computer

प्रसंगी पडेल ती कामे करून परदेशात स्वतःची यशस्वी कंपनी चालवणाऱ्या अलीगढच्या तरुणाची यशोगाथा!!

ही सत्यकथा त्या माणसाची आहे ज्याला नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायचा होता. मोठा व्यावसायिक होण्याचे ज्याने स्वप्न पाहिले होते. त्याला अभ्यासामध्ये फारसा रस नव्हता पण तरीही अभियांत्रिकी शिक्षण घेऊन तो ऑस्ट्रेलियाला स्टुडंट व्हिसावर गेला. ऑस्ट्रेलियाला जाऊन त्याने आपला व्यवसाय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने झाडू मारायचे कामही केले. कष्ट करून त्याने आपला व्यवसाय यशस्वी करून दाखवला.

ही कहाणी आहे उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये जन्मलेल्या आमिर कुतुब याची. ३१ वर्षीय आमिरने व्यवसाय करायचा ध्यास घेतला आणि आज त्याच्या कंपनीची उलाढाल १० कोटींच्या पुढे आहे तसेच ४ वेगवेगळ्या देशात त्या कंपनीच्या शाखा देखील आहेत.

आमिर कुतुब हा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे सुरुवातीचे जीवन साधे होते. वडील सरकारी नोकरीतून निवृत्त आहेत आणि आई गृहिणी आहे. मुलगा डॉक्टर किंवा अभियंता व्हावा अशी वडिलांची इच्छा होती. यामुळे आमीरने बीटेकला प्रवेश घेतला. त्याला सुरुवातीपासूनच अभ्यासाची आवड नव्हती. एकदा शिक्षकाने त्याला असेही सांगितले की, "तू आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकणार नाहीस."

पण आईवडिलांची ईच्छा म्हणून त्याने इंजिनीअरिंग पूर्ण केले. ते केल्यानंतर आमीरला पहिली नोकरीची ऑफर मिळाली, पण ती त्याने स्वीकारली नाही. त्यानंतर आमिर दिल्ली येथे गेला आणि तेथे त्यांनी होंडा मध्ये काही काळ काम केले. पण मनात व्यवसाय करायचे स्वप्न होते. त्याने ती नोकरी सोडली आणि स्वतंत्ररित्या काम करण्यास सुरवात केली. तो वेबसाइट्स डिझाईन करायचा. त्याचे काही ग्राहक ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही होते. त्यावेळी त्याच्या एका क्लायंटने सांगितले की ऑस्ट्रेलियामध्ये येऊन स्वतःची कंपनी का सुरू करत नाही? जेव्हा त्याने या दिशेने प्रयत्न सुरू केले तेव्हा त्याला समजले की तो केवळ विद्यार्थी व्हिसावर ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. त्याने ऑस्ट्रेलियात एमबीएसाठी प्रवेश घेतला. पैसे साठवण्यासाठी अभ्यासाबरोबरच नोकरीही करायचं ठरवलं. त्याने दीडशेहून अधिक कंपन्यांकडे अर्ज केला, पण अनुभव नसल्यामुळे कुठेही नोकरी मिळाली नाही.

ऑस्ट्रेलियात आधीचे दिवस खूप कठीण होते. पैसे साठवायला जी मिळेल ती नोकरी केली. विमानतळावर झाडू मारला, पेपर वाटले, त्याला दर तासाला २० डॉलर्स मिळत असत. अभ्यासासाठी आणि कंपनीची स्थापना करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. मग त्याने सकाळी तीन ते पहाटे सातपर्यंत वृत्तपत्र वाटायला सुरवात केली. त्याने जिथे काम सुरु केले तिथे त्याला एक गॅरेज मिळाले. तिथूनच कंपनीची सुरुवात करावी असा विचार त्याला आला.

२०१४ मध्ये आमिरने Enterprise Monkey Proprietor Ltd, या नावाने वेब आणि अँप development कंपनी सुरू केली. पहिल्यांदा २००० डॉलर घालून हा व्यवसाय सुरू केला. त्याच्या कंपनीची माहिती तो बस स्टँड रेल्वे स्टेशनवर कार्ड देऊन लोकांना सांगत असे. त्या काळी डिजिटल मार्केटिंग फार नव्हते. तासनतास तो लोकांना सांगे की एक संधी द्या. शेवटी ४ महिन्यानंतर, एके दिवशी आमिरला बसमध्ये एक व्यक्ती सापडली, ज्याला त्याने आपल्या कामाबद्दल सांगितले. आमिरने त्यांना एक सिस्टम दिली, ज्यामुळे दरमहा त्याचे पाच हजार डॉलर्स वाचले. हळू हळू त्याने आमिरशी काही ग्राहकांची ओळख करून दिली. अखेर, आमिरच्या कठोर परिश्रमांना  किंमत मिळू लागली. त्याला वेबसाइट डिझायनिंगचे काम मिळू झाले. हळूहळू काम इतके वाढले की लोकं कमी पडू लागली.

आज त्यांच्या कंपनीची उलाढाल १० कोटी रुपयांवर गेली आहे आणि कंपनीत ४०० कर्मचारी कामावर आहेत. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे आमिर कुतुब या तरुणाने सिद्ध केले. त्याची यशोगाथा नक्कीच अनेक व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required