computer

प्रत्यक्ष बुर्ज खलिफाच्या टोकावर उभं राहून केलेली जाहिरात....कोण आहे ही महिला?

Emirates एअरलाईनने नुकतीच एक नवीन जाहिरात केली आहे. त्या जाहिरातीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. तुम्ही तो व्हिडीओ पाहिलात का? त्यात प्रथम असे दिसते की एक फ्लाइट अटेंडंट महिला उंच ठिकाणी, जणू आकाशात उभी आहे. परंतु नंतर जेव्हा कॅमेरा झूम होतो तेव्हा असं दिसतं की ती प्रत्यक्षात दुबईच्या बुर्ज खलिफावर उभी आहे. बुर्ज खलिफा म्हणजे जगातली सर्वात उंच इमारत! एवढ्या उंचावर उभी असलेली ही महिला कोण? आणि ती खरोखर बुर्ज खलिफावर उभी आहे का ?

३३ सेकंदांच्या छोट्या व्हिडिओमध्ये ती महिला फ्लाइट अटेंडंटच्या गणवेशात हातात काही बोर्डस घेऊन उभी आहे. त्या बोर्डवर काही वाक्यं लिहिली आहेत. एका पाठोपाठ ते बोर्डस ती दाखवते आणि जाहिरात संपते. ज्या उंचीवर ती उभी आहे ते नुसतं पाहूनच आपल्याला पोटात गोळा येईल. तिचे नाव निकोल स्मिथ-लुडविक आहे. ती प्रोफेशनल स्कायडायव्हर आहे आणि याचे शूटिंग कुठल्याही स्टुडिओत न होता प्रत्यक्षात बुर्ज खलिफावर झाले आहे.

बुर्ज खलिफाच्या टोकावर निकोल उभी आहे. याची उंची आहे ८३० मीटर म्हणजे जवळजवळ २,७२०. एवढ्या उंचीवर उभे राहून जाहिरात करणे काही जोक नाही. निकोल खूप साहसी आहे. १६० व्या मजल्यापर्यंत ती लिफ्टने गेली. वरच्या टोकावर पोहोचायला निमुळते जिने चढावे लागतात. ते चढायला जवळजवळ १ तास लागला. तिथे ती चढल्यावर हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने शूटिंग घेण्यात आले. तिथे उभी असताना निकोलच्या सुरक्षेसाठी "हार्नेस" म्हणजेच सुरक्षापट्टे लावण्यात आले होते. ते पट्टे तिच्या मागे असणाऱ्या एका खांबाला बांधण्यात आले होते आणि त्यासाठी तिचा गणवेश मागच्या बाजूने कापलेला होता. तिने हातात घेतलेल्या बोर्ड वर “Moving The UAE To The UK Amber List”,“Has Made Us Feel”,“On Top Of The World”,“Fly Emirates”,“Fly Better” हे संदेश लिहिलेले आहेत. यूके आणि यूएई दरम्यानचा प्रवास पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यासाठी ही जाहिरात केली आहे.

एखादया एअरलाइन्सने या स्टंटचा उपयोग फक्त एक संदेश देण्यासाठी केला आहे हे आश्चर्यकारक आहे. निकोलने हा अनुभव सोशल मीडियावर शेयर केला आहे. तिच्यासाठी हा अनुभव खूप चित्तथराराक होता असे तिने म्हणले आहे. या जाहिरातीचे मेकिंग ही शेयर करण्यात आले आहे. याआधी टॉम क्रूझ आणि दुबईचे क्राऊन प्रिन्स या टोकावर पोहचलेले आहेत.आता निकोल हिचे नावही त्यांच्यासोबत जोडले गेले आहे.

सध्यातरी सोशल व्हिडीओवर या व्हिडिओची चर्चा होत आहे. काहींनी याचे कौतुक केले आहे, तर काहींना हा खोटा स्टंट वाटला. पण काही म्हणा, आजकाल जाहिरातींसाठी पैसा खर्च करायला कंपन्यां पुढे मागे पाहत नाही. कारण सोशल मीडियामुळे जगभरात चर्चा तर होतेच.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required