महिंद्रा बोलेरोत चक्क टॉयलेट? हे टॉयलेट कसे काम करते?

दूरच्या प्रवासावर निघणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे रस्त्यात पुरेशा अंतरावर टॉयलेट नसणे. टॉयलेटच नसते मग ते स्वच्छ किंवा अस्वच्छचा प्रश्नच येत नाही. प्रवासात तर कित्येक किलोमीटर गाडी चालवल्यावर एखाद्या ठिकाणी टॉयलेट दिसते. रेल्वेत प्रवास करणाऱ्यांना ही समस्या येत नाही. मात्र इतर वाहनांना हा मोठा त्रास आहे.
या समस्येवर उपाय सापडला आहे. फोटोत दिसणाऱ्या महिंद्रा बोलेरोत चक्क मागच्या बाजूला टॉयलेट तयार करण्यात आलं आहे. मात्र हा बदल काही महिंद्राने घडवून आणलेला नाही. ओजस ऑटोमोबाईल्स यांनी हा बदल केला आहे. या ओजस ऑटोमोबाईल्सने याआधी मल्याळम सिनेअभिनेते मामुट्टी आणि पृथ्वीराज यांच्या ताफ्यासाठी काम केले आहे.
या बोलेरो गाडीतली तिसरी रांग कमी करून विमानांमध्ये असतात तसे फंक्शनल व्हॅक्युम लावण्यात आले आहेत. पाश्चात्य पद्धतीचे कमोड या गाडीत बसविण्यात आले आहेत. सोबतीला साबण, सॅनिटायजर ठेवण्याची पण सोय आहे.
या टॉयलेटसाठी पाणी हे सेपरेट टाकीमधून येते. या टाकीच्या सोबत अजून एक टाकी देण्यात आली आहे. या दोन्ही टाक्या जीआरपी कोटेड अल्युमिनियमने तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या वर्षानुवर्षे टिकू शकतील. या सगळ्या सेटअपला गाडीच्या बॅटरीतून १२ वॅट विजेचा सपोर्ट देण्यात आला आहे.
महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनीसुद्धा यावर ट्विट करत आपल्या कंपनीत लोकांनी या गाडीचा असाही वापर करता येईल असा विचार केला नसेल, असे म्हटले आहे. भविष्यात जर ही आयडिया मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली तर आश्चर्य वाटणार नाही.