अन्नाशिवाय जगता येते हे सिद्ध करण्यासाठी जीव गमावलेली मुलगी....काय घडलं होतं?
पुराणातल्या कथांमध्ये ऋषीमुनींनी, राजांनी, भक्तांनी देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या केल्याची उदाहरणे वाचायला मिळतात. अन्नाचा एक कणही न खाता किंवा पाणीही न पिता हे तप केले जायचे. आता ह्या पुराणातल्या गोष्टी झाल्या. आजच्या काळात अन्न न खाता कोणी जिवंत राहू शकतं का? तर उत्तर असेल ‘नाही’.
पण जगात असेही काही लोक होऊन गेले किंवा आजही आहेत ज्यांना वाटतं, की माणूस अन्नाशिवाय राहू शकतो. या लोकांना breatharians म्हणतात. सोप्या भाषेत असे लोक जे ‘हवा खाऊन’ जिवंत राहतात. ह्या तत्त्वज्ञानाला breatharianism म्हटले जाते. आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे प्राणासाठी सूर्यप्रकाश गरजेचा असतो. Breatharians चा यावर गाढ विश्वास असतो. केवळ सूर्यप्रकाश आणि प्राणवायूवर मानव जिवंत राहू शकतो हे ते ठामपणे सांगतात.
खरी गोष्ट तर अशी की हे तथाकथित breatharians लपूनछपून अन्न घेतात. ज्यांनी ह्या गोष्टीला मनावर घेतले आणि अत्यंत कठोरपणे त्याचे पालन केले त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज आम्ही अशाच एका आपले प्राण गमावलेल्या मुलीची कथा सांगणार आहोत.
गोष्ट आहे सारा जॅकोब या मुलीची. तिचा जन्म १२ मे १८५७ साली इंग्लंडच्या व्हेल्स राज्यातल्या कार्माथनशायरच्या एका गावात झाला होता. ती सुदृढ होती, हुशार होती आणि तिला इंग्रजी वाचता लिहिता यायचे. कोणत्याही साधारण मुलीसारखीच ती होती.
१८६७ साल होतं. सारा दहा वर्षांची होणार होती, पण वाढदिवसाच्या काही दिवसाअगोदर ती प्रचंड आजारी पडली आणि ती कोमात गेली. ती पुन्हा शुद्धीवर यायला १ महिना जावा लागला. शुद्धीवर आल्यानंतर तिची अन्न घ्यायची इच्छाच संपली होती. सुरुवातीचे काही आठवडे तिने थोडा भात, ओटमिल, आणि दुध घेतले. काही दिवसांनी हे प्रमाण कमी होऊन ती केवळ फळांवर जगू लागली. पुढे तर तिने अन्नाचा संपूर्ण त्याग केला. सुरुवातीला साराच्या आईवडिलांनी तिला अन्न घेण्यासाठी अनेक विनंत्या केल्या पण कालांतराने त्यांनी प्रयत्न थांबवले.
साराला एनोरेक्सिया असण्याची शक्यता वर्तवली जाते. हा भूक मंदावण्याचा आजार आहे. हा आजार असलेली व्यक्ती आपलं वजन आटोक्यात ठेवण्यासाठी अन्नावर मोठ्याप्रमाणात निर्बंध आणते. हे प्रमाण एवढं असतं की त्या व्यक्तीच्या शरीरात हाडेच काय ती शिल्लक राहतात. ह्या आजाराची लक्षणे बघितली तर साराने अन्नत्याग करण्यामागे तिला एनोरेक्सिया आजार होता का असा प्रश्न पडतो. याखेरीज ती आजारातून बरी होत असताना तिचे धार्मिक पुस्तके वाचण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे तिने अन्नत्याग केला तो धार्मिक कारणाने केला का असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण काहीही असले तरी पुढे जे घडले ते इतिहासात प्रसिद्ध झाले.
साराने पूर्ण अन्नत्याग केल्यानंतर आधी चिंतेत असलेल्या तिच्या आईवडिलांना आता तिचे कौतुक वाटू लाग;ए. तिची बातमी गावभर व्हायला वेळ लागला नाही. गावच्या लोकांसाठी ती चमत्कार होती. गावातल्या धर्मगुरूने हे पाहिल्यानंतर त्याने ही बातमी एका वर्तमानपत्राला दिली आणि काय चमत्कार. या बातमीने सारा एका रात्रीत प्रसिद्ध झाली. लवकरच लोक मजल दरमजल करत साराला पाहण्यासाठी तिच्या गावी येऊ लागले. ते तिच्या चेहऱ्याला हात लावत, हात हातात घेत आणि ती लोकांना धर्मग्रंथातील वचने म्हणून दाखवी. तिच्या आईवडिलांनी तिच्या प्रसिद्धीचा पुरेपूर फायदा करून घेतला आणि पैसे कमावले.
आता हा खरोखर चमत्कार होता कां? तर नाही...असं म्हणतात की सारा चोरून अन्न घ्यायची. हे काम ती रात्री करत असावी असेही म्हटले जाते. तिने हे काम एवढ्या सफाईदारपणे केले की ती अन्न कशी घ्यायची हे आजही कोडेच आहे.
तिची प्रसिद्धी वाढत गेली तसे तिच्यावर संशयही येऊ लागला. एका धर्मोपदेशकाने तिच्यावर नजर ठेवण्यासाठी जागरण आयोजित केले. तिचे आईवडील तिला रात्रीच्यावेळी अन्न देतात का हे त्याला पहायचे होते. हे जागरण दोन आठवडे चालले असले तरी पण दिवसातले संपूर्ण तास चालले नसल्याने यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
दोन वर्षे म्हणजे १८६९ सालात तिची सत्यता तपासण्यासाठी अत्यंत कठोर तपासणी करण्यात आली. याला साराच्या आईवडिलांचाही पूर्ण पाठींबा होता. १४ दिवसांसाठी तिच्या सोबतीला ४ प्रशिक्षित नर्सेस ठेवण्यात आल्या. दिवस आणि रात्रभर या नर्सेसकडून सारावर नजर ठेवली गेली. चौघींनाही साराला अन्न द्यायचे नाही (तिने मागितले तरी) असे निक्षून सांगण्यात आले होते.
सारा आता पुरती अडकली होती पण तिचा स्वाभिमान जागृत होता. तिने ह्या परीक्षेतून जायचे ठरवले. तिला वाटले की आपण कसेबसे निभावून नेऊ, पण तिला हे जमले नाही. ती दिवसेंदिवस अधिकाधिक अशक्त होत गेली. पण तिने अन्न मागितले नाही. आठ दिवसांच्या कालावधीनंतर ती मरणाच्या दारावर येऊन ठेपल्यानंतर नर्सेसनी तिच्या आईवडिलांना याची बातमी कळवली, पण तिच्या आईवडिलांनी तिला अन्न देण्यास साफ नकार दिला. परिणामी साराचा मृत्यू झाला.
शवविच्छेदनात साराच्या मृत्युचं एकमेव कारण समोर आलं, ते म्हणजे ‘उपासमार’.
(साराचे आईवडील)
साराच्या आईवडिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यावर खटला भरला. साराच्या मृत्यूसाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले. तिच्या वडिलांना वर्षभरासाठी सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली, तर आईला ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
खरे तर तिच्यावर नजर ठेवणाऱ्या नर्सेस आणि डॉक्टर्सचाही तेवढाच दोष होता. माणुसकीच्या नात्याने का होईना पण साराला अन्न देऊन वाचवता येऊ शकले असते, पण ते तिच्या आईवडिलांच्या निर्दयी निर्णयाचं पालन करत तिला मरताना पाहत राहिले.
(ॲन मूर)
सारासारख्या अनेक कथा युरोपच्या इतिहासात वाचायला मिळतात. डर्बशायरच्या ॲन मूरचं उदाहरण प्रसिद्ध आहे. सारा दुर्दैवी होती पण ॲन मूरने अशा अग्निपरीक्षेतही चीटिंग करून स्वतःचा जीव वाचवला होता. तिचा दावा होता की तिने सात वर्षांपासून अन्न घेतलेले नाही. तिच्या या दाव्याने तिला प्रसिद्ध केले. तिला दोन वेळा परीक्षेला सामोरे जावे लागले. पण साराप्रमाणे ती भुकेने मेली नाही तर तिने अत्यंत कडक निगराणीतही पद्धतशीरपणे अन्न घेतले. तिच्यावर नजर ठेवलेली असताना तिची मुलगी तिला भेटायला यायची. मुलगी चुंबन देताना ॲनच्या तोंडात अन्न सारायची, याखेरीज दुधात किंवा रश्श्यात भिजवलेल्या टॉवेलने ती तिचं तोंड पुसायची आणि तोंड पुसता पुसता हा टॉवेल तोंडात टाकला जायचा. याप्रकारे ॲनने १६ दिवसांची परीक्षा पार केली.
असे म्हणतात की माणसाकडून भूकच सगळ्या गोष्टी घडवून आणते. त्यामुळे ह्या पोटातल्या भुकेलाच संपवण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून होत आला आहे, पण हे अशक्य आहे. ज्यांनी प्रयत्न केला त्याचं काय झालं हे आपण पाहूच शकतो.
तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.




