कोहली खमण, धोनी खिचडी, भुवनेश्वर भरता.....या खास क्रिकेट थाळीत काय काय आहे पाहा !!

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने केलेला खेळ आणि मिळवलेला विजय सर्व भारतीयांना आनंद देऊन गेला. भारतीय क्रिकेट संघ सध्या अगदी जोरदार फॉर्म मध्ये आहे. कसोटी विजय मिळवल्यावर टी-20 मध्येही मस्त कामगिरी करत आहेत. याच नेत्रदीपक कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी अहमदाबादच्या एक हॉटेलने 'क्रिकेट रास' महोत्सव सूरू केला आहे. याच महोत्सवाच्या अंतर्गत हॉटेलने एक नवी थाळी आणली आहे. सध्या सोशल मिडीयावर या थाळीची जोरदार चर्चा सुरु आहे.
ही अनोखी कल्पना घेऊन आलेल्या रेस्टॉरंटचे नाव Marriot courtyard आहे. या रेस्टॉरंटमध्ये ५ फूट लांबीची मोटेरा थाळी दिली जाते. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे या थाळीत खेळाडूंच्या नावाने बनविलेले पदार्थ वाढले जातात. मोटेरा थाळी चॅलेंजमध्ये ही थाळी एका तासात संपवायची आहे. मदत म्हणून तुम्ही आपल्या जवळच्या ४ व्यक्तींना सोबतीला घेऊ शकता.
मेन्यूकार्डमध्ये एक क्रिकेट मेन्यूही समाविष्ट केला आहे. मोटेरा थाळीमध्ये कोहली खमण, पांड्या पत्र, धोनी खिचडी, भुवनेश्वर भरता, रोहित आलो रशीला, शार्दुल श्रीखंड, बाउन्सर बासुंदी, हॅट्रिक गुजराती दाल, बुमरा भिंडी शिमलामिर्च, हरभजन हांडवो आणि इतर स्वादिष्ट गुजराती पदार्थांचा समावेश आहे. या भव्य थाळीमध्ये ही प्रत्येक डिश आहे आणि याव्यतिरिक्त स्नॅक्स, ब्रेड, ऍपेटाइझर आणि मिष्टान्न हे देखील दिले जातात. ही फक्त गुजराती थाळी आहे असं तुम्हाला वाटू शकतं, पण सोबतीला इतर वेगवेगळे पदार्थही दिले जातात. नुकतेच पार्थिव पटेलने या रेस्टॉरंटला भेट दिली आणि कौतुक केले होते.

टी -20 मालिका संपल्यावर एकदिवसीय मालिकाही सुरू होत आहे. त्यामुळे या मोटेरा थाळीची चर्चा सगळीकडे होणारच. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक हॉटेल काही अभिनव कल्पना राबवत असतात. ही कल्पना किती ग्राहकांना आकर्षित करू शकते हे पाहणे मात्र नक्कीच औत्सुक्याचे ठरेल.
लेखिका: शीतल दरंदळे