दिनविशेष : अंगणवाडीत गेला आहात ना? ती कुणी सुरू केली ठाऊक आहे?

आजच्या घडीला पूर्ण भारतभर अंगणवाड्या आहेत. त्या अंगणवाड्या सुरू केल्या त्या दोन महाराष्ट्राच्या कन्यांनी. अनुताई वाघ आणि त्यांच्या गुरू ताराबाई मोडक यांनी. आज २७ सप्टेंबर, अनुताई वाघांचा स्मृतीदिन.आजच्या या दिवशी बोभाटा.कॉम टीमकडून अनुताई वाघांना आदरांजली. 

ब्रिटिश सरकारनं मॅडम मॉंटेसरींची शिक्षणपद्धती भारतात आणली. पण ती पद्धत सरसकट आपलीशी करावी अशी नव्हती.  या दोन देशांच्या संस्कृती, समाज, भूगोल या सगळ्याच गोष्टींत खूप तफावत होती.  यावर उपाय म्हणून अनुताई वाघ आणि त्यांच्या गुरू ताराबाई मोडकांनी ’अंगणवाडी’ साकार केली. मुलांचं शिक्षण म्हणजे त्यांचं खेळणे! ‘शिकलो’ हे लक्षातही येऊ न देता मुलांना शिक्षित करावयाचं; खेळण्याच्या, बालगीतांच्या, गोष्टींच्या रूपात शैक्षणिक साधने तयार करावयाची, त्यासाठी मुलांच्या भावविश्वाचा शोध घ्यावयाचा आणि स्वतः बनविलेले शिक्षणसाहित्य वापरून मुलांना हाताळायचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. लहान मुलांना आपण ’शिकलो’ हे न कळू देता त्यांना लहान-सहान गोष्टी शिकवण्यावर अनुताई वाघांचा भर होता.  खेळ-खेळण्यातून , बालगीतांतून आणि गोष्टींतून त्यांनी मुलांना कसं शिकवावं याची बरीचशी साधनं तयार केली. तर या मुलांना कसे शिकवायचे यासाठी त्यांनी अंगणवाडी शिक्षिकांसाठीही प्रशिक्षण दिलं. इतकंच नाही, तर आदिवासी पाड्यांवर जाऊन त्यांच्या मुलांना शिकण्यासाठी उध्युक्त केलं. ते जर शाळेपर्यंत येत नसतील, तर शाळा आदिवासींपर्यंत गेल्या पाहिजेत हे त्यांचं मत होतं. 

१७ मार्च १९१० या दिवशी पुण्यात जन्मलेल्या अनुताई  त्यांच्या कामामुळे  सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचं आयुष्य खूपच खडतर होतं. आणि तरीही त्यातून त्या सतत मार्ग काढत पुढे जात राहिल्या.  वयाच्या तेराव्या वर्षी आलेलं वैधव्य, त्यातून तेव्हाच्या चालीरीती आणि रूढींच्या विरोधात जाऊन शिक्षण चालू ठेवणं, नोकरी करता करता रात्रशाळेत शिकणं, मोतिबिंदू झाला म्हणून वाचक घेऊन शिक्षण पुढे चालू ठेवणं, एक ना दोन. अशा अडचणींमुळे त्या थकल्या तर नाहीतच, उलट त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच १९९२पर्यंत त्या सतत शाळेत शिकवत राहिल्या. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना आदर्श शिक्षिका आणि दलित मित्र हे पुरस्कार मिळाले. इचलकरंजीचा फाय फाऊंडेशन पुरस्कार, आदर्श माता, सावित्रीबाई फुले पुरस्कार,  बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार , जमनालाल बजाज पुरस्कार , दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा आशा भोसले पुरस्कार  व रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार  इ. पुरस्कार देऊन विविध संस्थांनी त्यांचा गौरव केला.  केंद्र शासनानेही त्यांना १९८५मध्ये  ‘पद्मश्री’  किताबा बहाल केला. 

अनुताई वाघांनी पुस्तके आणि मासिकांमधूनही आपल्या कार्याचा आणि शिक्षणविषयक विचारांचा प्रसार केला. त्यांनी ‘शिक्षणपत्रिका’ व ‘सावित्री’ ही मासिकं चालवली.  ‘बालवाडी कशी चालवावी’, ‘विकासाच्या मार्गावर’, ‘कुरणशाळा’, ‘सहज शिक्षण’ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे त्यांचे आत्मवृत्त खरोखरीच प्रेरणादायी आहे. 
 

सबस्क्राईब करा

* indicates required