हा भारतीय मुलगा ठरलाय जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर...त्याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या!!

भारतीय मुले आपल्या हुशारीने नेहमीच देशविदेशात धुमाकूळ घालत असतात. बुद्धीबळ म्हटले तर विश्वनाथन आनंदच्या रूपाने जगज्जेता खेळाडू भारताकडे आहे. आता बुद्धिबळात नव्या भारतीय ताऱ्याचा जन्म होत आहे, असे म्हणता येईल एवढे कर्तृत्व एका १२ वर्षांच्या भारतीय मुलाने गाजवले आहे.
बुदापेस्ट येथे नुकतीच बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. त्यात सध्या अमेरिकेतील न्यूजर्सी येथे राहणाऱ्या अभिमन्यू मिश्रा या १२ वर्षीय मुलाने ग्रँडमास्टर ही पदवी मिळवली आहे. एवढेच नव्हे तर त्याने १७ वर्षे जुना विक्रम पण तोडला आहे. २००२ साली करजाकीन याने १२ वर्षे ७ महिन्याच्या वयात ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम केला होता. अभिमन्यूने १२ वर्षे ४ महिने एवढ्या कमी वयात हा विक्रम मोडून काढला आहे. विशेष म्हणजे करजाकीन पुढे जाऊन २०१६ साली बुद्धबळात जगज्जेता ठरला होता. त्याने अभिमन्यूला पुढिल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिमन्यू समोर १५ वर्षीय भारतीय खेळाडू लियोन ल्युक हा होता. त्याला ब्लॅक पिसने हरवत अभिमन्यूने ९ राउंड्समध्ये २६०० पेक्षा जास्त रेटिंग मिळवले आहे. मात्र त्याचा प्रवास सोपा नव्हता. एका मागे एक स्पर्धा खेळत त्याने कित्येक महिने हंगेरी आणि बुदापेस्ट मध्ये घालवले आहेत. आयोजकांनी शेवटची स्पर्धा आयोजित केली आणि अभिमन्यूला कळून चुकले की ही आपल्याजवळ शेवटची संधी आहे. त्याने बरोबर लास्ट बॉलवर सिक्सर मारत जागतिक विक्रम तयार केला.
अभिमन्यू या यशाने प्रचंड खुश आहे. मात्र तो नम्रपणे आपल्याला विरोधी खेळाडूने केलेल्या चुकांचा फायदा झाला हे पण कबूल करतो. विश्वनाथन आनंद पाठोपाठ अभिमन्यू मिश्राच्या रूपाने भारताला अजून एक जगज्जेता बुद्धिबळपटू मिळावा यासाठी बोभाटाकडून अभिमन्यूला शुभेच्छा...