॅकेट ओतले होते. बस्स स्वतःची चॅलेंज घेण्याची हौस भागवण्यासाठी इतरांचे हाल दुसरे काय!
६. तोंडात मीठ ओतणे
वरती नोंदवलेल्या चालेंजप्रमाणेच हे आणखी एक. तोंडात मिठाचे पॅकेट ओतून दाखवायाचे. दुसऱ्याच्या नाही तर स्वतःच्याच. प्रमाणाबाहेर मीठ तोंडात घेतल्यावर काय होते किंवा काय काय होऊ शकते हे तर प्रत्येकालाच माहिती आहे, नाही का? पण, सोशल मिडीयावर प्रसिद्ध व्हायचंच आहे म्हटल्यावर काय!
७. ओठांना ग्लू लावणे
आपलेही ओठ कायली जेनर या अभिनेत्री सारखे मोठे असावेत अशी अनेक मुलींची इच्छा असते. ओठ मोठे दाखवण्यासाठी मुली ओठाच्या वरच्या बाजूला ग्लू लावायच्या आणि त्यावर ओठ चिकटवायच्या. शेवटी या नवीन ट्रेंडला प्रतिसाद म्हणून डॉक्टरांनीच स्वतःहून जागृती करणाऱ्या पोस्ट टाकल्या आणि अशा प्रकारे ग्लू लावून ओठ मोठे करण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहनही अनेक डॉक्टरांनी केले.
८. गोरिला ग्लूची कमाल
टेसिका ब्राऊन या महिलेने केसांची लांबलचक वेणी घालून केस विस्कटू नये म्हणून त्यावर गोरिला ग्लू फवारला. कितीही वेळा केस धुतले तरी हा ग्लू काही केसातून निघण्याचे नाव घेत नव्हता. केसांची वेणी सोडवण्यासाठी आणि केसांवरील ग्लू काढण्यासाठी शेवटी तिला चार तासांची ट्रीटमेंट घ्यावी लागली. तिने स्वतःहूनच या सगळ्याची माहिती देणारा व्हिडीओ तिच्या इंस्टा अकाऊंटवर पोस्ट केला होता.
सोशल मिडीयावर तुमच्या भन्नाट कल्पना शेअर केल्या पाहिजेत याबद्दल आमचे काहीच दुमत नाही, पण किमान या भन्नाट कल्पना तुमच्या किंवा इतरांच्या जीवावर बेतणार नाहीत इतकी तरी खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी