या भावांनी बिबट्याला मारण्यासाठी हत्यार म्हणून केक वापरलं आहे....संपूर्ण घटना समजून घ्या!!
जीवघेण्या प्राण्यांच्या कचाट्यात सापडल्यावर त्यातून बाहेर पडणे तसे खूप कठीण काम असते. पण अनोखी युक्ती करून अशा हल्ल्यातून सुखरूप वाचता येते, हे मध्यप्रदेशातील दोन तरुणांनी दाखवून दिले आहे.
मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जवळील नेपानगर येथील ही घटना आहे. संध्याकाळची वेळ होती. फिरोज आणि साबीर मंसुरी हे दोन्ही भाऊ वाढदिवसासाठी केक आणण्यास गेले होते. केक घेऊन परत येत असताना एका उसाच्या शेताजवळ बिबट्याने त्यांना गाठले. मोटरसायकलवर बिबट्याने आपल्या पंज्याने वार करण्यास सुरुवात केली. जवळपास अर्धा किलोमीटर त्यांचा मृत्यूशी लपंडाव सुरू होता. मोटरसायकल पळविण्याचा प्रयत्न पण यशस्वी होत नव्हता. जवळपास बिबट्याला आवरण्यासाठी कुठले हत्यार नव्हते, अशी कोंडी या भावंडांची झाली.
आता यातून वाचायचे कसे यासाठी त्यांना वेगळाच मार्ग दिसला, तो म्हणजे हातात असलेला केक फेकून मारणे. आता या भयानक बिबट्याला केक मारून फरक तरी काय पडला असता? पण त्याच्या तोंडावर मारलेला केक लागल्याबरोबर बिबट्या गोंधळला आणि या मिळालेल्या काही सेकंदांमध्ये फिरोज आणि साबीर यांना आपली मोटरसायकल पळवून जाण्यास वेळ मिळाला.
नेपानगर भागात वनविभागाने जागोजागी नोटीस फलक लावून ठेवले आहेत. या भागात बिबट्यांचा सुळसुळाट आहे. कधी कधी तर थेट मानवी वस्त्यांमध्ये बिबट्या शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही भावांचे नशीब बलवत्तर जे ऐनवेळी केक कामी आला. मात्र कधीकधी एखादी साधी गोष्ट पण जीव वाचवू शकते, हे यातून दिसून येते.




