मुंबईचा हा फेरीवाला सर्वात श्रीमंत फेरीवाला कसा झाला? बबलू ठाकूर कोण आहे??
मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर येत असतो. आपले घर जेमतेम भागवणारे अशीच ओळख त्यांची असते. पण आज अशा फेरीवाल्याची गोष्ट सांगणार आहोत जो करोडपती आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांमधला हा गडी नाहीतर खंडणी गोळा करून त्याने हे पैसे उभे केले आहेत.
संतोषकुमार सिंग उर्फ बबलू ठाकूर असे त्याचे नाव आहे. १५ वर्षांपुर्वी रोजगाराच्या शोधात उत्तरप्रदेशातून मुंबईत तो दाखल झाला. काहीतरी काम करायचे म्हणून तो दादर स्टेशनजवळ ब्लेड विक्री करू लागला. माणूस आगाऊ असला की त्याला सोबत पण तशी मिळते. या बबलू ठाकूरची काही गुन्हेगारांसोबत ओळख झाली.
त्यांच्या संगतीत राहुन त्याने खंडणी उकळायला सुरुवात केली. छोट्या मोठ्या गुंडांना आपल्यात सामावून घेत त्यांच्या मार्फत स्वतःच तो खंडणी गोळा करू लागला. स्वतःला फेरीवाला भासवणारा बबलू ठाकूर मात्र परिसरातील सर्व फेरीवाल्यांकडून पैसे गोळा करत असे.
दादरपासून त्याचे रॅकेट पार कल्याणस्टेशनपर्यंत पसरले होते. या खंडणीच्या पैशातून तो अल्पावधीतच मालामाल झाला. दहा वर्षांपेक्षा कमी काळात त्याने मुंबईसारख्या शहरात तब्बल १० फ्लॅट घेतले. उत्तरप्रदेशात जमीन महागड्या एसयूव्ही गाड्या असा त्याचा तामझाम होता.
पण या क्षेत्रात जितक्या लवकर श्रीमंत होता येते, तितक्याच लवकर माती पण होते याची अनेक उदाहरणे आहेत. पोलिसांच्या रडारवर आल्यावर त्याला अटक करण्यात आली आणि त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. MCOCA अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




