computer

र. धों. कर्वेंनी सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य'मुळे कुटुंबनियोजनाचा इतिहास कसा बदलला? हे आहेत महत्त्वाचे टप्पे!!

सध्याच्या प्रेगान्यूजच्या जमान्यात आपल्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या सोबत टिव्ही बघताना नजरेसमोर 'मॅनफोर्स' कंडोमची जाहिरात बघताना कोणालाच अवघडल्यासारखे वाटत नाही. पण एकेकाळी कंडोम हा शब्दच जाऊ द्या, पण साधा 'कुटुंबनियोजन' हा शब्दही मोठ्याने उच्चारणे हे पाप समजले जायचे. फॅमिली प्लॅनिंग हा विषय आता सगळ्यांना आपोआप समजतो आहे आणि त्यावर अंमलही केला जातोय. 'बोभाटा'ने आज हा विषय वाचकांसमोर मांडायचे एक खास कारण आहे ते म्हणजे १५ जुलै १९२७ रोजी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या 'समाजस्वास्थ्य' नियतकालीकाचा पहिला अंक प्रकाशित झाला होता.

तो काळ असा होता की 'सेक्स' हा विषय उघडरीत्या चर्चा करणार्‍या माणसांना सामाजिक बहिष्काराला तोंड द्यावे लागायचे. रघुनाथ कर्वे यांच्या वाट्यालाही समाजाकडून कुचेष्टा- अपमान- तिरस्कार-उपहास याखेरीज आणखी काही वाट्याला आले नाही. ज्या समाजात कामव्यवहार, कामप्रेरणा, समागम, कुटुंबनियोजनाच्या पद्धती, प्रजनन, स्त्रियांचे विकार, स्त्रीपुरुष संबंध याबद्दल निव्वळ अज्ञान असेल त्या समाजाचे स्वास्थ्य धोक्यात येते अशी कर्व्यांची विचारधारा होती. आज कुटुंबनियोजन हा विषय आपल्या समजाने आत्मसात केला असेल तर त्याचे श्रेय केवळ रघुनाथ धोंडॉ कर्वे यांनाच जाते. समाजस्वास्थ्यच्या निमित्ताने आज आपण बघू या कुटुंबनियोजनाच्या इतिहासाचे काही महत्वाचे टप्पे!

 

(रघुनाथ धोंडो कर्वे)

हा इतिहास वाचण्यापूर्वी एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीत कुटुंबनियोजनाचा विचार आणि त्याची जबाबदारी केवळ स्त्रियांच्याच डोक्यावर होती. आजवर पुरुषांनी फायदेशीर/सोयीस्कर अशाच पध्दतीचा अवलंब करण्याची सामाजिक प्रथा आहे. याला आपण 'हात झटकून मोकळे होणे' असेही म्हणू शकतो. जर असे केले नसते तर कदाचित आज आपल्याला वेगळे चित्र दिसले असते. ते कसे ते या इतिहासातून आपल्याला समजेलच!

१. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी त्याच्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकातून १९२७ सालापासून प्रथम कुटुंबनियोजनाचा प्रसार करायला सुरुवात केली. योग्य साधने वापरली तर वाढत्या लोकसंख्येला आळा बसेल, नको असलेले गर्भारपण आणि गर्भपात यातून स्त्रियांची सुटका होईल, पुरेशा उत्पन्नाअभावी कुटुंबाची होणारी फरपट थांबेल या हेतूने त्यांनी हा प्रसार केला. केवळ प्रसारच केला असे नव्हे तर आपल्या विचारांची प्रामाणिकता दर्शवण्यासाठी त्यांनी आणि त्यांची पत्नी मालती यांनी अपत्य होऊ दिले नाही. पण तो काळ फारच वेगळा होता. कुटुंब नियोजन या विषयाला सामाजिक विरोध होता. 'समाजस्वास्थ्य'चे अंक चोरून वाचले जायचे. पण रघुनाथ धोंडो कर्वे यांनी त्यांचा प्रचार थांबवला नाही. त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रियासतकार सरदेसाई, रँग्लर परांजपे, मामा वरेरकर या सर्व विचारवंतांनी त्यांच्या विचारांची पाठराखण केली. पण त्यांचे विचार प्रत्यक्षात येण्यास बरीच दशके जावी लागली.

२ सरकारने कुटुंबनियोजनाचा पुरस्कार करून प्रचार करावा असे र.धों. कर्वे यांचे मत होते. पण या विचाराला समाजाच्या सर्व स्तरातून तेव्हा विरोध करण्यात आला. कुटुंबनियोजनाची साधने वापरून नियोजन करणे या संकल्पनेला महात्मा गांधींचा विरोध होता. त्यांच्यामते स्वतःवर म्हणजे स्वतःच्या कामेच्छेवर ताबा मिळवणे हाच एकमेव मार्ग होता. त्यांच्या मते "कृत्रिम साधने वापरणे म्हणजे अनैतिकतेला अधिमूल्य देण्यासारखे आहे. स्त्री आणि पुरुष त्यामुळे बेपर्वा होतील. सामाजिक बंधने आणि त्यांचा आदर लयाला जाईल. समाज अशक्त आणि नैराश्यग्रस्त होईल. रोगापेक्षा हा उपाय वाईट आहे." ब्रह्मचर्याचा अवलंब करून कुटुंबनियोजन करणे हा योग्य मार्ग आहे असे महात्माजींचे मत असल्याने हा विषय बरीच वर्षे मागे पडला. त्यांच्या अनुयायांपैकी जयप्रकाश नारायण यांनी तो मार्ग स्वीकारून ब्रह्मचर्याचे पालन केले. सर्वसामान्य जनतेला हे शक्य नसल्याने भारताची लोकंसंख्या वाढतच राहिली. ज्याला पॉलिटिकल विल किंवा राजकीय इच्छाशक्ती असे म्हणतात त्याचा पूर्ण अभाव असल्याने हा कार्यक्रम स्वीकारण्यात बरीच वर्षे वाया गेली.

(महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण)

३. १९५१ साली भारत सरकारने राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. विकसनशिल देशांमध्ये कुटुंबनियोजनाला सरकारमान्य धोरण म्हणून राबवणारा भारत हा पहिला देश होता. १९५१ ते १९७९ या काळात कुटुंब नियोजन हा पंचवार्षिक योजनेचा भाग होता. सुरुवातीला 'सेफ पिरीयड' या कल्पनेपासून झाली. सेफ पिरीयड म्हणजे प्रजनन होण्याची शक्यता कमी शक्यता असलेले दिवस! परंतु हा प्रकार तसा 'अंदाजपंचे' असल्याने नियोजन फसायचे. हळूहळू कृत्रिम साधने म्हणजे निरोध, तांबी यांचा वापर सुरु झाला. तांबी म्हणजे कॉपर टी ला त्याकाळात लूप म्हटले जायचे. शास्त्रीय भाषेत त्याला इन्ट्रायुटेरीन डिव्हाइस किंवा आय.यु.डी या नावाने ओळखले जाते. थर्मोप्लास्टीकचा वापर करून बनवलेल्या या साधनाला Lippes Loop म्हटले जायचे. सुरुवातीच्या 'लूप' मुळे बर्‍याच वेळा ओटीपोटात जंतूसंसंर्ग व्हायचा. या संसर्गाला केवळ लूपच जबाबदार होते असे नाही. मासिक धर्माच्यावेळी वारंवार वापरली जाणारी फडकीसुद्धा जंतूसंसर्गाला जबाबदार असायची. पण एकंदरीत जंतूसंसर्गामुळे होणारा त्रास महिलांनाच सोसावा लागायचा. त्यामुळे महिलांच्या मनातही आय.यु.डी बद्दल नकारात्मक भूमिका तयार झाली.

(Lippes Loop)

४. १९७६ नंतर कॉपर टी या साधनाचा वापर सुरु झाला. लूपपेक्षा कॉपर टी वापरायला सुटसुटीत आणि सुरक्षित होती. याच दरम्यान पुरुषांनी वापरण्यासाठी सुटसुटीत असे साधन म्हणजे 'कंडोम'चा वापर सुरु झाला होता. सरकारपुढे समस्या अशी होती की कंडोम बनवण्याचे कारखाने येव्हा भारतात नव्हते. ब्रिटिशांच्या काळातही कंडोम उपलब्ध होते, पण त्यांची सरासरी किंमत तेव्हा चार आणे होती (म्हणजे आताचे १० रुपये) त्यामुळे नियमित वापरासाठी स्वस्त कंडोम मिळवणे हा एकच उपाय होता. त्यासाठी सरकारने ४० कोटी कंडोम अमेरिका, जपान, कोरियातून मागवून घेतले आणि स्वस्त दरात म्हणजे पाच पैशांत विकायला सुरुवात केली. अशा पध्दतीने भारतात 'निरोध' चा जन्म झाला. सुरुवातीला निरोध या नावाऐवजी 'कामराज' या नावाने हे कंडोम बाजारात आणले जाणार होते. पण त्यावेळी सत्ताधारी प्क्षाचे अध्यक्ष यांचेच नाव के. कामराज होते त्यामुळे 'निरोध' हेच नाव पक्के करण्यात आले. त्यानंतर १९६६ साली एका जपानी कंपनीसोबत करार करून भारतात 'हिंदुस्थान लॅटेक्स' या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि निरोधचे उत्पादन भारतात सुरु झाले.

५. १९७५च्या आणीबाणीच्या वर्षात सक्तीची नसबंदी हा प्रकार घडला. त्यामुळे पुन्हा एकदा कुटुंबनियोजनाविरुध्द गदारोळ झाला. पण त्यानंतरच्या काळात समाजाने काळाची गरज ओळखून फॅमिली प्लॅनिंगचा अवलंब केला. सरकारी दवाखान्यातील परिचारीका आणि डॉक्टरांचा कुटुंबनियोजनात मोठा सहभाग होता. महिलांना बाळंतपणाच्या दिवसात योग्य तो सल्ला देऊन त्यांचे मन वळवण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. यानंतरच्या काळात 'लॅप्रोस्कोपी'चे तंत्र विकसित झाले. यामध्ये एक नळी ओटीपोटात टाकून त्यासोबत जोडलेल्या मायक्रोस्कोपमधून महिलांची फॅलोपीन ट्यूब बंद करता येते. कमीतकमी रक्तस्त्राव- कमीतकमी टाके आणि दुसर्‍या दिवशी घरातल्या कामासाठी मिळणारी परवानगी या महत्वाच्या गुणांमुळे कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेला महिलांनी उचलून धरले. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या नावाने हे तंत्र पॉप्युलर झाले आहे. पुरुषांसाठीही असेच साधे सोपे तंत्र आहे ज्यामध्ये शुक्रजंतूंचे वहन करणारी नलिका cautery या तंत्राने बंद करता येते. 'लॅप्रोस्कोपी' पेक्षाही हे तंत्र सोपे आहे. टाकारहीत आहे, पण पुरुषत्व नाहीसे होते या अफवेमुळे पुरुष ही शस्त्रक्रिया टाळतात.

(लॅप्रोस्कोपी)

६. १९९० च्या नंतर जन्माला आलेल्या पिढीला कुटुंबनियोजन हा विषय परिचित असल्याने प्रचार आणि प्रसाराची गरज भासत नाही हे खरे आहे, पण १९८२ नंतर आलेल्या एचआयव्हीच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा कंडोमचा प्रचार सरकारला करावा लागला. पण तो विषय थोडा वेगळा असल्याने त्याचे इतकीच नोंद इथे आपण घेत आहोत. त्यानंतरच्या काळात एमटीपी म्हणजे मेडीकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीचा कायदा आला. सरकारी नोकरीच्या क्षेत्रात आणि लोक प्रतिनिधी निवडण्यात अनेक नियम आणून कुटुंबनियोन हा विषय गांभिर्याने पुढे नेण्यात आला.

आता मनोरंजन क्षेत्राने- विशेषतः चित्रपटाच्या माध्यमाने कुटुंबनियोजनाला कसे समाजापर्यंत नेले ते पण वाचूया. चित्रपट हा जनतेचा आवडता विषय हे लक्षात घेऊन सरकारने अनेक डॉक्युमेंटरी बनवल्या. त्यामुळे लोकशिक्षण झाले. तरीहि योग्य तो प्रतिसाद मिळेना तेव्हा महाराष्ट्र सरकारने चित्रपटाचे माध्यम वापरण्याचे ठरवले. त्याचे झाले असे की १९६० साली देवानंदचा 'एक के बाद एक ' हा चित्रपट आला. सात अपत्य असलेल्या कुटुंबाचे पैसे अपुरे असल्याने काय हाल होतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. हा चित्रपट पडला, पण हाच विषय घेऊन ग.दि. माडगूळकरांनी 'प्रपंच' या चित्रपटाची कहाणी लिहिली. त्या चित्रपटातले 'विठ्ठला तू वेडा कुंभार ' हे गीत आजहि सगळ्यांच्या आवडीचे आहे. एक गरीब कुंभार -त्याची अनेक मुले आणि त्याचा संसार यावर आधारीत ही कहाणी होती. हा चित्रपट लोकांना खूपच आवडला. त्यातून कुटुंबनियोजनाचा प्रचार होत होताच हे लक्षात घेऊन सरकारने 'प्रपंच'ची अनेक रिळे घेऊन स्वतःच्या खर्चाने गावोगावी हा चित्रपट दाखवला. समाजात जागरुकता आणण्यासाठी हा एक अभिनव प्रयोग केवळ महाराष्ट्रातच झाला हे इथे नमूद करायला हवे.

आज हा विषय सांगावा लागत नाही, त्याचा प्रचार करावा लागत नाही, त्याची चर्चा उघडपणे करता येते. पण अशा समाजोपयोगी विषयाला १९२७ साली हात घालणार्‍या रघुनाथ धोंडो कर्वे यांना 'बोभाटा'चे अभिवादन! त्यांच्या आयुष्यावर डॉ अनंत देशमुख यांनी लिहिलेले र.धों.कर्वे :व्यक्तित्व आणि कर्तृत्व हे पुस्तक सहज उपलब्ध आहे ते जरूर वाचा!

सबस्क्राईब करा

* indicates required