एक जुलै पासून बँका आणि सरकारी खात्यात काय नियम बदलत आहेत जाणून घ्या एका क्लिकवर
१ जुलै पासून बरेच महत्वाचे नियम बदलले जात आहेत. बहुतेक बदल हे बँकिंग सेवेशी संबंधित आहेत. तसेच दागिने, सिलेंडरची किंमत, नवे ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांच्या नव्या किंमती यातही अनेक बदल होणार आहेत. हे नवीन नियम आपल्या सर्वांना माहीत असणे खूप गरजेचे आहे. या नव्या नियमांमुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला अजून कात्री लागते की अजून दिलासा मिळतो हे आज पाहूयात.
एसबीआय (State Bank of India)
SBI बँकेत 1 जुलैपासून खातेधारक बँकेचे एटीएम तसेच शाखांतून फक्त चार वेळा मोफत रोख रक्कम काढू शकतील .
यानंतर रोख पैसे काढताना १५ रुपये अधिक जीएसटी द्यावे लागतील. SBIचे चेकबुकचे नियमही बदलले आहेत. खातेधारकांना आर्थिक वर्षात चेकबुकमध्ये फक्त १० पानं वापरण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. चेकबुकची १० पानं संपल्यावर पुढील १० पानांसाठी ४० रू आणि २५ पानांसाठी ७५रू. अधिक जीएसटी भरावा लागेल. फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी कोणतीही फी आकारली जाणार नाही. त्यांना सूट देण्यात आली आहे.
टीडीएस नियमात बदल
ज्यांनी मागील दोन वर्षांपासून आयकर रिटर्न्स भरलेले नाही, त्यांच्यासाठी पुढील महिन्यापासून टीडीएस दरानुसार अधिक कर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम त्या करदात्यांना लागू होईल ज्यांचा टीडीएस दरवर्षी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त कापला जातो. नवीन नियमानुसार ५० लाख रुपयांहून अधिक खरेदीवर ०.१० टक्के टीडीएस वजा केला जाईल. मागील वर्षी एखाद्या व्यावसायिकाची उलाढाल १० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल तर यावर्षी त्याला केवळ ५० लाखांपर्यंतची वस्तू खरेदी करता येईल.
सिंडिकेट बॅंक (Syndicate Bank) नवीन IFSC कोड
कॅनरा बँकेत झालेल्या विलीनीकरणामुळे सिंडिकेट बँक खातेदारांना नवीन आयएफएससी कोड दिले जातील. जुने कोड फक्त ३० जूनपर्यंत चालतील. १ जुलैपासून बँकेचा नवीन आयएफएससी कोड लागू होईल. सर्व सिंडिकेट बँक खातेदारांना आता त्यांच्या बँक शाखेत नवीन आयएफएससी कोड वापरावा लागेल.
आयडीबीआय (IDBI) बँकेचे बदलेले नियम
आयडीबीआय बँक १ जुलैपासून चेक लीफ शुल्क, बचत खाते शुल्क आणि लॉकर चार्जमध्ये बदल करीत आहे. प्रमुख शाखा व इतर शाखांमध्ये रोख जमा करण्याचे नियमही बँकेने बदलले आहेत. पूर्वी निम-शहरी भागात ७ वेळा आणि ग्रामीण शाखांमध्ये १० वेळा रोख पैसे जमा करता येत होते. आता ते ५ वेळाच करण्यात आले आहे. याशिवाय आता ग्राहकांना दरवर्षी ६० पृष्ठांचे चेक बुक विनामूल्य मिळायचे, आता केवळ २० पृष्ठांचे चेकबुक विनामूल्य मिळणार आहे. त्यापुढे नव्या चेकबुकसाठी पैसे मोजावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या खात्यावर मासिक सरासरी शिल्लक १०हजार असेल तरच लॉकरवर सूट मिळेल.
एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलतील
सिलिंडरच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. तेल कंपन्या या किंमती कमी किंवा जास्त करत असतात. एलपीजीच्या किमतींमध्ये १ जुलै रोजी नवे बदल घडण्याची शक्यता आहे.
वाहनांच्या किंमती वाढणार
१ जुलैपासून मारुती सुझुकी कार आणि हिरोच्या बाईक्स महागड्या होत आहेत. हिरो स्कूटर आणि मोटारसायकल्सच्या एक्स शोरूम किंमतीमध्ये तीन हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. तसेच मारुतीच्या कारच्या किंमतींमध्येही वाढ होणार आहे. स्टील, प्लास्टिक आणि अॅल्युमिनियमच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे या किंमती वाढणार असल्याचे मानले जात आहे.
लर्निंग लायसन्स घरच्याघरी
तुम्हाला लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओकडे जाण्याची गरज लागणार नाही. ऑनलाईन अर्ज करून तुम्ही घरातूनही चाचणी देऊ शकता. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिकण्याचा परवाना तुमच्या घरी पोहोचेल. परंतु परमनंट लायसन्ससाठी आरटीओमध्ये जाऊन चाचणी द्यावी लागेल.
दागिन्यांना यूआयडी कोड
१ जुलैपासून हॉलमार्क केलेल्या प्रत्येक दागिन्यांला युनिक आयडेंटिफिकेशन (यूआयडी) अनिवार्य असणार आहे. या यूआयडीमध्ये विक्रेत्याचा कोड आणि दागिन्यांची ओळख नोंदविली जाईल. समजा दागिना चोरीला गेला तर तो शोधणे अधिक सोपे जाणार आहे. बीआयएसने बनविलेल्या मोबाईल अॅपमध्ये पोलिस किंवा कोणतीही व्यक्ती हा यूआयडी टाकून प्रवेश करताच ते केव्हा व कोठून विकत घेतले गेले ते कळू शकेल. तसेच दुकानदाराकडे त्याने तो दागिना कोणाला विकला याची माहिती मिळू शकेल.
यातले बरेचसे नियम हे सर्वसामान्य जनतेला अधिक खर्चात टाकणारे, तर काही नियम थोडाफार दिलासा देणारे आहेत. तुम्हाला काय वाटते?
शीतल दरंदळे




