दुसऱ्या महायुद्धातल्या बॉम्बचा तब्बल ८१ वर्षानंतर स्फोट! इतक्या वर्षांनंतरही तो किती शक्तिशाली होता याचा व्हिडीओ पाहा!!

दुसर्या महायुद्धात जर्मनीच्या हिटलरच्या नाझी सैन्याने अनेक ठिकाणी हवाई हल्ले करून विध्वंस केला. शक्तिशाली बॉम्ब टाकून अनेक शहरं उध्वस्त केली. ब्रिटनची राजधानी लंडनवरही अनेक हल्ले केले गेले. सप्टेंबर १९४० ते मे १९४१ मध्ये लंडन शहरावर अनेक शक्तिशाली बॉम्ब फेकले गेले. त्यातले न फुटलेले काही बॉम्ब आजही शहराखाली दाबले गेले आहेत. असाच एक बॉम्ब लंडनमधील एक्स्टर (Exeter) शहरात सापडला आणि तो निकामी करण्यासाठी शहर रिकामे करून स्फोट घडवून आणला गेला.
तो स्फोट इतका शक्तिशाली होता की दुसऱ्या महायुद्धाच्या वाईट आठवणी परत जिवंत झाल्या. तब्बल ८१ वर्षांनी तो बॉम्ब फुटला. जवळजवळ १०००किलोचा तो बॉम्ब होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर तो दुसऱ्या महायुद्धातील विनाशकारी बॉम्ब असल्याचे पुढे आले आहे. या बॉम्बस्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही एकदा पाहून घ्याच.
UPDATE: This is the moment a WW2 bomb was detonated in #Exeter. Image courtesy of Exeter City Council. #Police would like to thank the residents of Exeter, particularly the 2,600 evacuated households and our partner agencies who have worked so hard to ensure the safety of all pic.twitter.com/fhxJFqBqT8
— Devon & Cornwall Police (@DC_Police) February 27, 2021
शुक्रवारी एक्स्टर (Exeter) शहरात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. एक्स्टर (Exeter) विद्यापीठाच्या कंपाऊंडमध्ये हा बॉम्ब दिसला. यानंतर बॉम्ब निकामी करणारे पथक आणि पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. विद्यापीठाच्या १४०० विद्यार्थ्यांसह ग्लेनथोर्न रोड (Glenthorne Road) परिसरात राहणाऱ्या सुमारे २६०० घरांतील रहिवाशांना परिसर रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शुक्रवार आणि शनिवारी हे दोन दिवस सर्वांना या परिसरापासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. रविवारी संध्याकाळी ६ वाजता हा धोकादायक बॉम्ब रिमोट कंट्रोलद्वारे निकामी करण्यात आला. बॉम्बस्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज सुमारे 10 किलोमीटरपर्यंत ऐकू येत होता. १०० मीटर परिसरातील अनेक घरांच्या भिंती पडल्या आणि खिडक्या फुटल्या. त्यामुळे अजूनही लोकं तिथे जायला घाबरत आहेत.
सध्या त्या घरांची दुरुस्ती सुरू आहे. लोकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी नाही. सुरक्षा पडताळणी केल्यानंतरच लोकांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. या परिसरात अजूनही बॉम्ब आहेत का? याचा तपास सूरू आहे.
अश्या शक्तिशाली बॉम्बला हर्मन (Hermann) असे म्हटले जायचे. २०१८ मध्येही लंडन विमानतळाजवळच्या परिसरात असा बॉम्ब सापडला होता. तोही निकामी करण्यात आला होता. यानिमित्ताने आताच्या पिढीला दुसऱ्या महायुद्धात कसा विध्वंस झाला असेल याची प्रचिती आली.
लेखिका: शीतल दरंदळे