computer

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतोय...हे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या !!

दर्जेदार चित्रपटांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. जागतिक चित्रपटांचा अनुभव घेण्यासाठी पिफ (PIFF) म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून ऑनलाइन पद्धतीने रंगणार आहे. पिफचा हा १९ वा चित्रपट महोत्सव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव ऑनलाइन होणार असून आजपासून २५ मार्चपर्यंत तुम्हाला या महोत्सवात सहभागी होता येणार आहे.

या महोत्सवात जगातील सर्वोत्तम २६ चित्रपट दाखवले जाणार आहेत. हे सर्वोत्कृष्ट चित्रपट खास निवडून दरवर्षी दाखवण्यात येतात. यातले बरेचसे चित्रपट हे आंतरराष्ट्रीय महोत्सवात तसेच ऑस्कर नामांकन मिळालेले असतात. दरवर्षी या महोत्सवात अनेकजण आवर्जून सहभागी होतात. यंदाच्या वर्षी १००० प्रेक्षक या ऑनलाइन पद्धतीने महोत्सवातील सिनेमे पाहू शकतात. दररोज ४ चित्रपट अपलोड केले जातील. विशेष म्हणजे प्रति चित्रपट केवळ २० रुपये फी भरावी लागणार आहे.

आता मुख्य  प्रश्न म्हणजे नाव नोंदणी कशी करायची. तर, ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांनी www.piffindia.com या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे. या वेबसाईटवर सगळी माहिती उपलब्ध आहे. रोज अपलोड केले जाणारे चित्रपट किती वेळात पहायचे त्याचेही काही नियम आहेत. एक चित्रपट ८ तासांच्या आत कधीही बघता येईल.

ऑनलाईन महोत्सवात पायरसी होऊ शकते म्हणून चित्रपट पाहताना जे प्रेक्षक नोंदणी करतील त्यांच्या नावाचा वॉटरमार्क स्क्रिनवर दिसणार आहे त्यामुळे स्क्रिनशॉट किंवा रेकॉर्डिंग करता येणार नाही. तसेच एका यूजर आयडीने एकाच ठिकाणी एकाच डिव्हाईस वर लॉगिन करता येणार आहे. एकाच आयडीच्या आधारे एकापेक्षा अधिक लोक चित्रपट पाहू शकणार नाहीत.

या एक आठवड्याच्या ऑनलाईन चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी खूप लांब जाण्याची गरज नाही. सध्या चित्रपटगृह बंद आहेत तसेच OTT प्लॅटफॉर्मवर चांगले चित्रपट शोधताना गोंधळ उडतो. त्यामुळे उत्तम जागतिक चित्रपट अल्पदरात पाहण्याची ही खूप चांगली संधी आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required