इन्स्टाग्राममधली त्रुटी शोधल्याबद्दल सोलापूरच्या तरुणाला मिळालीय २२ लाखांची बग बाऊंटी!! पण ही बग बाऊंटी असते तरी काय?

सध्या तंत्रज्ञानाचा जमाना आहे. कुठलं तंत्र कधी कसं तुम्हांला काय घबाड मिळवून देईल काही सांगता येत नाही. त्यासाठी तुमच्या तंत्रातलं सखोल ज्ञान मात्र तुमच्याकडं असायला हवं. आपल्या सोलापूरच्या एका पठ्ठ्याने याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे.

मयूर फरताडे नावाचा एक हॅकर तरुण आहे. त्याने काय केले? तर इन्स्टाग्राममध्ये असलेली एक त्रुटी शोधून काढली. याच्या मोबदल्यात झुकरबर्गरावांनी त्याला तब्बल २२ लाखांचे बक्षीस दिले आहे.

तुम्हाला माहीत असेल की इन्स्टाग्रामवर प्रायव्हेट अकाउंट असेल तर जो व्यक्ती फॉलो करतो तीच व्यक्ती ते प्रोफाइल बघू शकते. पण इन्स्टाग्रामवर एक समस्या उद्भवली, तिच्यामुळे इतरांना देखील असे प्रायव्हेट अकाउंट बघणे शक्य झाले. या प्रकारच्या त्रुटी किंवा 'बग' शोधून काढल्यास मिळणाऱ्या बक्षिस रकमेला बग बाऊंटी म्हटले जाते.

मयूरने बग शोधला आणि त्याला बग बाऊंटी मिळाली. बग बाऊंटी शोधून काढल्यावर त्याला एक मेल करत कंपनीने त्याला मिळणार असलेल्या बक्षिसाची माहिती दिली. मयूरने याआधी अशा त्रुटी शोधण्याचं काम केलं आहे. पण तिथे काही त्याला इनाम मिळालं नाहीय.

 

सध्या बग बाऊंटी शोधून मोठ्या कंपनींकडून कमाई करण्यात भारतीय हॅकर्स आघाडीवर आहेत. फेसबुकसारख्या कंपन्या आपलं ऍप सुरक्षित ठेवण्यासाठी बग बाऊंटीज देतात. त्यात त्यांच्या ऍपमध्ये असणारे बग शोधून द्यायचे आणि त्या बदल्यात दाबून पैसे त्यांच्याकडून मिळवायचे हे काम हॅकर्स करतात. ज्ञान कधी, कसं, कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, हेच खरं!

सबस्क्राईब करा

* indicates required