computer

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनिअर!

भारतात सिव्हिल इंजिनयरिंग या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. बांधकाम क्षेत्रात स्त्रिया अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत. बांधकाम क्षेत्रात डिझायनिंग आणि नंतर प्रत्यक्ष साईटवर जाऊन सूचना करणे, लक्ष ठेवणे, साईटवर उभे राहून काम करणे, दूरवर प्रवास अश्याप्रकारच्या कामांमुळे मुली या क्षेत्राकडे वळत नाही. पण याच क्षेत्रात नाव मिळवणाऱ्या एक भारतीय स्त्रीची कामगिरी आज आपण या लेखात पाहणार आहोत. शकुंतला भगत असे या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियरचे नाव आहे.

१९५३मध्ये शकुंतला भगत यांनी मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. शकुंतला भगत यांनी १९६० ते १९७० या काळात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी-बॉम्बेमध्ये) सिव्हिल इंजिनिअर विभागाची सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यांनी  पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून (University of Pennsylvania) सिव्हिल आणि स्ट्रक्चरल अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले.

ब्रिज सुपरस्ट्रक्चर्सच्या संशोधन व विकास यात त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण काम केले. पूल बांधकाम विभागात त्यांना खूप रस होता. त्यातच त्यांनी खूप संशोधन केले. १९७० मध्ये शकुंतला आणि त्यांच्या पतीने ब्रिज कन्स्ट्रक्शन फर्म - क्वाड्रिकॉन (Quadricon )ही कंपनी सुरू केली.

(प्रातिनिधिक फोटो)

स्टील हे पूल बांधण्यासाठी महत्वाचे मानले जाते. पूल बांधकाम करताना स्टीलचे महत्व पाहून क्वाड्रिकॉन स्टीलचे पेटंट विकसित केले. क्वाड्रिकन स्टील पूल हिमालयात खूप लोकप्रिय आहे. शकुंतला यांच्या कंपनीने आतापर्यंत २०० हून अधिक पुलांचे काम केले आहे. ते पूल १८ मीटर ते १३८ मीटरपर्यंत होते.  १९७८ पर्यंत कंपनीने काश्मीर ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ६९ पूल बांधले होते. शकुंतला यांनी अमेरिका, जर्मनी आणि इंग्लंड या देशांतही अनेक पुलांच्या डिझाइन व बांधकामांवर काम केले आहे. १९७२ मध्ये त्यांना Invention Promotion Board यांच्याकडून पुरस्कारही मिळाला.

१९९३ मध्ये शकुंतला यांना त्यांच्या भरीव योगदानाबद्दल ‘वूमन ऑफ द इयर’ हा किताबही मिळाला. देश, परदेशात पूल बांधणारी यशस्वी महिला असे त्यांना म्हणता येईल. बौद्धिक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेतच, पण या वेगळ्या क्षेत्रात तेही ६०, ७०च्या दशकांत महिला सिव्हिल इंजिनिअर म्हणून नावलौकिक मिळवणे म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे.  २०१२ मध्ये वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

 

लेखिका : शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required