computer

मेक्सिकोतल्या या राज्यात लोक पाण्याऐवजी दिवसाला चक्क २ लिटर कोक पितात!! पण यामागचं कारण काय? जाणून घ्या...

जगातल्या सर्वाधिक प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्या देशांच्या यादीत मेक्सिको या देशाचा समावेश होतो. आणि याच देशात एक असंही राज्य आहे जिथं प्रत्येक माणूस दररोज पाण्यापेक्षाही जास्त कोक पितो! या जाणून घेऊया या अनोख्या राज्याविषयी...

च्यापास किंवा चीयापास असं या राज्याचं नाव आहे. इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोका कोलाचा लोगो रंगवलेल्या इमारती दिसतील, प्रत्येक दुकानात कोका कोलाच्या बॉटल्सनी भरलेली लाल फ्रिज, कोपऱ्याकोपऱ्यावर कोका कोलाची जाहिरात करणारे बोर्ड, आणि हाच लोगो रंगवून फिरणारे ट्रकही दिसतील. वाढदिवस असो किंवा लग्न, अगदी एखादा धार्मिक समारंभही इथे कोका कोलाशिवाय अपूर्ण समजला जातो. इथल्या स्थानिक संस्कृतीमध्ये कोका कोलाला इतकं महत्त्वाचं स्थान मिळालंय की एखाद्या चर्चमध्येसुद्धा तुम्हाला कोका कोलाची बॉटल ठेवलेली बघायला मिळेल. इथल्या लोकांची अशी समजूत आहे की कोकची बॉटल ही आजारी लोकांना बरं होण्यास मदत करते, आणि चांगल्या आत्म्यांनाही हे कोक आवडते. 

या राज्यातल्या सॅन क्रिस्तोबल शहरातील आणि इतर काही डोंगराळ भागातील लोकांचं दरडोई कोक पिण्याचं प्रमाण हे २ लिटरहून जास्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी कोक पिण्याचं कारण आहे इथं असणारी पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई. इथं आठवड्यातून मोजक्याच वेळी पाणी येतं. तेही पिण्यायोग्य नसल्यानं अनेकांना टँकर्समधून पाणी विकत घ्यावं लागतं. आणि म्हणूनच लोक कोका कोला विकत घेऊन पितात, जो तिथं पाण्याच्या बाटलीपेक्षाही सहज आणि स्वस्तात उपलब्ध आहे. इथे मोठ्या प्रमाणात कोका कोला उपलब्ध होतो तो सॅन क्रिस्तोबल शहरात असणाऱ्या कोका-कोलाच्या फॅक्टरीमुळे.

सरकारसोबत असलेल्या एका जुन्या करारानुसार दिवसाला 3 लाख गॅलनहुन जास्त पाणी वापरण्याची मुभा या कंपनीला आहे. म्हणजेच एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई असतानाच या कंपनीकडून कोक बनवण्यासाठी लाखो लिटर शुद्ध पाणी वापरलं जातं. आणि दुसरीकडे पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे लोकांना कोक प्यावा लागतोय! या परिस्थितीला हा कोका कोलाचा प्रकल्पच जबादार असल्याचं अनेकांचं मत आहे. लोकांकडून हा प्रकल्प बंद करण्यासाठी मोर्चाही काढला गेलाय. पर्यावरणातील बदलांमुळे आधीसारखा पाऊस न पडणं हेही या पाणी टंचाईमागचं एक कारण समजलं जातं.

याविषयी या कोक बनवणाऱ्या कंपनीचे CEO आणि काही तज्ज्ञांचं मत आहे की या परिस्थितीला वेगानं होणारं शहरीकरण, ढिसाळ नियोजन आणि सरकारच्या गुंतवणुकीच्या अभावामुळं झालेलं शहरातल्या पायाभूत सुविधांचं नुकसान, या गोष्टी कारणीभूत आहेत. Femsa नावाची ही कंपनी संपूर्ण मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेत कोका कोलाचं उत्पादन करून विक्री करते. विशेष म्हणजे याच कंपनीचे एक पूर्व CEO सन 2000 ते 2006 या काळात मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष होते! या कंपनीनं शहरातील 400 जणांना रोजगार दिला असून राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी ती 200 मिलिअन डॉलरचं योगदान देते. 

 

साहजिकच इतक्या मोठ्या प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याचा दुष्परिणाम म्हणून इथल्या लोकांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढीस लागलंय. वर्षाकाठी ३०००हुन जास्त लोकांचा मृत्यू इथं मधुमेहामुळं होतो. प्रौढांसोबत लहान मुलंही अति प्रमाणात कोक पीत असल्यामुळं त्यांच्यातही मधुमेहचं प्रमाण वाढतंय. या भागात हृदरयरोगानंतर मधुमेह हा दुसरा मोठा गंभीर आजार समजला जातो. शहरातल्या जवळपास प्रत्येक घरात मधुमेहाने ग्रस्त व्यक्ती आहे. पण कोका कोला हा आता त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग बनल्यामुळं त्यांना यापासून रोखणंही तितकंच कठीण आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required