जगातल्या ३० पैकी २२ सर्वाधिक प्रदूषित शहरं भारतात आहेत? शहरांची नावे बघून घ्या !!

भारतीयांच्या आरोग्यासाठी चिंताजनक ठरणारी माहिती समोर आली आहे. जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे ही भारतातील आहेत. आयक्यूएअर या स्विस संघटनेने मंगळवारी २०२० मध्ये जागतिक वायु गुणवत्तेच्या अहवालानुसार ही शहरांची यादी दिली आहे.
दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे. नवी दिल्ली सलग तिसर्या वर्षी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.आयक्यूएयर यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, २०२० पर्यंत हवेच्या प्रदूषणामुळे एकट्या दिल्लीमध्ये अल्पवयात ५०,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्याने कर्करोग, हृदयरोग व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होतात. त्यामुळे मृत्यदर वाढत आहे.
परंतु लॉकडाऊनमुळे दिल्लीतील हवेच्या दर्जात २०१९ ते २०२० या कालावधीत १५ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे, असेही अहवालामध्ये म्हटले आहे. तरीही सध्या देशातील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर आहे.
जगभराचा विचार केला तर जवळपास ७० लाख लोकांचा मृत्यू हा केवळ वायू प्रदूषणामुळे होतोय. यामध्ये सहा लाखांहून जास्त मृत्यू हे बालकांचे आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन लागलेला होता. त्यामुळे देशातील अनेक शहरात तुलनेने कमी प्रदूषण झाल्याचं दिसून आलं होतं. बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर भारत हा तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत चीनमधील झिनजिआंगचा समावेश आहे. त्यापाठोपाठ भारतातील नऊ शहरांचा समावेश आहे. गझियाबाद हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. दिल्लीसह गझियाबाद, बुलंदशहर, बिसराख जलालपूर, नोइडा, ग्रेटर नोइडा, कानपूर, लखनऊ, मेरठ, आग्रा आणि मुझफ्फरनगर त्याचप्रमाणे राजस्थानातील भिवारी, फरिदाबादर्, जींद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक आणि धरुहेरा आणि बिहारमधील मुझफ्फरपूर ही अन्य २१ शहरे प्रदूषित आहेत.

भारतामध्ये हवेचे प्रदूषण प्रामुख्याने वाहतूक, स्वयंपाकासाठी जाळण्यात येणारा बायोमास, वीजनिर्मिती, उद्योग, बांधकाम आणि कचरा जाळणे यामुळे होत आहे. तर दिल्लीत उद्योगधंद्यानी प्रदूषणाच्या नियमांचे पालन न करणे आणि शेजारील पंजाब, हरियाणा या राज्यात शेतीतील पराली म्हणजेच उत्पादन काढल्यानंतर उरलेला पालापाचोळा जाळला जातोय. त्यामुळे सुद्धा दिल्लीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होतेय.
या अहवालात १०६ देशांच्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याआधारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नक्कीच श्वास गुदमरतोय. या अहवालाच्या निमित्ताने यासाठी काय करता येईल याचा अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
तुम्हाला काय वाटतं?
लेखिका: शीतल दरंदळे